संस्थानसाठी पायाभूत सुविधा विस्तारल्या

बापूसाहेब महाराजांनी सावंतवाडी संस्थानच्या प्रगतीसाठी येथील पायाभूत सुविधांवर काम केले. रस्ते मजबूत केले. काही ठिकाणी पूल बांधले. सावंतवाडीत वीजसुविधा निर्माण केली.
Sawantwadi Power station building
Sawantwadi Power station buildingsakal
Summary

बापूसाहेब महाराजांनी सावंतवाडी संस्थानच्या प्रगतीसाठी येथील पायाभूत सुविधांवर काम केले. रस्ते मजबूत केले. काही ठिकाणी पूल बांधले. सावंतवाडीत वीजसुविधा निर्माण केली.

बापूसाहेब महाराजांनी सावंतवाडी संस्थानच्या प्रगतीसाठी येथील पायाभूत सुविधांवर काम केले. रस्ते मजबूत केले. काही ठिकाणी पूल बांधले. सावंतवाडीत वीजसुविधा निर्माण केली. पुढच्या टप्प्यात त्यांना घाटरस्त्यांचा विस्तार करून कर्नाटक आणि कोल्हापूरशी व्यापाराच्या दृष्टीने अधिक घट्ट नाते तयार करायचे होते; मात्र दुर्दैवाने तितका कालावधी त्यांना मिळाला नाही.

ब्रिटिशांनी आपल्या सोयीपुरत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या. यात प्रामुख्याने बेळगाव आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या रस्त्यांचा तसेच काही बंदरांचा समावेश होता. संस्थानच्या ग्रामीण भागात तसेच निमशहरी भागात पायाभूत सुविधा यथातथाच होत्या. अनेक गावे पावसाळ्यात जगापासून तुटलेली असायची. बापूसाहेब महाराजांनी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला. अर्थात संस्थानचे उत्पन्न मर्यादित होते. त्यातही त्यांनी अनेक कामे केली.

वीज सुविधा त्या काळात संस्थानात पोहोचली नव्हती. बापूसाहेब महाराजांना याचे महत्त्व माहीत होते. सावंतवाडी शहरात ऑक्टोबर १९३४ ला विद्युत पुरवठ्याची योजना त्यांनी अंमलात आणली. त्या काळात शहराला केसरी येथील नळपाणी योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवले जायचे. ही योजना रघुनाथ महाराजांच्या कालखंडात उभारली होती. गुरुत्वाकर्षणावर आधारित या योजनेचे पाणी शहरात सर्वदूर पोहोचविणे कठीण जायचे. विशेषतः सालईवाड्यात याचे पुरेसे पाणी पोहोचत नव्हते. १९३५ मध्ये बापूसाहेब महाराजांनी नळपाणी योजना विस्ताराचे काम हाती घेतले. ज्या भागात पाणी कमी पडते, तेथे विहीरी खोदण्यात आल्या. विजेच्या मदतीने पंपाद्वारे याचा उपसा करून ते उंच ठिकाणी उभारलेल्या टाक्यांमध्ये पोहोचविले जायचे. तेथून नळाला पाणीपुरवठा व्हायचा. या बदलामुळे पाण्याचा प्रश्‍न बऱ्याचअंशी सुटला.

संस्थानातील अनेक प्रमुख रस्ते त्यांनी पक्के बनविले. माणगाव खोऱ्याला जोडणारा पापडीवजा पूल त्यांनी उभारला. ‘श्रीराम कॉजवे’ असे नाव दिलेल्या या पुलाची उभारणी १९३३ मध्ये झाली. कोल्हापूरला सावंतवाडी संस्थान जवळच्या मार्गाने जोडावे हा या मागचा उद्देश होता. त्यांना माणगाव खोऱ्यातील हनुमंत घाटातून कोल्हापूरसाठी रस्ता काढायचा होता. तसे झाल्यास सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर कमी होणार होते. कोल्हापूर, आजरा, संकेश्‍वर, निपाणी या मोठ्या बाजारपेठा सावंतवाडी संस्थानला व्यापारी दळणवळणाच्यादृष्टीने जोडण्यासाठी हा पूल उभारला गेला होता.

त्या काळात पब्लिक ट्रान्स्पोर्ट मर्यादित होता. पक्के रस्ते नसल्यामुळे याच्या विस्ताराला मर्यादा आल्या होत्या. महाराजांनी मोटर सर्व्हीसला योग्य होतील असे बरेच नवे रस्ते बनविले. याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होऊ लागला. या संदर्भातील जयराम गणेश नाईक यांनी लिहून ठेवलेला किस्सा बराच बोलका आहे. एकदा बापूसाहेब महाराजांचा आरोंदा गावात चार दिवस मुक्काम होता. ते पहाटे उठून फिरायला जायचे. असेच सकाळी फिरायला जात असताना वळणावळणाने जाणाऱ्या रस्त्याऐवजी त्यांनी जवळच्या शेतातून जाणार्‍या बांधावरून जाणे सोपे होईल, असा विचार केला. ते रस्त्यावरून खाली शेतात उतरले. दोन-चार पावले पुढे टाकतात इतक्यात तेथे जवळच काम करीत असलेला एक शेतकरी त्यांच्याकडे पाहून ओरडून म्हणाला, ‘अरे वाटसरू, वाट कुठे आणि तू चालतो आहेस कुठे?

आमच्या सरकारने एवढा चांगला रस्ता बांधला असताना तो तुला दिसत नाही का? याला म्हणावे तरी काय?’ या अनपेक्षित प्रतिक्रियेने महाराज नकळत मागे फिरले आणि रस्त्यावरून चालू लागले. काही वेळातच त्या शेतकऱ्याला रस्त्यावरून जाणाऱ्या इतरांनी ते स्वतः सरकार असल्याचे सांगितले. शेतकऱ्याला वाईट वाटले. महाराज उतरले होते त्या ठिकाणी जाऊन लोटांगण घालून तो माफी मागू लागला. मघाशी आपल्याला ओळखले नसल्यामुळे आपण तसे बोललो, अशी विनवणी करू लागला. महाराजांनी त्याला हाताने उठवून ‘तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका’ असे सांगितले; पण त्या शेतकऱ्याने दिलेली प्रतिक्रिया त्या काळात बापूसाहेब महाराजांनी केलेल्या पायाभूत सुविधांसाठीच्या कामाची एक प्रकारे पोचपावती होती.

...आणि पाणीप्रश्‍न सुटला

महाराजांचा मुक्काम एकदा कुडाळ येथे होता. त्यांचे तंबू होते तेथून जवळच चर्मकार समाजाची वस्ती होती. हे रहिवासी अनेकवर्षे पाणीटंचाईचा सामना करत होते. विहीर नसल्याने ते वस्तीच्या जवळच असलेल्या शेतातील डबक्यामध्ये साठलेले घाणेरडे पाणी पिण्यासाठी नेत असत. बापूसाहेब महाराजांनी ही स्थिती पाहिली. महाराजांनी त्या रहिवाशांना बोलावून घेतले. पाण्यासाठी विहीर का बांधत नाही, असे विचारले असता याच्या बांधकामासाठी लागणारे तीनशे रुपये आपल्याकडे नाहीत, असे त्यांनी सांगितले. ‘तुम्ही विहीर खणून तयार करत असाल तर ती मी बांधून देतो,’ असा पर्याय महाराजांनी सुचवला. लोकांनी ते कबुल केले. पुढच्या काही दिवसांत महाराजांनी आपला शब्द पाळत लोकांनी खणलेली विहीर आपल्या खर्चाने बांधून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com