रत्नागिरी : कासवांचा प्रवास खोल समुद्राकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासवांचा प्रवास खोल समुद्राकडे

रत्नागिरी : कासवांचा प्रवास खोल समुद्राकडे

रत्नागिरी: वन्यजीव संस्था आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षाने सॅटलाईट टॅग केलेली चार कासवं गेल्या चार महिन्यांत पुन्हा महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे फिरकलेली नाहीत. त्यांचा प्रवास किनाऱ्याकडून खोल समुद्राकडे सुरू आहे. खोल समुद्रात मिळणारे विपुल खाद्य, प्रवासातील धोके टाळणे यासह विणीचा हंगाम संपुष्टात आल्याची निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहेत. रेवा, वनश्री ही कासवं राज्याला वार्षिक भेट देत असावीत, असाही अंदाज बांधला जात आहे.

विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासव कोकणातील विविध किनाऱ्या‍वर येतात. ती कुठून येतात, त्यांचा प्रवास कसा होतो, ते किती वेळा अंडी घालतात यावर अभ्यास करण्यासाठी सॅटेलाईट टॅगिंग केलेली पाच कासव समुद्रात सोडण्यात आले. दोन दिवसांपूर्वी चार कासवांची माहिती पुढे आली आहे. रेवा आणि वनश्री फेब्रुवारीमध्ये गुहागरमधून टॅग करून समुद्रात सोडले होते. त्यातील रेवाने दक्षिणेकडे एका सरळ रेषेत प्रयाण केले. ती पुन्हा कधीच महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेली नाही. दोन महिन्यांच्या काळात ती कर्नाटकातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचली आणि आता तिथून अरबी महासागरातील खोल समुद्राकडे जात आहे. तिचा भ्रमणमार्ग बदलल्याची माहिती पुढे आली आहे. किनारपट्टीजवळ राहिल्यानंतर तेथील अन्न रेवासाठी उरले नसल्याचा अंदाज आहे. रेवासह वनश्रीही सातत्याने दक्षिणेतील समुद्रातच वाटचाल करत आहे. वनश्रीनेही गुहागरला अंडी घातल्यानंतर पुन्हा राज्याला भेट दिलेली नाही. कदाचित दोघींनी या अगोदर अंडी घातली असावी आणि दुसऱ्यांदा गुहागरची अंडी घालण्याची दोघींचीही यंदाच्या ऋतुमानातील शेवटची वेळ असावी, असाही अंदाज बांधला जात आहे.

गेल्या महिनाभरापासून गुजरात राज्यातील खोल समुद्रात राहणारी प्रथमा ही पहिली ऑलिव्ह रिडले आता दीवच्या किनारपट्टीभागाच्या जवळ आढळून येत आहे. प्रथमाने उत्तरेकडील आगेकूच थांबवली असून, आती ती दक्षिणेकडे परत येत असल्याचे नुकत्याच केलेल्या पाहणीतून दिसून आले. काही कालावधीनंतर प्रथमा पुन्हा दक्षिणेकडे परतण्याची शक्यता आहे. सावनी हे सिंधुदुर्गजवळ असल्याची नोंद झाली असून, ते लवकरच दक्षिणकडे पुढे सरकू शकते. बहुतांशवेळी विणीचा हंगाम जवळ आला की कासवं किनाऱ्याच्या जवळपास दिसू लागतात. टॅग लावलेल्या कासवांचा प्रवास खोल समुद्राकडे होऊ लागला आहे. यावरून त्यांचा विणीचा हंगाम संपल्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळासह समुद्रात निर्माण होणाऱ्या विविध धोक्यांचा अंदाज आल्यामुळेही कासव किनाऱ्यावरून सुरक्षेसाठी खोल समुद्रात जाऊ शकतात, असेही निरीक्षक आहे.

सॅटेलाईट टॅगिंग केलेल्या कासवांचा अभ्यास केला जात असून, त्यांच्या प्रवासाविषयक निरीक्षणे नोंदवली जात आहे. कासवांचा प्रवास सुरू झाल्यानंतर चार महिने होऊन गेले आहेत. वर्षभरानंतर त्यावर निश्‍चित मत नोंदवता येईल.

- हर्षल कर्वे, निरीक्षक

Web Title: Sea Turtle Deep Sea National Geographi Rsn

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top