दुर्मिळ शेकरूला तळेरेत जीवदान 

नेत्रा पावसकर
Thursday, 28 January 2021

उंच झाडावर असल्याने आणि पक्षी मागे लागले असल्यने शेकरुला वाचविणे अवघड होते. त्यामुळे त्या झाडावर चडून पकडण्याचा प्रयत्न केला.

तळेरे (सिंधुदुर्ग) - राज्य प्राणी असलेला शेकरु याला आज येथील बसस्थानक परिसरात पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अत्यंत दुर्मीळ असलेला हा प्राणी आकर्षक आणि दुर्मीळ असतो. देवगड, खारेपाटण आणि कासार्डेच्या वनरक्षकांनी त्याला पकडून त्यावर प्रथमोपचार करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

आज सकाळी तळेरे बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या झाडावर जखमी शेकरु प्राणी होता. त्याच्या मागे पक्षी लागले होते. तेथील अभिषेक वाल्येकर याने पाहिले आणि पक्षांना हाकलविण्याचा प्रयत्न केला; मात्र पक्षी जात नव्हते. ही बाब दिलीप तळेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी देवगड वनरक्षक रानबा लक्ष्मण बिक्कड यांना पाचारण केले. 

त्यानंतर खारेपाटणचे वनरक्षक विश्वनाथ माळी आणि कासार्डेचे वनरक्षक माणिक शेगावे त्याठिकाणी उपस्थीत झाले. उंच झाडावर असल्याने आणि पक्षी मागे लागले असल्यने शेकरुला वाचविणे अवघड होते. त्यामुळे त्या झाडावर चडून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते खाली पडले आणि त्याचवेळी कुत्र्याने त्याला चावा घेतला. अशा परिस्थितीतही शेकरुला वाचविण्यासाठी रानबा बिक्कड यांनी कुत्र्याच्या तोंडातून शेकरुला काढून घेतले. त्यावेळी शेकरुने बिक्कड यांच्या हाताला चावा घेतला; मात्र, जखमी शेकरुला पकडून त्यावर तळेरे पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shekru animal saved talere konkan sindhudurg