काँग्रेस आघाडीतील बंडखोरी 'येथे' सेनेच्या पथ्यावर  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Wins Due To Congress Crosses Ratnagiri Marathi News

लांजा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करून नगराध्यक्षपदासाठी राजू राणे यांच्यासारखा जनमानसात वावरणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती.

काँग्रेस आघाडीतील बंडखोरी 'येथे' सेनेच्या पथ्यावर 

लांजा ( रत्नागिरी ) - तालुक्‍याचे ठिकाण असलेल्या लांजा या शहरावर गेली अनेक वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता नव्हती. मात्र सांमत बंधुनी लावलेला जोर व निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची करून एकहाती सत्ता आली आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना विचार करण्यास भाग पाडणारी ठरली आहे. काँग्रेस आघाडीमधील बंडखोरीचा फायदा शिवसेनेला झाला. 

लांजा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करून नगराध्यक्षपदासाठी राजू राणे यांच्यासारखा जनमानसात वावरणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती. या विरोधात शिवसेनेकडून उमेदवार निवड होण्यापूर्वीच बंडखोरी झाली होती. ही बंडखोरी शमविण्यासाठी रत्नागिरीतून मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. सांमताच्या एन्ट्रीमुळे लांजाच्या शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या होत्या. मात्र मागे न हटणाऱ्या सामंत बंधूंनी यश मिळवून दाखवले. 

राष्ट्रवादीच्या वाघधरेंची बंडखोरी सेनेस फायद्याची

या निवडणुकीत सर्वच ताकद लावल्याने भाजपकडून प्रतिष्ठापणाला लावण्यात आली. भाजपचे नेते नीलेश राणे यांनी लांजात ठाण मांडल्याने भाजपमध्ये नवसंजीवनी आली. मात्र भाजपमधील बंडखोरी ते थांबवू शकले नाहीत. कॉंग्रेस आघाडी सक्षमपणे लढण्यास तयार असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपदा वाघधरे यांनी बंडखोरी केली. हीच बंडखोरी शिवसेनेला फायदा देऊन गेल्याचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांची बेरीज स्पष्टपणे अधोरेखित करते. 

कुरूप यांचा पराभव जिव्हारी

लांजा नगरपंचायतीत शिवसेनेला मिळालेले यश हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, नेते यांचे आहे. मात्र मावळते नगराध्यक्ष राजू कुरूप यांचा पराभव जिव्हारी लागला आहे. 
- मनोहर बाईत, नूतन नगराध्यक्ष, लांजा नगरपंचायत 

कुवेतील मताधिक्‍याने बाईतांचा विजय सोपा 

निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर बाईत यांना कुवे गावातील प्रभाग 17 मध्ये मताधिक्‍य मिळाले. या प्रभागातील सचिन डोंगरकर या नगरसेवकपदाच्या उमेदवाराने सर्वाधिक मते शिवसेनेकडे वळवून दिली. स्वतःबरोबर नगराध्यक्ष बाईत यांना विजयी केले. कुवे गावचे शिवसेनेचे शाखाप्रमुख असलेले सचिन डोंगरकर यांनी पोलिस, पंचायत समिती वरिष्ठ लिपिक पदावर काम केले आहे. लांजा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. या नगरपंचायतीत कुवे गावाचा समावेश झाल्याने सचिन डोंगरकर यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देत गेल्यावेळी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांना अपयश आले होते. यावेळी नगरपंचायत नगराध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने सचिन डोंगरकर यांनी नगराध्यक्षपदाची तयारी सुरू केली होती. ऐन निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी इच्छूक वाढल्याने सचिन डोंगरकर यांना थांबवून नगरसेवकपदाची उमेदवारी देण्यात आली. पक्षाच्या आदेशाचे पालन करीत स्वतःबरोबरच नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाईत यांना मताधिक्‍य मिळवून दिले.  

 
 

Web Title: Shivsena Wins Due Congress Crosses Ratnagiri Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..