esakal | कणकवली उड्डाणपुलावर वाहतूक रोखली 

बोलून बातमी शोधा

shivsena movement kankavli sindhudurg district}

अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांना मोबाईलवरून शहरातील महामार्गाच्या त्रुटी दूर केल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नाही, असे आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. 

kokan
कणकवली उड्डाणपुलावर वाहतूक रोखली 
sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरासह राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात खारेपाटण ते झारापपर्यंत ज्या समस्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही, असा इशारा आज शिवसेनेच्यावतीने देण्यात आला. येथील गडनदी पुलावर शिवसेनेच्यावतीने आज पहाटेपासून सुरू झालेल्या पुलावरील वाहतुकीची मार्गिका रोखण्यात आली. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांना मोबाईलवरून शहरातील महामार्गाच्या त्रुटी दूर केल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नाही, असे आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. 

शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना अध्यक्ष ऍड. हर्षद गावडे, भास्कर राणे, विलास कोरगावकर, गौरव हर्णे, संजय मालंडकर, राजू राणे, राजू शेट्ये, महेश कोदे यांच्यासह ग्रामस्थ, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
शहरातील गडनदी ते जानवली नदीपर्यंत जवळपास दीड किलोमीटरचा उड्डाणपुलाच्या 2 मार्गिका आजपासून सुरू करण्यात आल्या होत्या. जानवली पुलापासून गडनदीपर्यंत येणाऱ्या उड्डाणपुलावरून एक मार्गिका पूर्णतः सुरू करून वाहतूक सुरू झाली होती. याबाबतची माहिती सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर शिवसेना नेते पारकर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गडनदी पुलाजवळ सकाळी बाराच्या सुमारास वाहतूक अडविण्यास सुरुवात केली.

या कालावधीत तुरळक वाहने पुलावरून ये-जा करू लागली होती. त्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक जगदीश बांगर यांचे पथक दाखल झाले. तोपर्यंत शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. याच कालावधीत श्री. पारकर यांनी अधीक्षक अभियंता विवेक नवले यांच्याशी संपर्क साधून महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांत सुरू असलेले संगनमत उजेडात आणले; मात्र अधीक्षक अभियंत्यांनी त्यांना आश्‍वासीत केले, की जोपर्यंत शहरातील अर्धवट कामे पूर्ण होत नाहीत आणि लोकांच्या प्राधिकरणाकडून समस्या पूर्ण केल्या जात नाहीत. तोपर्यंत उड्डाणपुल सुरू करणार नाही. 

दरम्यान, पारकर म्हणाले, ""महामार्गाच्या चौपदरीकरणाचा "आरओडब्ल्यू'ची हद्द निश्‍चित करून घ्यावी. बांधकामाच्या दर्जाबाबतचा अहवाल जनतेसाठी खुला करावा. महामार्गावरील पूर्वीचे रिक्षा थांबे, शहरातील महामार्गावरील शौचालयाचा प्रश्‍न, जिल्ह्यातील वाहनांसाठी टोल माफी असे विविध प्रश्‍न अर्धवट आहेत; मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने हे उड्डाणपुल सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार हाणून पाडू. महामार्ग सुरू करण्यासाठी इतकी घाई का? लोकांचे अनेक प्रश्‍न आहेत. या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक जणांचे जीव गेले आहेत.

शहरातील बॉक्‍सवेलची भिंत कोसळली, त्याबाबतचा ऑडिट अहवाल अद्याप आला नाही. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी सुद्धा बॉक्‍सवेल काढून टाकण्याबाबत आदेश दिले होते; मात्र त्यांच्या आदेशाला हरताळ फासण्यात आला. आमचा विकासकामाला विरोध नाही; मात्र जिल्ह्यातील जनतेला जो मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तो पहिला दूर करावा. प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या आहेत. त्यांचे प्रश्‍न सोडवावेत. अनेकांना मोबदला मिळालेला नाही. शहरातील तर अनेक प्रश्‍न आहेत. पर्यायी रस्ते संपूर्ण शहरामध्ये कमी-जास्त प्रमाणात आहेत. यामध्ये काही लोकांना वगळून रस्ते पूर्ण केले आहेत.'' 

"आम्ही कणकवलीकर'चा पाठिंबा 
शिवसेनेच्या या आंदोलनाला आम्ही कणकवलीकर संघटनेचे अध्यक्ष पत्रकार अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्री आदींनी आज पाठिंबा जाहीर केला. श्री. पारकर यांची आणि शिवसेनेची भूमिका रास्त आहे. जोपर्यंत कणकवली शहराचे प्रश्‍न सुटत नाहीत, तोपर्यंत उड्डाणपूल सुरू करता येणार नाही आणि आम्ही त्याला आम्ही सहमत आहोत, असे यावेळी सांगण्यात आले. 

अशा आहेत प्रमुख मागण्या 
- शिवरायांचे स्मारक बांधा 
- सीमांकन निच्छीत करा 
- पर्यायी रस्त्यांची रूंदी समान ठेवा 
- रिक्षा थांब्यांची गरज 
- शहरात शौचालये आवश्‍यक 

संपादन - राहुल पाटील