शेकापचा फॉर्म्युला कोकणात पुन्हा यशस्वी

महेश पांचाळ
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीला अनेक प्रयत्न करूनही फारसे यश प्राप्त करता आले नव्हते. मात्र, शेकापने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी महाआघाडी करत, कोकण शिक्षक मतदारसंघातून शेकापच्या बाळाराम पाटील यांना निवडून आणले. गेले अनेक वर्षे भाजप पुरस्कृत रामनाथ मोते यांच्याकडे असलेल्या या विधान परिषदेतील मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपने यंदा मोते यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली, त्यांची उमेदवारी बाळाराम पाटील यांच्या पथ्यावर पडली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी हाडवैर असतानाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यात शेकापने राष्ट्रवादीशी जुळवून घेतले. कॉंग्रेसचे मन वळवून रायगड जिल्ह्यात शेकाप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महाआघाडीचा प्रयोग करण्यात आला. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 17 पैकी 17 जागा या महाआघाडीला मिळाल्यानंतर, भाजपला जिल्ह्यात रोखण्याचे काम सुरू झाले. पनवेलचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार दिवंगत दत्तू पाटील यांचा मुलगा बाळाराम पाटील हे गेले दोन वेळा पनवेल विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. बाळाराम पाटलांना कोणत्याही परिस्थिती आमदार करून, दत्तू पाटील यांना दिलेले वचन पूर्ण करीन, असे शेकापचे माजी आमदार विवेक पाटील हे खासगीत सांगत असायचे.

शेकापच्या दृष्टीने खडतर असलेल्या शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत शेकापची व्यूहरचना यशस्वी ठरली. बाळाराम पाटील यांच्या विजयामुळे केवळ पनवेल विधानसभा मतदारसंघात नव्हे तर कोकणात भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीला कसे यशस्वी झाले,याची राजकीय गणिते मांडली जाण्याची शक्‍यता आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी सलगी साधून महाराष्ट्रात वेगळी समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुण्यात शेकापमध्ये प्रवेश केला. त्यामुळे, शेकापचे अस्तित्व रायगड जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याचे बोलले जात असले तरी, बाळाराम पाटील यांच्या विजयामुळे पुन्हा एकदा शेकाप पक्ष कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये नव्हे तर राज्याच्या राजकारणात नव्याने चर्चेत आला आहे.

Web Title: shetkari kamgar paksha, congress, ncp alliance wins in kokan