सावंतवाडीचा एम्स अकॅडमी संघ उपांत्य फेरीत 

भूषण आरोसकर
Monday, 30 November 2020

एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाची स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फर्स्ट क्रिकेट अकॅडमी या संघाशी गाठ पडली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बेळगाव येथील आनंद अकॅडमीतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील एम्स अकॅडमी सावंतवाडी हा प्रशिक्षक राहुल रेगे यांचा संघ सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला. 

एम्स अकॅडमी सावंतवाडी संघाची स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फर्स्ट क्रिकेट अकॅडमी या संघाशी गाठ पडली. नाणेफेक जिंकून सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व आर्यन 25, सुजल 30 आणि मिहिर 12 यांच्या फलंदाजीच्या जोरावर 25 षटकात सर्वबाद 140 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना फर्स्ट क्रिकेट एम्स अकॅडमी संघाचा डाव 19.5 षटकात अवघ्या 82 धावात आटोपला व सावंतवाडी संघ 58 धावांनी विजयी झाला. गोलंदाजीत उस्मा व आरव यांनी प्रत्येकी 2 तर पराग, आर्यन, भगवान आणि मानस या गोलंदाजांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

स्पर्धेतील दुसऱ्या आणि उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात सावंतवाडी संघाची गाठ अर्जुन स्पोर्टस युनियन जिमखाना या संघाशी पडली. सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्वीकारली व मिहिर कुडाळकर नाबाद 30, ईशान कुबडे 34 , आरोह मल्होत्रा 15 आणि मानस कोरगावकर नाबाद 14 यांच्या फलंदाजीच्या जोरावर मर्यादित 25 षटकात 5 गडी बाद 139 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली , या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जुन स्पोर्टसने निकराची झुंज दिली; परंतु त्यांना विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. सावंतवाडी संघाने त्यांना 25 षटकात 5 गडी बाद 135 या धावसंख्येवर रोखलं आणि या रंगतदार सामन्यात विजयाची नोंद केली. 

प्रशिक्षक, पालकांमुळे यश 
सावंतवाडी संघातर्फे मिहिरने आणि आर्यन कुडाळकर व गौरांग बिडये यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या कुडाळकरला सामनावीर पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. सांवतवाडी संघाच्या या यशाचे श्रेय खेळाडुंवर मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षक रेगेंबरोबरच खेळाडुंच्या पालकांना जाते. कारण कोरोना संसर्गाच्या काळात सुद्धा त्यांनी मुलांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक योगदान दिले, असे यावेळी नगरसेवक उदय नाईक यांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawantwadi's Academy in the semifinals