सिंधुदुर्ग : बापूसाहेबांनी शैक्षणिक प्रगतीचा रचला पाया

सावंतवाडी संस्थानात ब्रिटिशांनी आपल्या शासनकाळात शैक्षणिक क्षेत्रासाठी काम सुरू केले.
बापूसाहेबांनी शैक्षणिक प्रगतीचा रचला पाया
बापूसाहेबांनी शैक्षणिक प्रगतीचा रचला पायाsakal

सावंतवाडी संस्थानात ब्रिटिशांनी आपल्या शासनकाळात शैक्षणिक क्षेत्रासाठी काम सुरू केले. शाळा उभारल्या गेल्या; मात्र येथील शिक्षणक्षेत्रातील प्रगती खऱ्या अर्थाने बापूसाहेब महाराजांच्याच कार्यकाळात झाली. त्यांचे या विभागाकडे अधिक लक्ष असायचे. शिक्षणासाठी त्यांनी वेगळी आर्थिक तजबीज केली. यातून अनेक सकारात्मक बदल घडत गेले. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार शक्य तितका करावा, हे बापूसाहेबांचे धोरण होते. त्यांनी अगदी सुरुवातीला शिक्षण क्षेत्रात नेमके काय बदल करायला हवे हे ठरवण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली. यात प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ तथा मुंबई म्युनिसिपल स्कूल कमिटीचे सचिव रामभाऊ परुळेकर, पुणे येथील ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सी. रा. तावडे, एम. आर. परांजपे, रावसाहेब कुलकर्णी, के. बी. पाडगावकर, दादासाहेब सरदेशपांडे यांचा यात समावेश होता. या समितीने अहवालामध्ये संस्थानात शैक्षणिक प्रगतीसाठी काय करायला हवे याची योजना मांडली. १९३४ पासून यावर काम सुरू करण्यात आले.

याची योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून बोर्ड ऑफ एज्युकेशनची निर्मिती केली. शिक्षकांच्या नेमणुका किंवा बदल्या करण्याचा अधिकार या बोर्डाला देण्यात आला. नवीन शाळा स्थापन करण्याची व शाळांना कमी-अधिक प्रमाणात अनुदान देण्याची शिफारस हाच बोर्ड दरबाराकडे करत असे. प्राथमिक शाळांचा शिक्षणक्रम ठरवण्याबरोबरच इतर शैक्षणिक धोरणात्मक कामे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या धोरणाची अमंलबजावणी संस्थान विलीन होईपर्यंत सुरू होती. संस्थानातील जवळजवळ प्रत्येक खेड्यात चौथीपर्यंतची शाळा आणि मोठ्या गावात सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या.

शिक्षणाच्या प्रसारासाठी निधीची गरज होती. त्या काळात मंदी होती. यामुळे अ‍ॅक्ट्रॉय आणि तंबाखू लायसन्स यासाठी नव्याने शुल्क बसवण्यात आले. हे नवीन कर बसवून त्यातील उत्पन्न केवळ शिक्षणासाठी वापरण्याचे धोरण महाराजांनी ठरवले. हा निधी शिक्षण खात्यातील तुट भरून काढण्यासाठी न वापरता केवळ शिक्षण विस्तारासाठी वापरावा, अशा सूचना जारी केल्या. अ‍ॅक्ट्रॉयचे उत्पन्न संस्थानच्या अंदाजपत्रकात जमा न करता ते लोकल फंड बजेटमध्ये जमा व्हावे, असा कायदाच केला. शिक्षण खात्याचे स्वतंत्र अंदाजपत्रक बनवले जावू लागले. त्यातील शिल्लक इतर खात्यांप्रमाणे संस्थानकडे जमा होत नसे. हे अंदाजपत्रक स्वतंत्र असायचे. शिक्षण खात्याने दरवर्षी काय प्रगती केली हे दरबारतर्फे स्वतंत्र गॅझेट काढून जाहीर केले जात असे.

पूर्ण संस्थानात या बदललेल्या शिक्षण धोरणाचा परिणाम दिसू लागला. कुडाळ हायस्कूलच्या इमारतीसाठी संस्थानकडून भरिव निधी दिल्याच्या नोंदी आढळतात. शिक्षकांनी एटीसी व्हावे म्हणून त्यांना विशेष उत्तेजन आणि सवलती देण्याचे धोरण ठरवले. सावंतवाडी व कुडाळ येथील सरकारी शाळांमध्ये व्यायाम शिक्षणाची विशेष सोय केली होती. यासाठी प्रशिक्षीत व्यायाम शिक्षक नियुक्त केले होते. दवाखाने असलेल्या गावांच्या परिसरात शाळांमधील विद्यार्थ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी करण्याची पद्धत याचकाळात सुरू झाली. मराठी शाळांमध्ये प्रार्थना, नमस्कार असे उपक्रम धोरणात्मक बाब म्हणून अमलात आणले गेले. बापूसाहेब महाराजांनी तांत्रिक शिक्षणावरही विशेष भर दिला.

सावंतवाडीत १८८५ पासून तंत्रशाळा होती. कालांतराने याचे रूपांतर हायस्कूलमध्ये झाले. टोपीवाला मेमोरिअल टेक्नीकल स्कूल नावाने आजही हे विद्यालय सुरू आहे. पूर्वी यात सुतारकाम शिकवण्यात येत असे. महाराजांनी याचे कार्यक्षेत्र वाढवून विणकाम आणि छपाई याचे प्रशिक्षणही येथे सुरू केले. हायस्कूलमधील तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांना सुतारकाम, विणकाम आणि छपाई यापैकी कोणत्याही एका व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणे सक्तीचे करण्यात आले. अनेक शाळांमध्ये सुत कातण्याचे शिक्षण दिले जावू लागले. बांदा येथे मराठी शाळेतल्या वरच्या वर्गातील मुलांना कृषी शिक्षणाची सोय केली गेली.

महाराजांनी मुलांच्या क्रीडा विकासावरही भर दिला. वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू केले गेले. शाळांमध्ये बालवीर चळवळ सुरू करून त्याचा विस्तार केला गेला. त्या काळात शिक्षकांना इतर संस्थानामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्लक्षितच ठेवले जायचे. बापूसाहेब महाराजांना मात्र शिक्षणाचे महत्त्व समजले होते. त्यामुळे शाळा खात्यातील कर्मचारी आणि शिक्षकांना टाईमस्केल लागू करण्यात आले होते. इतर कोणत्याही खात्याला टाईमस्केल लागू नव्हते. शिक्षक प्रशिक्षीत असणे आवश्यक होते; मात्र ब्रिटीशांच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये सगळ्याच शिक्षकांना पाठवणे शक्य नव्हते त्यामुळे संस्थानात दरवर्षी शिक्षकांसाठी प्रशिक्षणही सुरू केली गेली. काही शिक्षकांना बाहेर ट्रेनिंगसाठी पाठवले जायचे.

संस्थानातील इंग्रजी व मराठी शाळांमधून मुलींना मोफत शिक्षण दिले जात अहे. सावंतवाडीत मुलींसाठी संपूर्ण प्राथमिक व इंग्रजीच्या तीन इयत्ता शिकवणारी शाळा होती. त्यात मुख्याध्यापिका पदवीधर होत्या. मुलींना चित्रकला, गायन शिकवण्याची व्यवस्था यात असायची. पहिल्या बॅचच्या मुली जशा शिकत जातील तसे वर्ग वाढवत मुलींसाठी स्वतंत्र हायस्कूल करण्याचे धोरण महाराजांनी जाहीर केले होते. त्या काळात शिक्षण परिषदाही घेतल्या जायच्या. १९३४ मध्ये सावंतवाडीत इंग्रजी व मराठी शाळेतील शिक्षकांसाठी अशी परिषद घेतल्याचे उल्लेख आढळतात. महाराजांनी राज्याचे अधिकार घेतले त्यावर्षी संस्थानात १५४ शिक्षण संस्था होत्या. त्यातील १३० सरकारी व २४ निमसरकारी होत्या. महाराजांच्या पूर्ण कार्यकाळात ही संख्या अनुक्रमे १९० व १५१ इतकी झाली. या सर्व शाळा मिळून विद्यार्थ्यांची संख्या ११,२९८ इतकी होती. यात २००८ मुली होत्या. शाळांच्या वाढत्या संख्येमुळे एज्युकेशन इन्स्पेक्टरच्या मदतीला एज्युकेशन सुपरव्हायझरची जागा निर्माण करण्यात आली.

शिक्षण प्रसार झाल्यावर त्यात सातत्य राखण्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्याचे धोरण ठरवण्यात आले. यासाठी फिरत्या वाचनालयांची योजना अमलात आणली गेली. संस्थानात अशी दहा वाचनालये सुरू करण्यात आली. शिक्षण विभागातील अधिकारी वेगवेगळ्या गावात शिक्षण प्रसारासाठी व्याख्यानेही द्यायचे. संस्थानात मुस्लिम समाजासाठी तीन स्वतंत्र उर्दू शाळा सुरू केल्या गेल्या. यात मुलींसाठी सावंतवाडीत स्वतंत्र शाळा होती. बांद्यात मराठी शाळांमध्ये उर्दू शिक्षणाची सोय केली गेली. सावंतवाडीत पर्शीयन भाषा शिकवणारा स्वतंत्र शिक्षक त्या काळात नियुक्त करण्यात आला. मागासवर्गीय समाजातील मुलांना मोफत शिक्षणाबरोबरच पाट्या, पुस्तके दिली जायची. शिवाय किंग एडवर्ड मेमोरियल फंडातून हुशार मुलांना शिष्यवृत्त्या मिळत असत. मागासवर्गात मुलांनाही शहरातील सर्व शाळात स्पृश्य विद्यार्थ्यांबरोबर प्रवेश दिला जायचा. कोणताही जातीय भेदभाव न करण्याचे धोरण शिक्षण क्षेत्रात होते.

प्रौढ साक्षरतेवरही भर

बापूसाहेब महाराजांनी प्रौढ शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी सावंतवाडीत साक्षरता प्रसार संघ स्थापन करण्यात आला. याचे अध्यक्षपद बापूसाहेब महाराज व राणी पार्वतीदेवी अशा दोघांनीही भूषवले होते. साक्षरतेचा प्रसार संस्थानात मोठ्या प्रमाणात झाला. अनेक प्रौढ शिक्षणप्रवाहात आले.

शैक्षणिक प्रगतीसाठी

शिक्षण प्रसारासाठी स्वतंत्र कर बसवल्याचे उल्लेख वर आलेच आहेत. याशिवाय संस्थानच्या खास उत्पन्नातून शेकडा बारा टक्के उत्पन्न शिक्षणावर खर्च केले जात असे. मुंबई सरकार किंवा त्याकाळात प्रगत संस्थान याच्याशी तुलना करतात सावंतवाडी लहान असूनही शिक्षणाच्या बाबतीत कुठेच कमी नव्हते.

शिक्षण सर्वोच्च !

शिक्षणाच्या बाबतीत महाराज किती संवेदनशील होते याचे उदाहरण म्हणून आरोंदातील जयराम गणेश नाईक यांनी लिहून ठेवलेला प्रसंग पुरेसा आहे. ते एकदा आरोंद्यातील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. अचानक आग्राळवाडीतील कुळाच्या देवळात जायचा कार्यक्रम ठरला. अनपेक्षीतपणे मंदिरात महाराज आल्यामुळे रहिवाशांनी गर्दी केली. त्यांनी महाराजांकडे आपल्या मुलांची प्राथमिक शिक्षणाची गैरसोय होत असल्याचा प्रश्‍न मांडला. महाराज म्हणाले, “सध्या आर्थिक मंदीचा प्रश्‍न दत्त म्हणून उभा आहे, तरीही शिक्षणाआड येणारी कोणतीही सबब पुढे करणार नाही. येथील रहिवाशांनी स्वखर्चाने शाळेची इमारत बांधून दिल्यास ठरावीक अनुदान द्यायला शिक्षण खात्याला भाग पाडेन.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com