चार आण्याची कोंबडी अन्‌ बारा आण्याचा मसाला ; अल्पसंख्याक शिष्यवृत्तीला शेकडोजण मुकणार

the scholarship from other caste students face problem in ratnagiri
the scholarship from other caste students face problem in ratnagiri

मंडणगड (रत्नागिरी) : अल्पसंख्याक असल्याचे तसेच उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र पालकांनी देऊन मिळणाऱ्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी आता शासनाने समाविष्ट केलेल्या नव्या अटी पालकांसाठी त्रासदायक असून शिष्यवृत्ती आणि कागदपत्रांसाठी येणारा खर्च सारखा झाला आहे. चार आण्याची कोंबडी अन्‌ बारा आण्याचा मसाला, अशी शिष्यवृत्तीची अवस्था झाल्याने पालकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.

प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीमध्ये १ लाखाच्या आत उत्पन्न व गुणवत्तेच्या निकषावर शिष्यवृत्ती मंजुर झाल्यावर दरवर्षी १००० रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केले जायचे. अल्पसंख्यांक असल्याचे तसेच उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र पालकांकडून घेऊन ते शाळास्तरावर ठेवले जात असे. यावर्षी शाळांकडून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे नवीन व रिनीवल शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाईन भरले. शाळास्तरावर व्हेरीफाय केलेले फॉर्म दोन वेळा नाकारले गेले.

अल्पसंख्यांक असल्याबाबत तसेच उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र ग्राहय धरले जाणार नसल्याचा फतवा केद्रशासनाकडून निघाला आहे. तहसीलदारांकडून घेतलेला दाखलाच ग्राहय धरण्यात येईल, असे त्यात म्हटले असून तो ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे. वरील दोन्ही प्रकारचे दाखले काढण्यासाठी आता पालकाना तालुक्‍याची पायपीट करावी लागणार असून ३ ते ४ फेऱ्या माराव्या लागणार आहेत. त्यासाठी पाचशे ते एक हजार रूपये खर्च होणार असल्याने पालक चिंताग्रस्त आहेत. तहसीलदारांचे दाखले प्राप्त करणे हे बहुतांश पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

"अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सच्चर कमिटीच्या अहवालानुसारच ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली. १० ते १२ वर्षे अविरतपणे या योजनेचा लाभ शाळांमार्फत केलेल्या प्रयत्नांमुळे लाभार्थीना मिळाला. मात्र, सदर दाखल्यांची पूर्तता पालकांकडून होणे अशक्‍य असल्याने बहुतांश अल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे .त्याशिवाय प्रशासनाकडून मुख्याध्यापकाना धारेवर धरले जाऊ शकते. ही योजना पूर्वीप्रमाणेच लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत."

- अहमद नाडकर, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना रत्नागिरी

"यंदा केंद्र शासनाकडून शिष्यवृत्तीसाठी घातलेल्या जाचक अटी पूर्ण करणे सामान्य पालकांना न परवडणाऱ्या आहेत. एक हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी तेवढेच रुपये खर्च करून दाखले गोळा करण्यापेक्षा ही शिष्यवृत्ती नसलेली बरी, असे म्हणण्याची वेळ आली."

- मोअज्जम ठोकण, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, म्हाप्रळ उर्दू शाळा

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com