'भाजपचा बार फुसका ; शिवसेनाच सुसाट'   

मुझफ्फर खान
Monday, 25 January 2021

निवडणुकीपूर्वी भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या आव्हानाला निवडणूक निकलानेच उत्तर दिले आहे

चिपळूण - गुहागर मतदारसंघातील १०८ ग्रामपंचायती पैकी १०२ ग्रामपंचायतींवर निर्विवादपणे शिवसेनेचा भगवा फडकला आहे, असा  दावा आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. 

निवडणुकीपूर्वी भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या आव्हानाला निवडणूक निकलानेच उत्तर दिले आहे. त्यांचा बार फुसका ठरला असून एकाही ग्रामपंचायतीत ते भाजपचे स्वतंत्र पॅनल उभे करू शकलेले नाहीत. असा टोला आमदार जाधव यांनी यांना लगावला आहे. 

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुहागर मतदारसंघातील निवडणुकीचा लेखाजोखा जाधव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. ते म्हणाले ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्यानंतर माझ्या मतदारसंघातील गुहागर, खेड आणि चिपळूण या तीन तालुक्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी मी स्वतः आढावा बैठका घेऊन नियोजन केले होते. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका घ्यायच्या होत्या त्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व कसे राहील याची दक्षता घेण्यात आली होती. तसेच पॅनल उभे करताना शिवसेनेचेच पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.

भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष माझ्या मतदारसंघात असल्याने आणि त्यांनी निवडणुकीपूर्वीच राणा भीमदेवी आवेशात आव्हान दिल्याने मी वेळीच सावध झालो आणि थेट निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयार केले होते. मला माझ्या विकास कामावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे भाजपच्या आव्हानाला उत्तर न देता मी निवडणूक निकालातूनच उत्तर दिले आहे.

गुहागर तालुक्यातील एकूण २३३ जागांपैकी १८७ जागा शिवसेनेने जिंकल्या तर चिपळूण तालुक्यातील २८६ जागापैकी १७८ आणि खेड तालुक्यातील २३६ जागांपैकी २१६ जागा शिवसेनेने जिंकल्या असल्याची माहिती यावेळी जाधव यांनी यावेळी दिली. निवडणुका संपल्या राजकारण संपले आता विकासाच्या दिंडीमध्ये सामील व्हा असे आवाहन देखील  जाधव यांनी यावेळी केले. मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मोठा विजय मला दिला. हा विजय मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करतो. तसेच गुहागर मतदारसंघातील जनतेला हा विजय समर्पित करत असल्याचे ते म्हणाले.

हे पण वाचा -  मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात

 

चिपळूण बाबत ते म्हणाले चिपळूणचा आमदार असताना तालुक्यातील अनेक महत्वाच्या ग्रामपंचायतींवर निर्विवाद भगवा फडकवला होता. यावेळी माझ्याकडे जबाबदारी नव्हती. चिपळूणची जबाबदारी जर असती तर चित्र वेगळे दिसले असते असे सूचकपणे ते म्हणाले. मला आता गुहागर पुरते मर्यादित राहायचे नाही. मला विस्तारित राजकारण करायचे आहे.असेही ते म्हणाले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader bhaskar jadhav criticism on bjp