लाॅकडाउनमुळे व्यवसाय ठप्प, गणरायाच्या प्रमुख नैवेद्याचाच तुटवडा

राजेश सरकारे
Friday, 28 August 2020

कणकवलीलगत असलेल्या गोपुरी आश्रमात तत्कालीन व्यवस्थापक अंकुश सावंत यांनी 2002 मध्ये काजू मोदकाची रेसिपी तयार केली. त्यानंतर जिल्हा आणि जिल्हाबाहेरील बचतगटांना काजू मोदकाचे प्रशिक्षण देण्यात आले.

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोकणात गणरायांना काजू मोदकांचा नैवेद्य प्रामुख्याने दाखवला जातो; मात्र यंदा लॉकडाउनच्या कालावधीत काजू मोदक करणारे छोटे उद्योग बंद राहिले. त्यामुळे बाजारात आलेला काजू मोदक पहिल्या दोन दिवसांतच संपला आहे. याखेरीज आंबा आणि खवा मोदकांचाही तुटवडा बाजारपेठांमध्ये निर्माण झाला आहे. 

कणकवलीलगत असलेल्या गोपुरी आश्रमात तत्कालीन व्यवस्थापक अंकुश सावंत यांनी 2002 मध्ये काजू मोदकाची रेसिपी तयार केली. त्यानंतर जिल्हा आणि जिल्हाबाहेरील बचतगटांना काजू मोदकाचे प्रशिक्षण देण्यात आले. इतर मोदकांपेक्षा काजू मोदकाची चव वेगळी असल्याने सिंधुदुर्गसह राज्यात काजू मोदकाला मोठी मागणी निर्माण झाली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील छोट्या आणि घरगुती उद्योजकांनाही यानिमित्ताने रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. 

यंदा कोरोनामुळे मार्च महिन्यापासूनच लॉकडाउन सुरू झाले. यात छोट्या आणि घरगुती उद्योजकांची आर्थिक घडी विस्कटली. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ देखील शेती क्षेत्राकडे वळले. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आजही काजू मोदक करणारे अनेक घरगुती, छोटे उद्योग बंद राहिले आहेत. तर यंदा काजू प्रक्रिया उद्योगही बंद राहिले आहेत. तरीही काही उद्योजकांनी काजू मोदक प्रक्रिया उद्योग सुरू केले; मात्र बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत राहिली.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांतच काजू मोदकाचा साठा संपुष्टात आला. काजू मोदक नसल्याने ग्राहकांकडून आंबा आणि खव्याच्या मोदकांची मागणी वाढली होती. यात गुजरात तसेच अन्य भागातून खव्याचा पुरवठा देखील आवश्‍यक त्या प्रमाणात होत नसल्याने या मोदकांचाही तुटवडा बाजारपेठेत निर्माण होत असल्याची माहिती मोदक विक्रेते व किराणा व्यावसायिक प्रथमेश चव्हाण यांनी दिली. 

ठाणेतील उद्योगांमधून चॉकलेट मोदक येथील बाजारपेठांत येतात; पण लॉकडाउनमुळे तेथील कारखाने बंद आहेत. तर फॅक्‍टऱ्यांमध्ये कामगार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे बाजारपेठांत काजू, आंबा, खवा, चॉकलेट आदी प्रकारचा मोदक कमी आहे. कोरोनामुळे कमी प्रमाणात ऑर्डर होती. त्यामुळे बाजारात मोदकांची टंचाई आहे.'' 
- राजन पारकर, व्यापारी कणकवली 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shortage of Cashew Modak in Konkan sindhudurg