एरव्ही गजबजलेल्या सावंतवाडी फुलमार्केटात शुकशुकाट

भूषण आरोसकर
Sunday, 20 September 2020

कोरोना भीतीमुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक शहराकडे जाण्याचे टाळत आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील शहरात कोरोनाचा प्रसार होत असताना लॉकडाउनचा निर्णय व्यापरी संघाने घेतला नसला तरी सुवर्णकारांच्या पाठोपाठ आता फुल व भाजी विक्रेत्यांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस फूल बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. 

येथील शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीती आहे. कोरोना भीतीमुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक शहराकडे जाण्याचे टाळत आहेत. काही शहरी भागातील नागरिक विनाकारण बाजारपेठेमध्ये येण्याचे टाळत आहेत; मात्र असे असले तरी बहुसंख्य नागरिक बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी व विनाकारण फिरताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बरेच नागरिक विना मास्क फिरत आहेत.

या कारणामुळे पंधरवड्यात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे; मात्र असे असले तरी शहरातील व्यापाऱ्यांमध्ये विविध मतमतांतरे दिसून येत आहेत. अलीकडे दोन दिवसांपूर्वी सुवर्णकरांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यापाठोपाठ येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईतील फुल विक्रेत्यांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कालपासून (ता.18) भाजी मंडई येथील दुकाने बंद दिसून आली. चातुर्मास सुरू असल्याने अनेक जण फुलांची खरेदी करत होते; मात्र त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. 

प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष 
फुल मार्केट बंद ठेवण्याच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. कणकवली, कुडाळ याठिकाणी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला होता तसाच निर्णय सावंतवाडी शहरासाठीही घ्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sawantwadi flower market lockdown