दापोलीत पाच महिन्यापासून इतिवृत्तावर सभापतींची सहीच नाही

चंद्रशेखर जोशी
Thursday, 8 October 2020

प्रशासन निरुत्तर; सभा तहकूब करण्याची नामुष्की; सभापतींची सहीच नसल्याचे स्पष्ट

दाभोळ (रत्नागिरी) : इतिवृत्त पुस्तिकेत सभापतींची सही न घेतल्याचे उघड झाल्याने दापोली पंचायत समितीची मासिक सभा तहकूब करण्याची नामुष्की आज ता. ७ रोजी प्रशासनावर आली. सभेचे इतिवृत्तच लिहिले गेले नाही तर आम्हाला या इतिवृत्ताची प्रत कोणत्या आधारे दिली? या प्रश्‍नावर प्रशासन निरुत्तर झाले. इतिवृत्त रजिस्टरमध्ये मे महिन्यानंतर झालेल्या सर्व सभांच्या इतिवृत्तावर सभापतींची सहीच नसल्याचे आढळले.  
 

दापोली पंचायत समितीची मासिक सभा आज दुपारी १२ वा. पंचायत समितीच्या सभागृहात सुरू झाली. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे हा विषय चर्चेला आल्यावर राजेश गुजर यांनी मागील सभेचे इतिवृत्त रजिस्टरवर लिहिले आहे का? असे विचारले. एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने मागील सभेचे इतिवृत्त लिहिले गेले नसल्याचे अधीक्षक पवार यांनी सांगितले. इतिवृत्तच लिहिले गेले नाही तर आम्हाला प्रत कोणत्या आधारे दिली? अशी विचारणा करत इतिवृत्त रजिस्टर आणण्यास सांगितले. इतिवृत्त रजिस्टरवर मे महिन्याच्या नंतर झालेल्या सर्व सभांच्या इतिवृत्तावर सभापतींची सहीच नसल्याचे आढळून आले.

हेही वाचा- GOOD NEWS : लवकरच सुरू होणार कोल्हापूर-मुंबई विमानसेवा , असे आहे वेळापत्रक -

राजेश गुजर म्हणाले, नियमाप्रमाणे सभेचे इतिवृत्त लिहून झाल्यावर या रजिस्टरच्या झेरॉक्‍स काढून त्या सदस्यांना देणे गरजेचे आहे; मात्र इतिवृत्त टायपिंग करून प्रति सदस्यांना दिल्या जात आहेत. मागील इतिवृत्तावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सभापती यांच्या सह्या होत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभेतील इतर विषयांवर चर्चा करणार नाही. काही सभेच्या इतिवृत्तावर तत्कालीन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्याही सह्या नाहीत. रजिस्टरवर लिहिण्यात आलेले हे इतिवृत्त आम्ही कायदेशीर कसे मानायचे? मनोज भांबिड यांनी आजची ही सभा तहकूब करावी व सर्व इतिवृत्त लिहून झाल्यावर तसेच त्याच्यावर सभापतींची सही झाल्यावर पुन्हा सभा घ्यावी, अशी मागणी केली. सभापती हजवानी यांनी आजची सभा तहकूब केली.

तो मुद्दा उपस्थित करून हैराण करणार
दापोली पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सभापती रउफ हजवानी यांनी राजीनामा देण्याचा पक्षाचा आदेश मानला नाही. त्यांनी शिवसेनेशी घरोबा केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे; मात्र हजवानी आपण राष्ट्रवादीतच असल्याचे सांगत आहेत. हजवानी राजीनामा देत नसल्याने आता राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या सभासदांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित करून सभापतींना सभा तहकूब करण्यास भाग पाडले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schedule of monthly meeting of Dapoli Panchayat Samiti problem in metting