सावंतवाडी : आपत्ती भरपाई वर्षानंतरही अडकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

सावंतवाडी : आपत्ती भरपाई वर्षानंतरही अडकली

सावंतवाडी : तब्बल एक वर्ष उलटूनही तौक्ते आणि पूर नुकसानग्रस्त अद्यापही शासन मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ निधी नसल्याचे उत्तर त्यांना येथील महसूल विभागाकडून मिळत असल्याने त्यांच्या पदरी आजही निराशाच पडली आहे. शासनाने लवकरात लवकर ही मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे.

सावंतवाडी तालुक्यात गतवर्षी २१ जुलैला तेरेखोल नदीला आलेल्या पुरामध्ये नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसून, कोट्यवधीची हानी झाली होती. यामध्ये शेती बागायतीही पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. घरातील सामान किंमती वस्तू, गाडी, गणपती शाळांनाही याचा फटका बसला होता. यात माडखोल, विलवडे, बांदा, इन्सुली, शेर्ले, ओटवणे आदी गावातील ग्रामस्थांना नुकसानीला सामोरे जावे लागले. संपुर्ण कोकणपट्टयात पुरपरिस्थिती उद्धभवल्याने याची दखल घेत शासनाने आर्थिक मदतीचा हात पुढे केला होता.

पुर परस्थितीनंतर महसुल विभागाने तात्काळ पंचनामे हाती घेतले होते. नुकसानीमध्ये घर आणि दुकानांची संख्या जास्त होती. त्यामुळे शासनस्तरावरून प्राप्त झालेली रक्कम पुरेशी नसल्याने ती सर्व नुकसानग्रस्तापर्यत पोहचू शकली नाही. येथील तहसिल कार्यालयाकडून आलेली रक्कम नुकसानग्रस्तांना वाटप करत उर्वरित नुकसानग्रस्तासाठी आवश्यक रक्कमेची मागणीही केली होती. मात्र, अद्यापपर्यंत नुकसान भरपाईसाठी निधी प्राप्त न झाल्याने नुकसानग्रस्तांच्या पदरी निराशाच पडली आहे.

सावंतवाडी तालुक्याचा विचार करता ही मदत काहीशी तोकडी ठरली आहे. मात्र, वर्ष उलटूनही नुकसानग्रस्त अजूनही शासन मदतीकडेच डोळे लावून आहेत. सद्यस्थितीत जवळपास दीड कोटीच्या आसपास रक्कम नुकसानग्रस्तांसाठी आवश्यक आहे. यामध्ये जास्त करून घरे आणि दुकाने यांच्या नुकसानीच्या रकमेचा सहभाग आहे. पुरात माडखोल तसेच बांदा परिसरातील दुकानांना मोठा फटका बसला होता. दुकानातील सामान पुराच्या पाण्यात वाहून जाऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

त्यामुळे ही रक्कम जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत नुकसानग्रस्तांना नुकसानीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. येथील तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास २०० दुकान तर दीडशेच्यावर घरांना नुकसान भरपाई वाटप करावयाची आहे. हे नुकसानग्रस्त आजही तहसील कार्यालयात हेलपाटे मारत असून नुकसान भरपाई कधी मिळणार? असा प्रश्न ते अधिकारी वर्गांना विचारत आहेत. मात्र, नुकसान भरपाईच प्राप्त न झाल्याने उत्तर द्यायचे काय? या विवंचनेतही अधिकारी वर्ग सापडत आहे.

तर दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळातही नुकसान झालेल्या बऱ्याच नुकसानग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामध्ये मांगर, गिरण अशा इतर मालमत्ता धारकांना पंचनामा होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. यातील नुकसानग्रस्त सुद्धा आजही नुकसान भरपाई मिळेल याच आशेवर आहेत. येथील तहसील कार्यालयात यासंदर्भात हेलपाटे मारून आम्ही दमलो. भीक नको; पण कुत्र आवर, अशी परिस्थिती नुकसानग्रस्तांची झाल्याचे सांगितले जात आहे.

पूर, नुकसानग्रस्तांना शासनाकडून आत्तापर्यंत प्राप्त झालेली नुकसानभरपाई वाटप केली आहे. अजूनही बरेचसे नुकसानग्रस्त भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्या सर्वांची यादी तहसील कार्यालयात तयार असून, शासनाकडे आवश्यक निधीची मागणी केली आहे. जवळपास दीड कोटीच्या आसपास ही रक्कम असून, ती प्राप्त होताच तत्काळ रक्कम वाटप केली जाणार आहे. तौक्ते चक्रीवादळाची भरपाई प्राप्त आहे. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे वाटप होऊ शकले नाही. लवकरच नुकसानग्रस्तांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

- श्रीधर पाटील, प्रभारी तहसीलदार, सावंतवाडी