
रोहा ते रत्नागिरी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 25 फेब्रुवारीला विजेवर इंजिन चालवून पाहण्यात आले.
लवकरच धावणार आता विजेवर कोकण रेल्वे ; सात डब्यांची रेल्वे रवाना
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते रोहा बहूप्रतिक्षीत विद्युती करणाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) तपासणी बुधवारी (ता. 25) झाली. सात डब्यांची रेल्वे विजेवर चालवत रत्नागिरीतून दुपारी 3 वाजता रवाना झाली. या पथकाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर काही दिवसातच विजेवर गाड्या सुरु करता येणार आहेत.
रोहा ते रत्नागिरी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 25 फेब्रुवारीला विजेवर इंजिन चालवून पाहण्यात आले. कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेतलेली ही पहिली चाचणी होती. त्यानंतर काही दुरुस्त्याही इंजिन चालवून करण्यात आल्या होत्या. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी) तपासणी केल्यानंतरच मालवाहतूक आणि प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी दिले जाते.
मध्य रेल्वेची हे सुरक्षा पथक गुरुवारी रत्नागिरीत दाखल झाले होते. रोहा येथुन सात डब्यांची गाडी डिझेल इंजिन लावून रत्नागिरी रेल्वे स्थानकात आणली गेली. रत्नागिरीतून ती दुपारी 3 वाजता विजेवर चालवत रोह्याकडे रवाना झाली. यामध्ये इलेक्ट्रीक विभागासह सुरक्षा पथकातील तज्ज्ञ अधिकारी सहभागी झालेले आहेत. ही गाडी रोह्याला सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत पोचेल असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा- अन् वाहू लागले बोअरवेलला गरम पाणी
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी केंद्र शासनाने 1100 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. रत्नागिरी ते रोहा 204 किलोमीटरच्या विद्युतीकरणाला डिसेंबर 2018 मध्ये आरंभ झाला. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र यासह टनेल, पुल येथून विज वाहिन्या, विद्युत खांब उभारली आहेत. वाहिन्यांमधून करंट सोडण्याची चाचणी 22 फेब्रुवारीला झाली. त्यानंतर आता सीआरएस तपासणी केल्यामुळे प्रत्यक्षात वाहतूक सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गाडी रोह्याला पोचल्यानंतर त्याचा अहवाल सीआरएस पथकाचा अहवाल कोकण रेल्वेला प्राप्त होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय गुप्ता यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारताना महिन्याभरात विजेवर गाड्या सुरु होतील असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार कार्यवाही सुरु असून आयुक्तांकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर पहिली मालगाडी चालवण्यात येणार आहे.
संपादन- अर्चना बनगे
Web Title: Seven Coach Train Left Ratnagiri 3pm Electricity Konkan Railway Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..