शिवसेनेचे दिग्गज भाजपच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

जिल्ह्यात ताकद असलेल्या शिवसेनेतील नाराजांवर भाजपचा डोळा आहे.

रत्नागिरी : भाजपने रत्नागिरीसह जिल्ह्यात पाय पसरण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात ताकद असलेल्या शिवसेनेतील नाराजांवर भाजपचा डोळा आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप गळ टाकून आहे. सेनेच्या ज्येष्ठ नेत्याच्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गाठीभेटी घेतल्या. लवकरच ते पुन्हा रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत.

हेही वाचा -  मल्चिंग पेपरमुळे तरली भातशेती -

सेनेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, शहरातील पदाधिकारी, असे सेनेतील दिग्गज भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. साम, दाम, दंड, भेद आदीचा वापर करून सेनेचे खच्चीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून भाजप अपयशाचा पाढा गिरवत आहे. पहिले दोन आमदार असलेल्या भाजपकडे केंद्रात सत्ता असताना आता एकही आमदार नाही. ग्रामपंचायतीदेखील हातातून गेल्या आहेत. जिल्ह्यात भाजप वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात भाजपला भरपूर काम करण्याची गरज आहे.

आगामी ग्रामपंचायत, पालिका आदी निवडणुकांवर भाजपचा डोळा आहे. या निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मरगळ झटकण्यासाठी भाजपचे जोरदार कार्यक्रम सुरू आहेत. पक्ष बांधणीला आणि अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशसरचिटणी रवींद्र चव्हाण यांनी सर्वांना कानमंत्र दिला. जिल्ह्यात मजबूत असलेल्या शिवसेनेतील नाराजांना भाजपमध्ये घेण्याचा खेळ त्यांनी सुरू केला आहे.

रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उत आला. नाराज पंडित भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली. पंडित यांनी नकारही दिलेला नाही आणि होकारही दिलेला नाही. शिवसेनेत असे अनेक नाराज आहेत. पदाच्या रूपात मिळणारा घास त्यांच्याकडून काडून घेतला आहे. वारंवार होणाऱ्या अन्यायामुळे त्यांची मानसिकता बदलू लागली आहे. भाजपकडून ठोस आश्‍वासन मिळाल्यानंतर सेनेतील काही दिग्गज भाजपच्या गळाला नक्की लागण्याची चर्चा आहे. याला भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. 

हेही वाचा - पाऊस गेला, सिंधुदुर्गात गुलाबी थंडीची चाहूल - ​

दिग्गजांची जंत्री भाजपकडे

रवींद्र चव्हाण आणि भाजपचे काही पदाधिकारी कामाला लागले आहेत. बैठकांवर बैठका सुरू आहेत. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शहरातील काही पदाधिकारी, प्रमुखपद भोगलेले काही पदाधिकारी अशी दिग्गजांची जंत्री भाजपकडे आहे. भाजपला जिल्ह्यात उभारी देण्यासाठी आणि पक्ष वाढविण्यासाठी जे करता येईल ते करण्याच्या सूचना भाजपने दिल्या आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena political leaders is on BJP routed in ratnagiri its political changes