राणेंचा जनता दरबाराचा दिखावा कशाला ? शिवसेनेचे विलास साळसकर यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न सोडवले जात आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या अथक प्रयत्नातून जनतेच्या प्रश्नांचा निपटारा होत आहे.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या जनता दरबारावर शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष विलास साळसकर यांनी टीका केली. राणे यांनी घेतलेल्या जनता दरबाराचा फज्जा उडाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जनता दरबार घेण्याचे त्यांना कधी सुचले नाही आणि आता दिखावा कशासाठी? असे साळसकर यांचे म्हणणे आहे. 
श्री. राणे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. याअनुषंगाने श्री. साळसकर यांनी टीकास्त्र सोडले.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील जनता नारायण राणेंच्या पोकळ घोषणांना कंटाळली. जनता लांब जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जनता संवाद कार्यक्रम घेतला. आमदार नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना नारायण राणे यांना जनता दरबार घ्यावा लागणे ही नामुष्कीच आहे. आमदार राणेंना मतदार संघातील जनतेचे प्रश्‍न समजत नाहीत की जनता त्यांना स्विकारत नाही म्हणून नारायण राणे यांना धावपळ करावी लागते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न सोडवले जात आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या अथक प्रयत्नातून जनतेच्या प्रश्नांचा निपटारा होत आहे. त्यामुळे नारायण राणेंनी कितीही धावाधाव केली, जनतेप्रती कळवळा दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा काहीही उपयोग नाही. गेली सुमारे 25 वर्षे प्रश्‍न सोडविता आलेले नाहीत त्यांनी आता जनतेचे प्रश्न समजून घेवून काय करणार हे जिल्हावासियांना माहिती आहे. जिल्ह्यातील सत्तास्थाने हातून निसटत असल्याचे लक्षात आल्यावर शेवटचा उपाय म्हणून धडपड असल्याचा टोला साळसकर यांनी लगावला आहे. 

जिल्ह्याचे अनेक वर्षे नेतृत्व केलेल्या नेत्याला जनतेच्या जवळ जाण्यासाठी अशी धावाधाव करावी लागणे दुर्दैवी आहे. जनतेचे प्रश्न समजण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये जायचे असते. त्यांच्याशी आपुलकीने, प्रेमाने संवाद साधून लोकप्रतिनिधींविषयी विश्वासाहर्ता निर्माण करुन जबाबदारी पार पाडायची असते. यामध्ये आमदार राणे कमी पडल्याने नारायण राणे यांना धावाधाव करावी लागते. यातून काहीही साध्य होणार नाही. 
- विलास साळसकर 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Vilas Salaskar Criticism On MP Narayan Rane