esakal | सावंतवाडी-वेंगुर्ले जलवाहिनी अडचणीत 
sakal

बोलून बातमी शोधा

sawantwadi-vengurla waterway issues

दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणामुळे तालुक्‍यातील गावांमध्ये हरितक्रांती झाली. तिलारीचा पाणीसाठा प्रचंड असल्याने व बारमाही असल्याने या धरणातील पाणी पिण्यासाठी सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना पुरविण्याची योजना जीवन प्राधिकरण विभागाने 2010 मध्ये आखली होती.

सावंतवाडी-वेंगुर्ले जलवाहिनी अडचणीत 

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या योजनेसाठी शासन पातळीवरून मिळाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असून निधी मिळण्याबाबत अद्यापही अनिश्‍चितता कायम असल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. 

दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणामुळे तालुक्‍यातील गावांमध्ये हरितक्रांती झाली. तिलारीचा पाणीसाठा प्रचंड असल्याने व बारमाही असल्याने या धरणातील पाणी पिण्यासाठी सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना पुरविण्याची योजना जीवन प्राधिकरण विभागाने 2010 मध्ये आखली होती. दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली येथून तीलारीच्या उजव्या कालव्यातून या पाईपलाईनला सुरुवात होते. त्यानंतर डेगवे, बांदामार्गे ही पाईपलाईन थेट वेंगुर्ले शहरापर्यंत नेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी योजनेतील समाविष्ट गावांना बारमाही मिळणार आहे. या योजनेचा फायदा दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील 17 गावांना मिळणार आहे. 

योजनेचे स्वरूप 
तिलारीचे पाणी थेट वेंगुर्ले पर्यंत नेण्यासाठी या पाईपलाईनचा प्रकल्प आखण्यात आला; मात्र शासन पातळीवर निधी उपलब्ध न झाल्याने सुरुवातीला हा प्रकल्प शासनाच्या अनुमतीने खासगी तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला 1 जून 2011 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात 23 ऑगस्ट 2013 ला प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ सासोली येथून करण्यात आला. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने या प्रकल्पाचा 216 कोटी 90 लाख रुपये किमतीचा आराखडा तयार केला. त्याला प्रशासकीय पातळीवर मंजुरी देखील देण्यात आली. या प्रकल्पातील 35 टक्के रक्कम ही शासकीय निधीतून व उर्वरित 65 टक्के निधीची (140 कोटी 98 लाख 50 हजार) रक्कम ही खासगी उद्योजकांकडून उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीला शासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकल्प पीपीई (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर उभारण्यात येत असल्याने खासगी कंपनीने यामध्ये 65 टक्के गुंतवणूक केल्यास त्या कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच गुंतवणूक केलेली रक्कम ही योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावातील जनतेकडून वसूल करून देण्यात येईल असे करारात नमुद करण्यात आले होते. 

उत्तम स्टील कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 61 कोटी रुपये निधी प्राप्त होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात 20 कोटी रुपयेच निधी मिळाला. उत्तम स्टील कंपनीने उर्वरित पैसे न गुंतवीता करार रद्द केल्याने हा प्रकल्प अडचणीत आला. निधीअभावी हा प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर होता. जीवन प्राधिकरण विभागाने नव्याने 218 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा बनवून शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला. या प्रकल्पात संपूर्ण गुंतवणूक राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकल्पाला उर्जितावस्था मिळाली. 

निधीअभावी काम बंद पडण्याची शक्‍यता 
ही योजना एकूण 218 कोटी रुपये खर्चाची आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपये मिळाले आहेत. सासोली (ता. दोडामार्ग) पासून मडुरा (ता. सावंतवाडी) पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अजून 40 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. बांदा शहरातील पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे गेले वर्षभराचे पैसे थकीत आहेत. त्यामुळे निधीअभावी काम बंद आहे. ठेकेदाराला नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे पैसे अदा करण्यात आले होते. डेगवे येथे जलशुद्धीकरण विभागाचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकण्यात आलेल्या मार्गात काही ठिकाणी टेस्टिंगचे काम देखील सुरू आहे. कळणे, फोंडये, मोरगाव, डेगवे, बांदा येथे ग्रामपंचायतींना पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन देखील टाकण्यात आली आहे. यामध्ये 4 गावात पाणी साठवण टाक्‍या उभारण्यात आल्या आहेत. 

शेर्ले दशक्रोशी बांद्याशी कनेक्‍ट होणार 
सासोली ते वेंगुर्ले ही पाईपलाईन सुरुवातीच्या आराखड्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरून प्रस्तावित होती. मात्र बांदा शहरातून ही पाईपलाईन गेल्यास बांदा-आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रावर पूल मिळणार होते. यासाठी तत्कालीन बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने व आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधत या योजनेचा मार्ग बदलण्यात आला. या पाईपलाईनचा मार्ग बांदा कट्टा कॉर्नर येथून आळवाडी बाजारपेठ मार्गे तेरेखोल नदिपात्रातून जाणार आहे. यामध्ये नदीपात्रात पूल प्रस्तावित असून त्याची रुंदी ही 8 फूट आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या माध्यमातून येथील कित्येक वर्षांचे पुलाचे स्वप्न साकार होणार आहे. 

या गावांना फायदा 
या योजनेचा लाभ दोडामार्ग तालुक्‍यातील सासोली, कळणे, फोंडये, आडाळी, मोरगाव, सावंतवाडी तालुक्‍यातील पडवे-माजगाव, डेगवे, बांदा, शेर्ले, कास, मडुरा, पाडलोस, आरोस, कोंडुरा, सातोसे, आरोंदा, वेंगुर्ले तालुक्‍यातील रेडी, शिरोडा, तळवडे, आरवली, मोचेमाड, उभादांडा, साटेली, वेंगुर्ले शहर यांना होणार आहे. तीलारीचे पिण्याचे पाणी थेट या गावांना बारमाही मिळणार आहे. 

बांदा शहराला फायदा 
बांदा शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ ही नेहमीच बसते. ही पाईपलाईन बांदा शहरातून जाणार असल्याने त्याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. बांद्यात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने येथील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील गंभीर आहे. यासाठी ही योजना बांदा शहरासाठी जीवनदायिनी ठरणार आहे. 

या योजनेचे काम निधीअभावी रखडल्याने याबाबत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. बांदा शहर व दशक्रोशीसाठी हा प्रकल्प फायदेशीर असल्याने शासकीय पातळीवर निधीची तरतूद करून हा प्रकल्प तत्काळ पूर्ण करावा यासाठी आग्रही असून याबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. 
- अक्रम खान, सरपंच बांदा 

निधीअभावी प्रकल्पाचे काम रखडले आहे. 2 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांदा येथे तेरेखोल नदीपात्रात पूल प्रस्तावित असून निधी मिळाल्यास यावर्षी पुलाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत काम धीम्या गतीने सुरू आहे. यावर्षी कोरोनामुळे निधी मिळण्यास विलंब होत आहे. तत्काळ काम सुरू होण्याआधी वरिष्ठ पातळीवर निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
- नितीन उपरेलू, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग.  

 संपादन - राहुल पाटील