चौकुळच्या पठारावर प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे भांडार

युट्रीक्‍युलारीया परप्युरसन्स
युट्रीक्‍युलारीया परप्युरसन्स

गोवा विद्यापीठाचे संशोधन - पर्यटनाला वेगळी ओळख देण्याची ताकद
सावंतवाडी - होम स्टे पर्यटनासाठी नावलौकीक मिळविलेल्या चौकुळमध्ये प्रदेशनिष्ठ फुले आणि वनस्पतींचे भांडार असल्याचे रुफर्ड या युनायटेट किग्डंममधील संस्थेच्या मदतीने गोवा विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासावरून पुढे आले आहे. या जगाच्या पाठीवर केवळ चौकुळ आणि परिसरात असणाऱ्या वनस्पतींचा येथे पर्यटनाचे वेगळे क्षेत्र विकसीत करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. कास पठाराच्या धर्तीवर चौकुळची या निमित्ताने वेगळी ओळख पुन्हा एकदा ठळक झाली आहे. पर्यटनासाठी वापराबरोबरच या वनस्पतींच्या संवर्धनासाठीसुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आंबोलीजवळचे चौकुळ हे गेल्या तीन-चार वर्षामध्ये होम स्टे पर्यटनासाठी कुटुंबवत्सल पर्यटकांना खुणावत आहे. लुपीन फाऊंडेशन या संस्थेच्या प्रयत्नाने तेथील स्थानिकांनी चौकुळची पर्यटनदृष्ट्या वेगळी ओळख निर्माण केली. चौकुळमध्ये स्थानिकांनी पर्यटन व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणुकही केली. विशेष म्हणजे या पर्यटन व्यवसायाचा लाभ केवळ स्थानिकांना होत असून येथे येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता चौकुळला जोडणारा पारगडचा रस्ता तयार झाला असून लवकरच कुंभवडेमार्गे गोव्याला जोडणारा नवा रस्ता साकारणार आहे. या बदलांबरोबरच चौकुळमधील पर्यटन वाढीच्या नव्या क्षमताही प्रकाशझोतात येत आहेत. येथील प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे भांडार इथल्या पर्यटनाला आणखी समृद्ध करणारे ठरणार आहे. याचा यापूर्वीही काही संशोधकांनी अभ्यास केला. आता गोवा विद्यापीठाने रुफर्ड या संस्थेच्या मदतीने इथल्या वनस्पतींचा अभ्यास सुरू केला आहे. तिथल्या पठारात आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे त्यांच्या अधिवासात लोकसहभागातून संवर्धन करण्याचा हा प्रकल्प गेले वर्षभर सुरू आहे. याचा अभ्यास करणाऱ्या टीमच्या प्रमुख ऋतुजा कोलते यांनी सांगितले की, पश्‍चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ वनस्पतींची संख्या मोठी आहे. विशेषतः इथल्या सह्याद्रीच्या रांगामध्ये आणि समुद्र किनारपट्टीलगतच्या सड्यांवर (पठार) मोठ्या प्रमाणात अशा वनस्पती आढळतात. चौकुळ आणि आंबोली भागात गेले वर्षभर केलेल्या संशोधनामधून बऱ्याच नव्या गोष्टी रेकॉर्डवर आणता आल्या.

चौकुळमध्ये कोच अर्थात लेपीडागॅथिस क्‍लॅव्हाटा ही वनस्पती तब्बल 166 वर्षानंतर संशोधनाच्या पातळीवर पुन्हा रेकॉर्डला आणता आली. या आधी एका ब्रिटीश संशोधकाने चोर्ला घाटात ही वनस्पती शोधून तिला नाव दिले होते. प्रदेशनिष्ठ म्हणजे जगात त्या विशिष्ट भागातच त्या वनस्पतींचे अस्तित्व असते. त्यामुळे अज्ञानातून त्या तेथून नष्ट झाल्या तर त्याचे जगातील अस्तित्वच संपून जाते. चौकुळ आणि आंबोलीच्या पठारांवर अशा कितीतरी वनस्पती आहेत. पठारावरील अशा वनस्पती सऱ्हास पावसामध्ये उगवतात. इतर दिवशी ते ओसाड पठार असल्याने त्या ठिकाणी अशा वनस्पतींच्या अस्तित्वाला धोका येईल असे प्रकल्प, बांधकामे होऊ शकतात. तसे झाल्यास आपण निसर्गाच्या एका मोठ्या खजिन्याला मुकण्याची भिती असते. साहजिकच अशा वनस्पतींचे संवर्धन होण्यासाठी त्यांचे महत्व स्थानिकांना समजून सांगणे आवश्‍यक असते. शिवाय त्याच्या संवर्धनाचे महत्व आणि त्याविषयीचा परिपूर्ण अभ्यास तितकाच गरजेचा असतो. याच हेतूने आम्ही गेले वर्षभर चौकुळच्या पठारावर या वनस्पतींचा अभ्यास करत आहोत. यात बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशनिष्ठ वनस्पती आढळल्या. अजूनही त्यावर काम करायचे आहे.

चौकुळच्या पठारावर सात वर्षांनी फुलणारी कार्वी (स्ट्रॉबीलॅन्थस कॅलोसा), तीन वर्षांनी फुलणारी टोपली कार्वी (स्ट्रॉबीलॅन्थस सेसिलीस), अडेनून इंडिकम, सोनतळ अर्थात सोनकी, व्दिदल वनस्पतीतील आर्किड, इंम्पेशन्स लावी तेरडा, बेगोनिआ, ऍडेलोकारीयम सिलेस्टीनम, मेरेमिआ रिन्कोरायझा, एक्‍झॅकम लावी, किटकभक्षी असलेली युट्रीक्‍युलारीया परप्युरसन्स, क्‍लोरोफायटम गोठनेन्स आदी प्रदेशनिष्ठ वनस्पती त्या पठारावर आढळल्या. याशिवायही अनेक वनस्पती येथे आहेत. इथल्या प्रदेशनिष्ठ वनस्पतींची यादी खूप मोठी आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने सजग राहणे आवश्‍यक आहे असे ऋतुजा कोलते सांगतात.

जागतिक स्तरावर निसर्गाशी संबंधित गोष्टी जाणून घेण्याचा इच्छा असणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. असे पर्यटन चौकुळमध्ये विकसीत करायला संधी आहे. तसे झाल्यास कास पठाराप्रमाणेच चौकुळही आपली वेगळी ओळख निर्माण करू शकेल. त्यातून अशा वनस्पतींच्या संवर्धनाबरोबरच स्थानिक पर्यटनाची उंची कितीतरी प्रमाणात वाढणार आहे.

या प्रकल्पाला प्रा. एम. के. जनार्थनम मार्गदर्शन करीत आहेत.

"गेले वर्षभर केलेल्या संशोधनातून चौकुळच्या पठारावर वनस्पतींच्या अनेकविध प्रजाती बहरताना दिसल्या. त्यातील बहुतांशी अल्पायुषी आणि फक्त जांभ्या खडकाच्या पठारावर वाढणाऱ्या आहेत. यातील बऱ्याच प्रजाती फक्त उत्तर-पश्‍चिम घाटातच आढळतात. चौकुळचे हे पठार पश्‍चिम घाटातील जैवविविधता समृद्ध पठारांपैकी एक आहे. स्थानिकही पारंपारिक पद्धतीने या अधिवासाचे संवर्धन करताना दिसतात. ही खरे तर सकारात्मक गोष्ट आहे. याला संशोधनाचीही जोड असायला हवी. पर्यटन वाढ करताना या प्रजातींच्या संवर्धनाचाही विचार व्हावा.
- ऋतुजा कोलते, गोवा विद्यापीठ

चौकुळमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सुरू असलेली वाढ समाधानकारक आहे. ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने यात सहभागी होत आहेत. पर्यावरण हे येथील बलस्थान आहे. ते राखून दर्जेदार पर्यटक येथे येण्यासाठी प्रयत्न झाल्यास पर्यावरण संवर्धनाबरोबरच आर्थिक उन्नती सुद्धा साधता येईल. चौकुळमधील एकीच्या जोरावर हे उद्दीष्ट साध्य करणे कठीण नाही.
- योगेश प्रभू, प्रकल्प व्यवस्थापक, लुपीन सिंधुदुर्ग

आमच्यासाठी चौकुळमधील निसर्ग म्हणजे दैनंदिन जीवनाचा भाग होता. आता पर्यटनामुळे या निसर्गातील ताकद खऱ्या अर्थाने समजू लागली आहे. आमच्या गावात परंपरेने निसर्ग संवर्धनाच्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात. त्यामुळे पर्यटन वाढीबरोबर इथला निसर्ग राखण्याबाबतचे प्रबोधन करणे फारसे कठीण नाही. लोकसहभागातून येथील पठारांवर असलेला हा खजिना नक्कीच जपता येईल.
- सुरेश उर्फ बाबू गावडे, पर्यटन व्यावसायिक चौकुळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com