सदर - सड्यांचे महत्व

सदर - सड्यांचे महत्व

रानभूल-लोगो

88981

इंट्रो

ज्वालामुखी आणि पृथ्वीच्या अंतर्भागात होणाऱ्या हालचाली यांचे होणारे दृश्य परिणाम म्हणजे भूपृष्ठ. कुठे मैदाने, कुठे घळी, कुठे मध्येच उगवलेले भव्य कडे आणि किनारी भागात सापडणारे सडे. खरंतर, सडे शब्द न ऐकलेला कोकणी माणूस सापडताना मुश्किलच; पण तरीही आजच्या काळात सड्यांचे महत्व जाणूनबुजून आणि शासनस्तरावर काही धोरणे आखून पद्धतशीर कमी केले जात आहे. म्हणूनच सडे ही परिसंस्था म्हणून कशी आहे, तिचं पर्यावरणीय महत्व काय आणि मानवीय जीवनसड्यांवर कसं अवलंबून आहे, हे समजून घेणं तितकच आवश्यक आहे.

- प्रतीक मोरे
Email ID: moreprateik@gmail.com

------
सड्यांचे महत्व

देवरूखमधून संगमेश्वरला जाताना साडवली गाव लागते आणि पुढे डाव्या हाताला दिसतो तो सपाट मैदानी प्रदेश, हा आहे सडा. गावात जाणारा एक रस्ता अगदी या सड्याच्या मध्यभागातूनच जातो. त्यामुळे अगदी गाडीतून फेरी मारतानासुद्धा या सड्यांची भव्यता सहज आपल्या नजरेत भरते. सर्वत्र असणाऱ्या घरइमारती, दुकाने, मंदिरे आणि या सर्वांच्या मधूनच आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला सडा आपलं स्वागत पाण्याच्या डबक्यात उगवलेल्या देवधानाच्या हिरव्यागार नजाकतीने करतो. ही पाण्याची तळी म्हणा, डबकी म्हणा तशी सीझनल. पावसाचं पाणी जमा करून ते अशा खोलगट भागात साचवून ठेवण्यात सडे पटाईत. काही ठिकाणी कातळ जमिनीच्या भेगा हेच पाणी भूगर्भात मुरवतात आणि शेजारच्या गावातील विहिरींना पाण्याच्या मुबलक पुरवठा करतात. याच तळ्यांमध्ये चढणीचे किंवा मळ्याचे मासे अंडी देण्यासाठी मान्सून सुरू झाला की, प्रकट होतात. अमेरिकेतील सालमोन माश्याप्रमाणे प्रजनन करण्यासाठी काही किलोमीटर अंतराचा जीवघेणा प्रवास करत अनेक अडथळे पार करत यांची चाललेली धडपड दरवर्षी पाहताना त्यांची चिकाटी आणि जिद्द यांचेच धडे कोकणी माणूस घेत असतो. या माश्यांची अंडी देऊन झाली की, यातलेच काही मासे शेतीची कामं करणाऱ्या श्रमजीवींची दिवसाची कॅलरीची गरज भागवतात. त्यासाठी बनवलेले कोईन, जाळी आणि बांबूचे उपयोग करून बनवलेले टुल्स हेही पाहण्यासारखे. याच शिकारीच्या स्वयंप्रेरणनेतून मानवी मेंदूचा विकास झालेला मानववंशशास्त्रात दिसून येतो. याच डबक्यामध्ये निरनिराळे बेडूक, अनेक प्रजातीचे खेकडे, चतूरसुद्धा प्रजनन करत असतात. त्यांची पिल्ले, अळ्या खाण्यासाठी इथे अनेक भक्षकसुद्धा लिलया दिसून येतात. अडई, पाणकावळे, वंचक, गायबगळे, करकोचे, इतर बगळे, क्वचित पलोवर, खंड्या असे अनेकविध पक्षी यांचं हे उदरभरण करण्याचं हक्काचं स्थान तसेच ब्राह्मणी घार, ससाणे आणि इतर शिकारी पक्षी दुरूनच हालचालींवर नजर ठेवून राहतात. टिटवी, लावे, चंडोल यांचंतर सडे हे घर त्यामुळे त्यांची घरटी अशाच गवताच्या आडोशाला आणि बऱ्याच वेळेला उघड्यावर असतात. त्यांची पिल्ले आणि नरमादीची धावपळ पाहण्याजोगी. याच डबक्यात बांध घालून त्याचं पाणी उताराने शेतीत नेलं जातं. जिथे मातीचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी पाणी अडवून पारंपरिक भाताची शेती केली जाते. पाण्याने वाहून आणलेली माती, गवताच्या काड्या आणि इतर पालापाचोळा जाळून भाजावळ करून या शेतीला पोषणमूल्ये पुरवली जातात. पावसाच्या पाण्यावर आणि भूगर्भातून छोटे झरे ज्यांना उपळाट म्हणतात यांवर अवलंबून असलेली ही शेती ही सड्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. शेती सोडून उरलेल्या सपाट जमिनीवर वेगवेगळी गवतफुले आणि कंदवर्गीय वनस्पती यांचा वर्षातून एकदा उगवणारा फुलोरा मोठ्या प्रमाणात उगवतो. यातील क्रिनम लीली, दीपकाडी, आषाढअमरी ही फुलं गुराखी आणि स्थानिक स्त्रिया यांना केसात माळण्यासाठी मिळालेली पर्वणीच जणू.
फोडशी, भारंगी, अळू, करांदे, चुका, टाकळा, कवळा यांची भाजी तर रसस्वाद वाढवणारी. शेतीच्या काळात मजुरी बंद असल्याने आणि बिघडलेले आर्थिक गणित सावरण्यासाठी या रानभाज्या मोलाची साथ देतात. मीठ, मिरची तेलावर होणाऱ्या या भाज्या आरोग्यवर्धक तेवढ्याच कमीत कमी खर्चिक. खेकडे, मासे हे तर खवय्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी हक्काचं फास्टफूड. सड्यांना अधिवास वगैरे शब्द न वापरता जीवनशैली म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे इथले माणूस, प्राणी-पक्षी आणि सर्व घटकांचे निर्माण झालेले सहजीवन. सडा शेती, पाणी आणि खाद्यविषयक अनेक गरजा लिलया भागवणारे सडे पावसाच्या सुरवातीच्या काळात अक्षरशः माणसांनी भरलेले दिसतात. याची अनेक कारणे आहेत. शेतीची कामे, स्वच्छ पाणी, शेवळासारख्या रानभाज्या मिळवण्यासाठी लोकांची सड्यावर झुंबड उडते; परंतु रात्रीच्यावेळी खेकडे आणि मासे पकडण्यासाठीसुद्धा अनेक लोक सड्यावर येतात आणि या प्रकारच्या पारंपरिक मासेमारीसाठी वेगवेगळ्या पद्धती वर्षानुवर्षे वापरात आहेत त्यातील एक पद्धत म्हणजे बांधण...
पोटात अंडी असणारे मासे संथ पाण्यात, डोहात अंडी सोडण्यासाठी पाण्याच्या उलट प्रवाहात वरच्या दिशेने प्रवास करतात. यांनाच मळ्याचे मासे अशा नावाने ओळखले जाते. रंगाने काळे असणारे, देखणे दिसणारे, सरळनेटक्या बांध्याचे हे मासे खायलादेखील खूप रूचकर लागतात. हे मासे खूप स्वच्छ असतात. त्यांच्या पोटात जास्त घाण नसते. हे मासे वेगवेगळ्या पद्धतीने पकडले जातात. पाट काढून मासे पकडले जातात. वरच्या दिशेने बांध घालून पाणी अडवून दुसऱ्या पाटाला घालवून कमी झालेल्या पाण्यातील मासे एकाने खाली हुसकवित चढणीचे मासे बांधनात पकडले जातात. नदीला मोठा बांध घातला जातो. मध्ये लाकडे, वासे टाकून फाडी पाडली जाते. त्या खाली टोके लावतात. टोक्यात मासे येण्यासाठी बांबूचे सक असतात. त्या सकातून मासे थेट टोक्यात जाऊन पडतात. टोक्यात दिवड हा बिनविषारी सापदेखील सापडतो. त्याला न मारता हाकलून दिले जाते. मोठ्या पावसात बहुतेक सर्व बांधने वाहून जातात. हे मासे विकत घेण्यासाठी गर्दी होते. पहिल्या पावसातील हे मासे खाण्यासाठी झुंबड उडते. आदिवासी महिला मासे विकायला गावातून येतात. या दिवसात खेडेगावात अनेकांच्या घरी माशांचेच कालवण असते.
बांधण घालण्यासाठी झाडांच्या फांद्या, गवतपेंढा, बांबू असे घटक वापरले जातात. अर्थात, माश्यांचा प्रजनन काळ असल्याने ही मासेमारी एका अर्थी त्या मत्स्य प्रजातींना त्यांच्या संख्येवर परिणाम करणारीसुद्धा ठरत असावी; परंतु स्थानिकांशी बोलले असता वर्षानुवर्षे पकडल्या जाणाऱ्या माश्यांची संख्या कमी होत नसल्याचे मत ऐकायला मिळते. अर्थात, यावर अजून शास्त्रीय अभ्यास होणे तितकेच गरजेचे आहे आणि यातूनच कदाचित सड्यांचे महत्व अबाधित राहून मासे पकडण्याचा आणि शाश्वत मासेमारीचा नवीन पर्याय समोर येऊ शकतो.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com