सेना-भाजपच्या दिलजमाईसाठी हालचाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

रत्नागिरी - युतीमुळे शिवसेना-भाजपचे ताणलेले संबंध जुळविण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने भाजप आणि शिवसेनेची महत्त्वाची बैठक शुक्रवारी (ता. १५) मुंबईत होणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म पाळण्याबाबत निर्णय होणार आहे.

रत्नागिरी - युतीमुळे शिवसेना-भाजपचे ताणलेले संबंध जुळविण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने भाजप आणि शिवसेनेची महत्त्वाची बैठक शुक्रवारी (ता. १५) मुंबईत होणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म पाळण्याबाबत निर्णय होणार आहे. खासदार विनायक राऊत यांनी याला दुजोरा देत बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल. युती म्हणून एकदिलाने काम करू, असा विश्‍वास व्यक्त केला.  

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच राज्यात शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. गेली पंचवीस ते तीस वर्षांपासून युती म्हणून दोन्ही पक्ष एकत्रित काम करीत आहेत. मात्र गेल्या निवडणुकीनंतर युतीतील संबंध अधिक ताणले गेले. भाजपची केंद्र आणि राज्यात सत्ता आल्याने सेनेला निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले. 

शतप्रतिशत भाजपचा नारा देत भाजपने सेनेची चांगलीच फरफट केली. सेनेनेदेखील ताठर भूमिका घेत अनेक वेळा भाजपला कोंडीत पकडले. यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले. परंतु लोकसभा निवडणुकीला महाआघाडीला तोंड देण्यासाठी युती महत्त्वाची आहे, हे लक्षात आल्यानंतर युतीची घोषणा झाली. 

जिल्ह्यात मात्र युतीला भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. त्यासाठी मंगळवारी (ता. १२) जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीतही विनायक राऊत ऐवजी वेळप्रसंगी घटकपक्षाला मदत करण्याची भूमिका भाजपने व्यक्त केली. सेना कार्यकारिणीचीही बैठक झाली. परंतु त्यांनी मवाळ भूमिका घेत युती धर्म पाळण्याचा निर्णय घेतला. राऊत यांनी पाच वर्षांमध्ये भाजपला काडीची किंमत दिली नाही. भाजपच्या लोकांची विकासकामे केली नसल्याचा रोष आहे. त्यामुळे बैठकीत थेट युतीला विरोध केला.

सकारात्मक निर्णय होणार
पाली येथे झालेल्या चर्चेमध्ये विनायक राऊत म्हणाले, युतीमध्ये काहीशी कटुता आहे, मात्र युती म्हणून भाजपचे सर्व लोक काम करतील. मने जुळण्यासाठी १५ तारखेला मुंबईत बैठक आहे. त्यामध्ये युती धर्म पाळण्याबाबत नक्की निर्णय होईल. मी भाजपच्या लोकांना डवलले असे काही नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena BJP alliance issue in Ratnagiri