ज्येष्ठ पत्रकार डॉ. एम. डी. शेकासन यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

संगमेश्वर तालुक्‍यातील कोंडिवरे हे मुळ गाव असलेल्या शेकासन यांचे कोकणातील समाजवादी चळवळीत मोठे योगदान होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. आचार्य अत्रे यांच्या दैनिक "मराठा'साठी ते कोकणातून वार्तांकन करत असत.

संगमेश्वर ( रत्नागिरी ) - गेली 45 पेक्षा अधिक वर्षे आपल्या लेखणीने समाजाभिमुख पत्रकारिता चळवळ जागृत ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार आणि समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते डॉ. एम. डी. शेकासन (वय 74) यांचे आज रत्नागिरीत हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. 

संगमेश्वर तालुक्‍यातील कोंडिवरे हे मुळ गाव असलेल्या शेकासन यांचे कोकणातील समाजवादी चळवळीत मोठे योगदान होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. आचार्य अत्रे यांच्या दैनिक "मराठा'साठी ते कोकणातून वार्तांकन करत असत. नंतरच्या काळात दैनिक "नवशक्ती'साठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे वार्तांकन केले.

कोकणच्या पत्रकारितेत आणि राजकारणात ठसा उमटवणारे (कै.) नाना जोशी यांच्या दैनिक "सागर'साठी काम सुरू केले. संगमेश्वरला पूर आला की, महामार्ग बंद व्हायचा. चिपळूणला पूर असला की "सागर'च्या प्रेसमध्ये बातमी पोचवणे अवघड व्हायचे; मात्र डॉ. शेकासन यांनी प्रसंगी पायी चालत जात आपल्या बातम्या मुख्यालयात पोचवल्या. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी पत्रकारितेचा वसा सोडला नाही. 

संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे ते संस्थापक सदस्य होते. समाजवादी चळवळीत सक्रिय सहभाग असल्याने (कै.) मधू दंडवते, नाथ पै. यांच्यापासून सर्व नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. सुरवातीला जनता पक्षाचे काम करणाऱ्या शेकासन यांनी नंतर जनता दलासाठी काम केले. त्यानंतर बरीच वर्षे ते कॉंग्रेससाठी सक्रिय होते. 

गुरुवारी रात्री त्यांना मधुमेहाचा अति त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ रत्नागिरीत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांचे निधन झाले. संध्याकाळी कोंडिवरे येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन आणि कॉंग्रेसचे युवा नेते हारिस शेकासन हे दोन सुपुत्र व परिवार आहे. संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Journalist Dr M D Shekasan No More