शिकारीस चाललेल्या सात तरुणांना अटक, तिघे फरार

मुझफ्फर खान
Monday, 19 October 2020

संशयितांपैकी तिघे फरारी झाले असून, सात जणांना अटक करण्यात आली.

चिपळूण (रत्नागिरी) : विनापरवाना बंदूक घेऊन दोन गाड्यांतून जंगली प्राण्यांची शिकार करण्यास निघालेल्या तरुणांना शनिवारी (१७) मध्यरात्री दोनला चिपळूण - शिरवली - मिरवणे रस्त्यावर चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दोन विनापरवाना बंदुका, दोन चारचाकी वाहने, बॅटरी, जिवंत काडतुसे असा एकूण दोन लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संशयितांपैकी तिघे फरारी झाले असून, सात जणांना अटक करण्यात आली.

हेही वाचा - प्रस्तावित बांदा-संकेश्‍वर महामार्ग होणार तरी कसा?

याबाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री चिपळूण पोलिस गस्तीवर असताना चिपळूण येथील शिरवली-मिरवणे बायपास रस्त्यावर मध्यरात्री दोनला एका पिकअप गाडीतून काही तरुण जंगलाकडे जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे गाडी अडवून चौकशी केली असता, विनापरवाना २२ हजारांची १२ बोअरची डबल बॅरल बंदूक, ३६० रुपये किमतीची काडतुसे, १०० रुपये किमतीची बॅटरी आढळली. विनापरवाना बंदूक घेऊन हे तरुण जंगली प्राण्यांची शिकार करण्यास निघाले होते, असे चौकशीत निष्पन्न झाले. 

या प्रकरणी नीलेश अशोक लाड (वय ३२), राजेश सत्यवान लाड, तेजस सत्यवान लाड आणि यश या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश लाड याला अटक केली असून, अन्य तीन जण फरारी झाले आहेत. त्यांच्याकडून पिकअप गाडीसह एकूण एक लाख १२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच परिसरात त्याच रात्री चिपळूण पोलिसांनी शिरवली फाटा येथे आणखी एक गाडी पकडली. त्या गाडीत सहा तरुण होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता, तेही विनापरवाना बंदूक घेऊन जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी निघाले होते.

हेही वाचा - मालवणी माणूस ब्रॅण्ड अम्बॅसिडर -

या प्रकरणी आदित्य अनंत चव्हाण, सोहम कैलास कदम, चेतन सदानंद रसाळ, अमर सदाशिव चव्हाण, संकेत अनंत चव्हाण, सागर अशोक वाघमारे या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ हजार रुपये किमतीची १२ बोअर सिंगल बॅरल बंदूक, ३६० रुपये किमतीची जिवंत काडतुसे, १०० रुपयांची बॅटरी आणि गाडी असे एकूण एक लाख ६८ हजार ५१० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मन्सूर मणेर, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव जाधव, पोलिस कॉन्स्टेबल लालजी यादव, आशिष भालेकर, पपू केतकर आणि दिलीप जानकर या पोलिस पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक मन्सूर मणेर अधिक तपास करीत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven people hunted in forest but police search all and 3 people are abs volt volt in chiplun ratnagiri