शेकडोंच्या उपस्थितीत शिवरायांना मानवंदना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाकडे मान्यवरांची पाठ
महाड - शिवरायांचे गुणगान गाणारे पोवाडे, मावळ्यांनी काढलेली मिरवणूक, महाराजांना मानवंदना आणि विविध पुरस्कारांचे वितरण असे भरगच्च कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर मंगळवारी शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत झाले.

रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाकडे मान्यवरांची पाठ
महाड - शिवरायांचे गुणगान गाणारे पोवाडे, मावळ्यांनी काढलेली मिरवणूक, महाराजांना मानवंदना आणि विविध पुरस्कारांचे वितरण असे भरगच्च कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर मंगळवारी शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत झाले.

शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या मावळ्यांनी अवघा किल्ला भगवा झाला होता; मात्र, महाराष्ट्र व राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसह कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी पाठ फिरवल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी होती.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समितीच्या वतीने रायगडावर दरवर्षी तिथीनुसार शिवपुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होतात. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी सोमवार (ता. 10) पासूनच गडावर हजेरी लावली होती. शिवसमाधीची विधिवत पूजा करण्यात आली. राजदरबारामध्ये शिवपुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यासह सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री प्रकाश महेता आदी उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी होती.

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार भरत गोगावले आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. अभिनेते राहुल सोलापूरकर, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आदी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

बलकवडे यांना पुरस्कार
राजदरबारावर सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. गडारोहण स्पर्धेत यश मिळवणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. "शिवरायमुद्रा' या स्मरणिकेचे प्रकाशनही रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी दिला जाणारा "शिवपुण्यस्मृती' हा पुरस्कार इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांना प्रदान करण्यात आला.

सुशासनाची शपथ
हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांच्या वंशजांसह सैन्यातील निवृत्त लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांचा समितीतर्फे गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी राज्यातून विविध ठिकाणांहून आलेले महापौर, नगराध्यक्ष, सभापती आदींनी चांगले प्रशासन करण्याची शपथ घेतली. त्यानंतर राजदरबार ते शिवसमाधीपर्यंत शिवप्रतिमेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: shivaji maharaj death anniversary