सावंतवाडीत जलपुनर्भरण मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

सावंतवाडी - शहरातील पाणी पातळी वाढण्याच्या दृष्टीने येथील पालिकेने उत्स्फूर्तपणे पाऊल उचलले आहे. पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेतून शहरात पाणी संवर्धनासाठी शोष खड्डे खोदण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून याचा प्रारंभ आज येथील नरेंद्र डोंगरावर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते झाला. 

सावंतवाडी - शहरातील पाणी पातळी वाढण्याच्या दृष्टीने येथील पालिकेने उत्स्फूर्तपणे पाऊल उचलले आहे. पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेतून शहरात पाणी संवर्धनासाठी शोष खड्डे खोदण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून याचा प्रारंभ आज येथील नरेंद्र डोंगरावर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते झाला. 

जिल्ह्यात यावर्षी पाणीप्रश्‍न अधीक प्रखरतेने जाणवला. सक्षम पाणी योजना आणि मोती तलावामार्फत झालेले जलसंवर्धन यामुळे शहराला याच्या झळा फारशा जाणवल्या नाहीत; मात्र भविष्यातील प्रश्‍नाची जाणीव नक्की झाली. पाऊस अजून लांबवला असता तर ही समस्या येथेही निर्माण झाली असती; मात्र शहरातील विहिरींनी मात्र तळ गाठला होता. 

ही स्थिती जाणून नगराध्यक्ष साळगावकर आणि पालिका यंत्रणेने यावर कृतीतून उपाययोजायला सुरवात केली. याचाच भाग म्हणून शहरात शोष खड्डे मारण्याचा निर्णय घेतला होता. साळगावकर म्हणाले, ""शहराला 24 तास पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पालिका वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. शहरातील पाण्याची पातळी वाढली तरच भविष्यातील पाणी प्रश्नावर मात करता येईल. यादृष्टीने शहरात यावर्षी पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी किमान पाचशे शोष खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट आहे. खासगी जमिनीतही असा उपक्रम राबवण्याचे आवाहन सुजाण शहवासीयांना आहे. यासाठी पालिका पूर्ण सहकार्य करेल. शिवाय 3 वनराई बंधारे उभारण्यात येतील. याकरता 50 लाखांची आर्थिक तरतूद आहे.'' 

पालिकेने या योजनेच्या सुरुवातीला नरेंद्र डोंगर येथे तब्बल 37 शोषखड्डे खोदले. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक सुभांगी सुकी, आनंद नेवगी, ऍड. परीमल नाईक, दिपाली भालेकर, आशिष सुभेदार, गजानन परब, ड्युमिंग अल्मेडा, दीपक म्हापसेकर, विनोद काष्टे आदी उपस्थित होते. 

पाऊस साठवताना 
सावंतवाडीत पावसाचे प्रमाण जास्त असते. येथे पाण्याचीही स्थिती चांगली आहे. असे असूनही येथील पालिकेने भविष्यातील गरज ओळखून पावसाचे पाणी साठवण्याच्या दृष्टीने उचलेले पाऊल दिशादर्शक म्हणावे लागेल. 

नक्कीच फायदा 
साळगावकर म्हणाले, ""सावंतवाडी पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेपैकी नरेंद्र डोंगरावरील नैसर्गिक स्त्रोताच्या पाण्यावर एक योजना कार्यान्वित आहे. याठिकाणी खोदलेल्या शोष खड्ड्यांच्या माध्यमातून या योजनेतील पाणी पातळीत वाढ होण्यास नक्कीच फायदा होणार आहे.'' 

शोष खड्ड्यांसह नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी दोन वनराई बंधारे व उपरलकर नजीक याठिकाणी एक असे एकूण तीन बंधारे बांधण्यात येणार आहेत. शासकीय जमिनीतही असे खड्डे खोदण्याबाबत विचार सुरू आहे. 
- बबन साळगावकर,
नगराध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawantwadi Water Recharge campaign