esakal | `या` गावातील शिवसैनिकांना हवी रिफायनरी, आयलॉग प्रकल्प 
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Activist From Sagve Nate Wants Refinery Project

प्रकल्पविरोध हा केवळ दिखावा असून देवळात, मांडावर नारळ ठेऊन शपथा घालणे, वाळीत टाकणे, दंड बसविणे अशा प्रकारांमुळे उघडपणे समर्थन करण्यासाठी कोणीही पुढेही येत नाही

`या` गावातील शिवसैनिकांना हवी रिफायनरी, आयलॉग प्रकल्प 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी) - कोकणामध्ये रोजगार नाही. त्यातच, उपलब्ध असलेली उत्पन्नाची साधनेही बेभरवशी झाली आहेत. विविध कारणांमुळे कोकणचा विकास रखडला आहे. पुरेशा पटसंख्येअभावी शाळा-महाविद्यालये बंद पडू लागली आहेत. कोकणातील सध्याची ही प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यासह विकासाला चालना देणारे रिफायनरी आणि आयलॉग प्रकल्प मार्गी लावावेत, अशी भावनिक साद सागवे आणि नाटे विभागातील शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांना घातली आहे. 

कोरोनाच्या महामारीमध्ये मोठ्यासंख्येने गावाला आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांना नोकरीचा प्रश्‍न भेडसावत आहे. त्यांच्यासह चाकरमान्यांना रोजगार देण्यासाठी रिफायनरीसह आयलॉगसारख्या प्रकल्पांना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे मत या शिवसैनिकांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केले आहे.

प्रकल्पविरोध हा केवळ दिखावा असून देवळात, मांडावर नारळ ठेऊन शपथा घालणे, वाळीत टाकणे, दंड बसविणे अशा प्रकारांमुळे उघडपणे समर्थन करण्यासाठी कोणीही पुढेही येत नाही. राजकीय पक्षांनी याठिकाणी मतांचे राजकारण केले. मात्र त्याचवेळी आम्हाला पक्षाने थोडेजरी पाठबळ दिले असते तरी आज चित्र वेगळे दिसले असते.

आम्ही समर्थकांना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी, ही एकच इच्छा होती. परंतु ते झाले नाही, अशी खंतही व्यक्त केली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या केवळ एका आदेशावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात पक्षनिष्ठेतून रान उठविणाऱ्या शिवसैनिकांना दलाल ठरविण्यात आले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी या प्रकल्पांची आवश्‍यकता असून प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सेनेच्या जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर, माजी विभागप्रमुख राजा काजवे, मंगेश मांजरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर, विलास अवसरे, डॉ. सुनील राणे, विद्या राणे यांनी केली आहे. 

विरोधात काम करणाऱ्यांना जवळ केल्याची खंत 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांनी मतदान केले नाही, आमदार राजन साळवी यांचे मताधिक्‍य घटल्यावर कात्रादेवी येथे ज्यांनी फटाके वाजविले, पक्षपमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेवेळी ज्यांनी काळे झेंडे दाखविले अशांना आपण जवळ केले. पक्षपमुखांवर अर्वाच्य भाषेत टीका करणाऱ्या स्वयंघोषित नेत्याला गाडीतून घेऊन फिरलात. एवढेच नव्हे तर भर सभेमध्ये आपल्या बाजूच्या खुर्चीत बसायचे स्थान दिले हे कट्टर शिवसैनिकांसाठी अत्यंत खेदजनक बाब असल्याचे सागवे आणि नाटे विभागातील शिवसैनिकांनी स्पष्ट केले आहे. 

संपादन - राजेंद्र कृष्णराव घोरपडे
 

 
 

loading image