रत्नागिरीतील हर्णे येथे शाळा आपल्या दारी उपक्रम  

राधेश लिंगायत
Thursday, 22 October 2020

हर्णे विद्यामंदिर हर्णे संस्था, शालेय समिती व एन डी गोळे हायस्कूल यांनी एकत्रित बैठक घेऊन "शाळा आपल्या दारी" हा उपक्रम हाती घेतला

हर्णे : कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हर्णेमधील एन. डी. गोळे हायस्कूल या शाळेने शासनाचे सर्व नियम पाळून "शाळा आपल्या दारी" हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांनी देखील चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत तरी असा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही राबवला नसल्याचं दिसून येत आहे.

जागतिक पातळीवरच्या कोरोनाच्या महामारीमुळे मार्च २०२० पासूनच सर्व शाळा कॉलेज बंद झाले आहेत. त्यामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. परंतु, बहुतांशी ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे नेटवर्कच नसल्याने त्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळच होत आहे. अशीच परिस्थिती हर्णेसारख्या गावामध्ये आहे. ३ जूनला जे निसर्ग वादळ येऊन गेले त्यामध्ये आयडिया व व्होडाफोन कंपनीचा टॉवरच पूर्णपणे कोसळला. त्यामुळे गावामधील रेंज गेली. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी रेंज आली ती सुद्धा अद्याप धड नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. 

याचाच विचार करून हर्णे विद्यामंदिर हर्णे संस्था, शालेय समिती व एन डी गोळे हायस्कूल यांनी एकत्रित बैठक घेऊन "शाळा आपल्या दारी" हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमामध्ये शिक्षकांनी गावातील सर्व वाडी, पेठा, मोहल्ल्याच्या प्रमुखांना व अध्यक्षांना एक लेखी पत्र दिले की जे विद्यार्थी एन.डी. गोळे हायस्कुलमध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या परवानगीने सभागृहात किंवा मंदिराच्या सभामंडपात अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षकांना त्यांचा अभ्यास घेण्यास परवानगी द्यावी. त्याप्रमाणे पालकांनी याला सहमती दिली. त्यानुसार सर्व शिक्षक आळीपाळीने प्रत्येक वाडी मोहल्ल्यामध्ये जाऊन कोव्हिडं 19च्या पार्श्वभूमीवर सॅनिटायजर, मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग मध्ये मुलांना शिकवत आहेत. यावेळी मुलांनी केलेला अभ्यास पहाणे, अभ्यासबाबत त्यांना मार्गदर्शन करणे, काही शंका असल्यास त्या निरसन करणे. या बाबी हाताळल्या जात आहेत. यामध्ये शाळेतील मुख्याध्यापक - श्री. तानाजी लेंडवे, व अशोक साळुंखे, महेंद्र सागवेकर, प्रवीण देवघरकर, प्रशांत गुरव, संदीप क्षीरसागर, श्रद्धा शिंदे, मनीषा जोशी, हे शिक्षक या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे गावामधून शाळा व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

हे पण वाचागॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी  : अनुदान बंद  

"कोव्हिडं 19 च्या महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचा अक्षरशः याठिकाणी रेंजअभावी बट्याबोळ झाला आहे. म्हणूनच आम्ही शाळेने आणि संस्थेने हा उपक्रम हाती घेण्याचे ठरवले. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्याप्रकारे संवाद साधला जात आहे. मुलांच्या समस्यांचे निरसन करता येत आहे. आता हा उपक्रम संपूर्ण शाळा चालू होईपर्यंत चालू राहील", असे शाळेचे मुख्याध्यापक तानाजी लेंडवे यांनी सांगितले. 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School at home Undertaking in Harnai Ratnagiri