सावंतवाडी : मोती तलाव घेणार मोकळा श्वास

गाळ काढण्यावर एकमत मूळ बांधकामाला इजा न पोचविता काम
मोती तलाव
मोती तलाव sakal

सावंतवाडी: संस्थानकालीन मोती तलावाच्या मूळ बांधकामाला कोणतीही इजा न पोचविता पावसाळ्यापूर्वी लोकसहभागातून येथील तलावातील गाळ काढून तलावाची सफाई करण्याचा एकमुखी निर्णय आज घेण्यात आला. त्याला राजघराण्याकडून युवराज लखमराजे भोसले यांनीही आवश्यक सहकार्य करण्याचा शब्द देत रुग्णालयासमोरील तलावातील काम पहिल्या टप्प्यात करू आणि उर्वरित काम नंतर करू, असे स्पष्ट केले.

शहराचे सौंदर्य असलेल्या मोती तलावातील गाळ काढून तलावाची सफाई करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी लोकमान्य टिळक सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गाळ काढण्यासह तलाव विकासाच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, अनारोजीन लोबो, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, भारती मोरे, राजू बेग, दीपाली भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, देवा टेमकर, समीर वंजारी, अमेय तेंडुलकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, अभिषेक सावंत, दाजी राऊळ, विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर, संजू शिरोडकर, सतीश बागवे, बाबुराव धुरी आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत अनेकांनी मत व्यक्त केले. विहिरीचे पाणी आटून निर्माण होणारी पाणीटंचाई तलावातील गाळ काढल्यास दूर होणार आहे. शिवाय तलाव ऐतिहासिक असल्यामुळे त्याला पर्यटनदृष्ट्या एक वेगळे महत्त्व आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पर्यटकांमध्ये एक वेगळाच संदेश जातो. त्यामुळे हा गाळ काढणे आवश्यक आहे, असे मत काहींनी मांडले.

आमदार केसरकर म्हणाले, ‘‘मोती तलाव हा शहराचा मानबिंदू आहे. यामुळेच शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तलावाच्या विकासकामासाठी आपण यापूर्वी पर्यावरण खात्याकडून चार कोटी रुपये मंजूर करून आणले होते; परंतु त्या कामाला न्यायालयाकडून स्टे ऑर्डर आल्याने निधी परत गेला. तलावासंदर्भात आपल्या माहितीनुसार गाळ काढायचा झाल्यास, किमान दोन महिने आधी पाणी सोडल्याशिवाय गाळ काढणे कठीण आहे. त्यामुळे त्या दृष्टीने योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. शहरातील अनेकांनी मांडलेली मते लक्षात घेता संस्थानकालीन वारसा जपून हे काम काम केले जाईल. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल; मात्र नागरिकांचे सहकार्य तेवढेच आवश्यक आहे. दरम्यान, यावेळी अजय गोंदावळे, पुंडलिक दळवी, तानाजी वाडकर, अनारोजीन लोबो, संजू शिरोडकर आदींनी चर्चेत सहभाग घेत मते मांडली.

मोती तलावाच्या विकासासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला आहे. मात्र, न्यायालयीन बाबींमुळे बाधा आली. राजघराण्याची परवानगी असल्यास यापुढेही आपण निधी उपलब्ध करून देऊ शकतो.

तशी सकारात्मक भूमिका राजघराण्याने घ्यावी.

- दीपक केसरकर, आमदार

शहराचा आणि विशेषतः मोती तलावाचा विकास राजघराण्याकडून कधीच थांबविला जाणार नाही. मात्र, कोणतीही कामे करीत असताना कल्पना देणे आवश्यक आहे; पण तसे होत नाही. यापुढे आम्हाला सोबत, विश्वासात घेऊन काम केल्यास सर्वतोपरी सहकार्य राहील.

- लखमराजे भोसले,युवराज, सावंतवाडी संस्थान

तलावातील गाळ काढण्यासंदर्भात पालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे भविष्यात सावंतवाडीतील पाणीटंचाई कमी होईल. या निर्णयाला नागरिकांसह तालुका प्रशासनानेही सहकार्य करावे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण व्हावे. पुढची दिशा

स्पष्ट करावी.

- संजू परब, माजी नगराध्यक्ष

मोती तलावातील वाळूसंदर्भात मुख्य अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल. त्यासंदर्भात महसूलचे सहकार्य असेल. त्याशिवाय, गाळ काढायचा झाल्यास प्रशासनातर्फे २५ डंपर, जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले जाईल.

- राजाराम म्हात्रे, तहसीलदार

उपस्थितांनी मांडलेली मते

  • बऱ्याच ठिकाणी तलावाच्या भिंतींना भेगा

  • गाळ काढताना प्रशासनाने दक्षता घ्यावी

  • पाणी बाहेर काढण्यासंदर्भात नियोजन व्हावे

  • केशवसुत कट्ट्याकडे तलावाचे दोन भाग

  • एका-एका भागात पाणी साठवून गाळ काढा

  • तलाव पूर्णतः रिकामा होऊ नये

  • परिसरातील विहिरींची पातळी खालावू नये

  • तलावाच्या भिंती जपा

लखमराजे भोसले म्हणाले, ‘‘शहराच्या पाण्याच्या दृष्टीने तलावातील गाळ काढण्यास कोणतीच अडचण असणार नाही. नागरिकांना पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र, हे काम करीत असताना तलावाच्या भिंतींना कोणतीही बाधा पोचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सहकार्याने काम करूया. मात्र, एकाच वेळी काम न करता सुरुवातीला रुग्णालयासमोरील तलाव साफ करून नंतरच दुसऱ्या भागाचे काम करू.’’

राजघराण्याचा सदैव ऋणी

रुग्णालयासमोर तलावात साचलेला गाळ लक्षात घेता महसूलने यासंदर्भात सॉफ्ट कॉर्नर द्यावा; अन्यथा त्याची रॉयल्टी भरून ती वापरण्याचा अधिकार पालिकेला द्यावा. यासाठी राजघराण्याच्या परवानगीची गरज होती आणि ती युवराज लखमराजे यांनी दिल्याने हे काम आणखीनच सोपे झालेे. त्यासाठी राजघराण्याचा ऋणी राहीन, असे केसरकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com