जाळ्यात अडकलेल्या जखमी गव्हाणी घुबडाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

जाळ्यामध्ये गुरफटल्यामुळे घुबडाला जखम झाली होती. त्यावर तात्पुरते औषधोपचार केले. त्यानंतर प्रीतमने ताबडतोब दापोली वनविभाग खात्याच्या अधिकार्‍यांना पाचारण केले. यावेळी वनपाल गणेश खेडेकर यांनी हजर होऊन घुबडाला ताब्यात घेतले. 

हर्णै (रत्नागिरी)- दापोली तालुक्यातील हर्णै येथे दुर्मिळ जातीच्या गव्हाणी घुबडाला येथील सर्पमित्र प्रितम साठविलकर याने जीवनदान देऊन वनविभागाच्या ताब्यात दिले.

बुधवारी (ता. 26) सकाळी आठच्या सुमारास हर्णै मल्लखांबपेठ येथील गणेश पावसे यांच्या टेरेसवर जाळ्यामध्ये अडकलेल्या अवस्थेत घुबड पावसे यांना दिसून आला. त्यांनी ताबडतोब सर्पमित्र प्रितम साठविलकर यास फोन करून बोलवून घेतले. प्रितम याने घटनास्थळी ताबडतोब येऊन त्याला जाळ्यामध्ये गुरफटलेल्या अवस्थेतून सोडवले. जाळ्यामध्ये गुरफटल्यामुळे घुबडाला जखम झाली होती. त्यावर तात्पुरते औषधोपचार केले. त्यानंतर प्रीतमने ताबडतोब दापोली वनविभाग खात्याच्या अधिकार्‍यांना पाचारण केले. यावेळी वनपाल गणेश खेडेकर यांनी हजर होऊन घुबडाला ताब्यात घेतले. 

हर्णैमध्ये मिळालेले घुबड जखमी असल्यामुळे त्याच्यावर दापोली पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून उपचार करून घेणार आहे. त्यानंतर तो बरा होईपर्यंत वनविभागाकडे सुरक्षित ठेवण्यात येणार असून तो बरा झाल्याचा दाखला वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येईल, असे वनपाल गणेश खेडेकर यांनी सांगितले.

यापूर्वीही प्रीतमने घुबडाला दिले होते जीवदान

यापूर्वी हर्णैमध्येच प्रीतमने पाच वर्षांपूर्वी गव्हाणी जातीच्या घुबडाला येथील ग्रामस्थ ढेकणे यांच्याकडे पकडले होते. त्यावेळी मात्र ते घुबड उडत उडत येऊन ढेकणे यांच्या घरात बसले होते. हे घुबड व्यवस्थित असल्यामुळे त्याला ताबडतोब वनविभागाला त्याची माहिती देऊन त्याला प्रीतमनेच जंगलात सोडले होते. प्रीतम साठविलकर हा सर्पमित्र असल्यामुळे त्याने अनेक मोठमोठ्या सुस्थितीत व जखमी सापांना उपचार करून जंगलात सोडले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sev for Injured rescue in dapoli