बाप्पा गेले शाळेत अन् मुलांशी मारल्या गप्पा, मजेशीर देखावा वाचा...

नेत्रा पावसकर
Friday, 28 August 2020

कोरोनाच्या काळात सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत; मात्र या शाळेत मुलांना काही शिक्षणाची मजा घेता येत नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील या भावभावना युवा चित्रकार मेस्त्री यांनी त्याच्या चित्राद्वारे मांडल्या आहेत.

तळेरे (सिंधुदुर्ग) - गवाणे येथे चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी शाळेत विद्यार्थ्यांसोबत रमलेला, त्यांच्यासोबत गप्पा मारणारा बाप्पा साकारला आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील भावना अचूकपणे सांगणारा बाप्पा चक्क आपल्या विद्यार्थ्यांसोबत शाळेतच गेला आणि त्यानंतर बाप्पाला जे प्रश्‍न विद्यार्थी विचारताहेत, त्याचे सारे चित्रण अक्षयने देखाव्यातून मांडले आहे. एकूणच "ऑनलाईनपेक्षा आपलीच शाळा बरी', असा संदेशच त्यांनी यातून दिला आहे. 

कोरोनाच्या काळात सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत; मात्र या शाळेत मुलांना काही शिक्षणाची मजा घेता येत नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील या भावभावना युवा चित्रकार मेस्त्री यांनी त्याच्या चित्राद्वारे मांडल्या आहेत. देवगड तालुक्‍यातील गवाणे येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांसोबत रमलेला, त्यांच्यासोबत गप्पा मारणारा बाप्पा साकारला आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील भावना अचूकपणे सांगणारा बाप्पा चक्क आपल्या विद्यार्थ्यांसोबत शाळेतच गेला आणि त्यानंतर बाप्पाला जे प्रश्‍न विद्यार्थी विचारताहेत, त्याचे सारे चित्रण देखाव्यात आहे. 

अक्षय मेस्त्री म्हणाले, ""गेल्यावर्षी आम्ही आमच्या बाप्पाला शालेय साहित्य देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जमा झालेल्या रोख रकमेतून काही घरगुती साहित्य घेऊन ते अनाथाश्रम आणि मिळालेले शैक्षणिक साहित्य विविध शाळेतील मुलांना मोफत वाटले. यामागे निव्वळ सामाजिक हेतू आहे. यावर्षीही अजून एक कल्पना घेऊन आम्ही तुम्हाला एक आवाहन करणार आहोत. आपण आमच्या बाप्पाच्या दर्शनाला अवश्‍य या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील सर्वत्र हलाखीची परिस्थिती लक्षात घेता येताना कोणत्याही वस्तू अथवा साहित्य न आणता बाप्पासमोर असलेल्या डब्यात आपल्या इच्छेनुसार पैसे टाकू शकता. या देणगीतून आम्ही गरजू व्यक्ती, कुटुंब अथवा संस्था यांना मदत करणार आहोत.'' 

चित्रकार मेस्त्री हे हरहुन्नरी कलाकार आहेत. आपल्या चित्रातून नेहमीच त्यांनी सामाजिक संदेश मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच त्यांनी काढलेले भिंतीवरील "ऑनलाईन शाळेपेक्षा आमची शाळाच बरी' हे चित्र विशेष चर्चेत आले होते. त्यांनी येथील माळरानावर आषाढी एकादशीला विठ्ठलाची महाकाय प्रतिकृती हिरव्या गवतात साकारून महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. आतापर्यंत एवढे मोठे चित्र गवतात साकारण्याचा प्रयत्न फारच कमी जणांनी केला आहे. 

जनजागृतीवर भर 
सातत्याने सामाजिक भान देणारी चित्रे साकारणाऱ्या मेस्त्री यांनी कोरोनाच्या काळातही जनजागृती करणाऱ्या चित्रांची मालिका साकारली होती. यातून कोरोना रोखण्यासाठी सातत्याने विविध आघाड्यांवर प्रयत्न करणाऱ्या लोकांना समाजाने कशी वागणूक दिली पाहिजे, याचा संदेश त्यांनी दिला होता. आता अनोख्या देखाव्याने मुलांच्या मनात काय चाललंय याचा वेध घेतला जात असून हा देखावा सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The scene of Ganaraya and student in gaon konkan sindhudurg