सावंतवाडी पालिकेचा महसूल बुडाला ः परब

भूषण आरोसकर
Thursday, 29 October 2020

येथील पालिकेत यापूर्वी सत्तेत असलेल्या दीपक केसरकर यांच्या टीमने पालिका संकुलातील गाळ्यांची भाडेवाढ वसूल न केल्यामुळे पालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेत यापूर्वी सत्तेत असलेल्या दीपक केसरकर यांच्या टीमने पालिका संकुलातील गाळ्यांची भाडेवाढ वसूल न केल्यामुळे पालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. आता मी ही वसुली करून उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत आहे तर त्याला शिवसेनेचे अशिक्षित नगरसेवक विरोध करीत आहेत; मात्र काहीही झाले तरी नियमानुसार सर्व वसुली करणारच. गाळेधारकांना प्राधान्य आहे; मात्र पैसे न भरल्यास गाळे ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव केला जाईल, असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. 

येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, नवनियुक्त युवा शहराध्यक्ष संदेश टेमकर, बांदा सरपंच अक्रम खान भाजपा युवक जिल्हा सरचिटणीस तुषार साळगावकर, सौरभ गावडे, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, प्रवक्ते केतन आजगावकर, अमित परब आदी उपस्थित होते. 

नगराध्यक्ष म्हणाले, ""पालिकेच्या व्यापारी संकुलातील 144 गाळे भाडेपट्टीवर देण्यात आले आहेत. दर नऊ वर्षानंतर या गाळ्यांच्या कराराचे नूतनीकरण केले जाते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी 2008 ला गाळ्यांची 600 रुपये असलेली भाडेपट्टी वाढवून 2850 केली. मात्र, वाढीव भाडे वसूली केली नाही. त्यामुळे याबाबत 2015 मध्ये त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. 2017 मध्ये या समितीने अहवाल दिला; मात्र तरीही वाढीव भाडेपट्टी तसेच अनामत रक्कममधील वाढ वसूल करण्यात आली नाही. यामुळे पालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. हा महसूल वसूल करण्यासाठी संबंधित गाळेधारकांना नोटीस बजावण्यात येणार असून दिलेल्या मुदतीत पैसे न भरल्यास गाळे ताब्यात घेण्यात येईल व त्याचा लिलाव करण्यात येईल.'' 

पालकमंत्री निष्क्रीय 
नगराध्यक्ष म्हणाले, ""पालकमंत्री उदय सामंत हे सगळ्यात निष्क्रिय व अकार्यक्षम पालकमंत्री आहेत. गेल्या वर्षभरात सावंतवाडी पालिकेला त्यांनी पाचशे रुपयेही निधी दिला नाही. हे पालकमंत्री प्रत्येक बाबतीत अपयशी आहेत. यापुढेही ते निधी देतील अशी अपेक्षा नाही. त्यामुळे वेळ पडल्यास पालकमंत्र्यांविरोधात आंदोलन करावे लागेल. पालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे अधिकारात ढवळाढवळ करू शकत नाही. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawantwadi Mayor held a press conference