तंत्रशिक्षण पदविका प्रवेशावरून विद्यार्थ्यांत आहे `ही` चिंता

Short Period For Admission To Diploma In Technical Education
Short Period For Admission To Diploma In Technical Education

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया 10 ते 25 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार असून त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. प्रवेशासाठी अवघे पंधरा दिवसांचा अल्पकालावधी उपलब्ध झाला आहे. गणेश चतुर्थीच्या तोंडावर कागदपत्रांच्या पूर्तता न झाल्यास विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. यामुळे विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

यंदाच्या वर्षासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रथम वर्ष एसएससी अभियांत्रिकी पदविका आणि औषध निर्माण शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष पोस्ट एचएससी अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. दोन दिवसापूर्वीच तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे; मात्र यंदा विद्यार्थ्यांना हे प्रवेश मिळण्यासाठी अत्यंत कमी कालावधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रीयेचा संदेश वेळेत न पोहोचल्यास त्याचा फटका प्रवेशकर्त्यांना बसू शकतो.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दिलेल्या कालावधीत प्रवेश घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांना कमी उत्पन्न गटाच्या व जातीच्या आरक्षणाद्वारे शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून फी सवलत प्राप्त होते. त्यामुळे आर्थिक मागास असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आपले स्वप्न पूर्ण करून तंत्रशिक्षण घेता येते.

गतवर्षी प्रवेश प्रक्रियेचा कालावधी 30 मे ते 18 जून एवढा तब्बल दीड महिन्याचा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारी आवश्‍यक कागदपत्रे सहज सेतू सुविधा केंद्रांमधून उपलब्ध करता येऊ शकली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमालाही सुरवात झाली होती. दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेत झाल्या तरी कोरोनामुळे त्यांचा निकाल मात्र उशिरा लागला. त्यातच अवघ्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. 

अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, आणि हॉटेल व्यवस्थापन यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची स्वप्ने बघितलेले असतात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिलेल्या कालावधीत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश मिळवण्यासाठी सुविधा केंद्रावर जाऊन त्यांना आपली ऑनलाईन नोंदणी करावी लागते.

त्यानंतर आवश्‍यक असलेली कागदपत्रे अपलोड करणे, आपल्याला हवे असलेले महाविद्यालय यांची निवड करणे आदी बाबी पूर्ण कराव्या लागतात. यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाते. या गुणवत्ता यादीवर हरकत असल्यास ती घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाते. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्यात येते. या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांची दिलेल्या वेळेत ऑनलाईन नोंदणी आणि कागदपत्रांची सादरीकरण सर्वात महत्त्वाचे असते.

ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील दुर्बल घटक व मागासवर्गीय आरक्षणातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची उपलब्धता नसते. विद्यार्थ्यांचे हे विविध दाखले बहुतांशी पालक दहावीनंतरच सेतू सुविधा केंद्रातून मिळविण्यासाठी धावपळ करतात. 

नोंदणीचे आवाहन 
जिल्ह्यामध्ये तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी पाच ठिकाणी सुविधा केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका, औषध निर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर जवळच्या सुविधा केंद्रावर आपली नोंदणी करून कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. 

एक नजर 
*नोंदणी, कागदपत्रे सादर करण्यास सुविधा केंद्रे - 5 
*अभियांत्रिकी पदविकेसाठी उपलब्ध जागा - 710 
*फार्मसी पदविकेसाठी उपलब्ध जागा - 360 
*दहावी उत्तीर्ण विद्यार्थी- 11 हजार 60 
*बारावी - 10 हजार 175. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com