esakal | चाकरमान्यांची लगबग, सावंतवाडी आगार सज्ज, आरक्षण फुल्ल
sakal

बोलून बातमी शोधा

The servants had to wait for the return

कोरोनाचे सावट लक्षात घेता सणासाठी म्हणून अगदी महिना भरापूर्वीच चाकरमानी सावंतवाडी तालुक्‍यात दाखल झाले होते. 

चाकरमान्यांची लगबग, सावंतवाडी आगार सज्ज, आरक्षण फुल्ल

sakal_logo
By
भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुुदुर्ग) - तालुक्‍यात गणेशोत्सवासाठी अगोदर महिन्यापूर्वी दाखल झालेल्या मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना आता परतीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. या चाकरमान्यांच्या सेवेसाठी सावंतवाडी एसटी आगार सज्ज असून आगारातून आजपासून 30 ऑगस्टपर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत या गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. 

कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी सणासाठी चाकरमान्यांना आणण्यापासून ते त्यांना पुन्हा माघारी पोहचवण्यासाठी सावंतवाडी एसटी आगारामार्फत योग्य ते नियोजन केले जाते. यावर्षी कोरोनाची समस्या निर्माण झाल्यामुळे शासनाच्या नियमानुसार प्रवाश्‍यांची सुरक्षितता लक्षात घेऊन एसटी महामंडळ प्रशासनाने देखील काही खबरदारी घेत प्रवाश्‍याना सुखरूप जिल्ह्यात आणले.

कोरोनाचे सावट लक्षात घेता सणासाठी म्हणून अगदी महिना भरापूर्वीच चाकरमानी सावंतवाडी तालुक्‍यात दाखल झाले होते. 
दीड, पाच आणि सात दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. त्यामुळे मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना आता परतीचे वेध लागले आहेत. तालुक्‍यात जवळपास साडेतीन हजार चाकरमानी उतरले आहेत. त्यांनी गणेश विसर्जन करताच माघारी जाण्याची तयारी सुरू केली आहे. 

लांब पल्ल्याचे वेळापत्रक 
सोशल डिस्टन्सिंग पाळून तसेच एका सीटवर एक, मास्क बंधनकारक, असे नियम पाळूनच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जातो. सकाळी चार वाजता सावंतवाडी-बोरिवली बस तर उद्या (ता.29) सकाळी सावंतवाडी-बोरिवली सायंकाळी चार वाजता, सावंतवाडी-ठाणे, तसेच सावंतवाडी पुणे निगडी बस. 30 रोजी सकाळी चार वाजता सावंतवाडी-बोरिवली, सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी-ठाणे, त्याच वेळेत सावंतवाडी-पुणे - निगडी अशा लांब पल्ल्यांच्या साध्या परिवर्तन बसेस सोडण्यात येणार आहेत. 

आरक्षण फुल्ल 
30 रोजी सकाळी सात वाजता सावंतवाडी-पुणेसाठी विशेष शिवशाही बस सोडली जाणार आहे. दोडामार्ग एसटी आगारातून मुंबईसाठी सायंकाळी सहा वाजता दोडामार्ग-बोरिवली शिवशाही बस सोडली जाणार आहे. या लांब पल्ल्यांच्या बसेसचे आगाऊ आरक्षण फुल्ल झाले आहे. जसजशी प्रवाशांमधून मागणी वाढेल तसतसे गाड्यांचे वेळापत्रक वाढवण्यात येणार आहे. 

रोज दिडशे फेऱ्या 
परजिल्ह्यांसाठी मध्यम, लांब पल्ल्यांच्या सकाळी साडेसात वाजता रत्नागिरी, आठ वाजता दापोली, 10 वाजता रत्नागिरी, साडेदहा वाजता कोल्हापूर, साडेबारा वाजता देवरुख, एक वाजता रत्नागिरी आदी गाड्या रोज येथील आगारातून सोडण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाअंतर्गत तसेच स्थानिक पातळीवर चाळीस बसेस रोज धावत असून एसटीच्या रोज 150 फेऱ्या सुरू आहेत. 

मुंबई, पुणे तसेच मध्यम लांब पल्ल्यांच्या सर्व गाड्यांच्या आरक्षणसाठी ऑनलाईन बुकींगची सुविधा मोबाईल, इंटरनेट तसेच आगारात उपलब्ध करून दिलेली आहे. कुठूनही आरक्षण करता येईल. 
- मोहनदास खराडे, आगारप्रमुख, सावंतवाडी 

संपादन - राहुल पाटील