
रत्नागिरी : समुद्रशेवाळाचा प्रकल्प मिऱ्या, भाट्ये किनाऱ्यावरही
रत्नागिरी - मत्स्यविभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि केंद्रीय मत्स्यकी संस्था यांच्या वतीने गोळप येथील समुद्र शेवाळाची यशस्वी लागवड केली आहे. येथील किनाऱ्यावर टाकलेल्या साठ राफ्टमधून ५५० किलो उत्पादन मिळाले आहे. त्या शेवाळाचा उपयोग काळबादेवी येथे लागवडीसाठी केला आहे.
ग्रामीण भागातील महिला बचत सक्षमीकरणासाठी समुद्र शेवाळाची लागवड केली आहे. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून गोळप, मिऱ्या, भाट्ये आणि काळबादेवी येथील किनारे लागवडीसाठी निवडले आहेत. ''कप्पाफिकस्'' या जातीच्या समुद्रशेवाळाच्या लागवडीचा पहिला प्रयोग गोळप येथे करण्यात आला. त्यासाठी सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टिस्टूटचे डॉ. अजय नाखवा, मत्स्यकी संस्थेचे रामकुमार यांचे मार्गदर्शन लाभले. गोळप येथे १० बाय १० मीटरचे ६० राफ्ट तयार केला आहे. त्यात ५० किलो कप्पाफिकस् जातीची समुद्रशेवाळ टाकली होती. ४५ दिवसानंतर पूर्ण वाढ झालेली समुद्र शेवाळ या महिलांनी बाहेर काढली. ६० राफ्टमधून मिळून ५५० किलो शेवाळ काढण्यात आले. अवकाळी पावसामुळे समुद्र खवळलेला होता.
उधाणामुळे पाणी सतत हलत राहिल्याने शेवाळांच्या वाढीवर परिणाम झाला. काही शेवाळ तुटून गेली आहेत. या उत्पादनातून मिळालेल्या शेवाळांची पुन्हा लागवड केली गेली आहे. काळबादेवी येथे दहा नवीन राफ्ट टाकले आहेत. त्यामध्ये ५०० किलो शेवाळाची लागवड केली आहे. २० मेपर्यंत त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर ती काढली जाईल. याच पद्धतीने भविष्यात समुद्र शेवाळांचे उत्पादन वाढवण्यासाठी मिर्या, भाट्ये येथील किनार्यावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, सहाय्यक अमरीश मेस्त्री, लेखाधिकारी प्रवीण पाटील हे प्रयत्न करत आहेत.
Web Title: Seaweed Project Mirya Bhatye On Shore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..