भाजप नेत्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते ; विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जुलै 2020

नारळाचे झाड आणि सुपारी जिल्हाधिकारी यांना देणार्‍या भाजप नेत्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला त्यांनी भाजपचे आमदर प्रसार लाड यांना लगावला.

रत्नागिरी : अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली भारतीय जनता पक्षातील काही मंडळी कोकणात फिरत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणी जनतेच्या भावनेशी खेळण्याचे काम ते करत आहेत. मागील सरकारने जे केले नाही, ते महाविकास आघाडीचे सरकार करून दाखवले, असा विश्वास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त करीत नारळाचे झाड आणि सुपारी जिल्हाधिकारी यांना देणार्‍या भाजप नेत्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला त्यांनी भाजपचे आमदर प्रसार लाड यांना लगावला.

कालच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणची अपरिमित हानी झाली. यावर मदत म्हणून सरकारने नुकसानग्रस्त बागायतदारांना सरकारने नारळाला 250 रुपये आणि सुपारीला 50 रुपये नुकसान भरपाईची मदत जाहीर केली. ही नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप करीत प्रसाद लाड आक्रमक झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत नसल्याचे सांगत प्रसाद लाड यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून सुपारी आणि नारळाचं झाड देत महाआघाडीच्या सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला. सरकार कोकणातल्या बागायतदारांची क्रूर थट्टा करीत आहे. वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार्‍या कोकणवासियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे कामच हे सरकार करत आहे. याचा तीव्र निषेध त्यांनी केला.

हे पण वाचा - कोकणच्या पोरी हुशारच ; दहावीत दोघींनी मिळविले शंभर टक्के गुण

  शिवसनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, कोकणी जनतेच्या आरोग्याचे काही देणेघेणे नाही. कोकणी जनता आणि शिवसेना यांच्यात कशी दरी निर्माण होईल, यासाठी या नेत्यांचे प्रयत्न चालले आहेत. मागील सरकारने जे केले नाही ते महाविकास आघाडीचे सरकार करून दाखणार हे निश्‍चित आहे. मात्र नारळाचे झाड आणि सुपारी जिल्हाधिकारी यांना देणार्‍या भाजप नेत्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena mp vinayak raut criticism on bjp leder prasad lad