

एखाद्या राजानं साहित्याची आवड जोपासणं कदाचित तितकंसं मोठं ठरणार नाही; मात्र बापूसाहेब महाराजांच्याबाबतीत ही गोष्ट नक्कीच विशेष होती. याचे कारण म्हणजे महाराजांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले होते. शिक्षणासाठीचा बराच कालावधी युरोपात गेला होता. त्यामुळे मराठी भाषेचे ज्ञान तोकडे पडत होते.
युरोपात जाण्याआधी त्यांनी मराठीचे प्राथमिक धडे गिरवले होते; मात्र दीर्घकाळ विलायतेत राहिल्यावर त्यांच्यावर अर्थातच इंग्रजीचा प्रचंड पगडा निर्माण झाला. इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने जिभेला आणि उच्चारांना विशिष्ट वळण लागले होते. त्याचा परिणाम त्यांच्या मराठी भाषेच्या उच्चारांवर होऊ लागला. बोलताना किंवा लिहिताना शब्द न आठवल्यामुळे त्यांना त्यांचे विचार शुद्ध मराठीत मांडणे कठीण व्हायचे. हे वैगुण्य त्यांच्या मनात रुतायचे.
राज्याधिकार स्वीकारल्यावर त्यांनी बराचसा कारभार मराठीत करण्याचा निर्णय घेतला. या बरोबरच स्वतः मराठीचा पायाभूत अभ्यास करण्याचा निश्चय केला. याबाबत त्या काळातील ज्येष्ठ साहित्यिक आणि युवराज शिवरामराजे भोसले यांचे शिक्षक असलेल्या वि. कृ. नेरूरकर यांनी सविस्तर संदर्भ लिहून ठेवले आहेत. यानुसार, १९२५ पासून त्यांनी मराठीच्या पहिल्या पुस्तकापासून अभ्यास सुरू केला. अगदी कमी कालावधीत त्यांनी सातवीपर्यंतची क्रमिक पुस्तके अभ्यासिली.
क्रमिक पुस्तके झाल्यानंतर त्यांनी मराठी काव्यग्रंथ वाचायला घेतले. याची सुरवात त्यांनी ‘नवनीता’पासून केली. ‘नवनीत’ याचा शब्दशः अर्थ लोणी. त्या काळातील संत, जुने कवी यांच्या श्रेष्ठ काव्यकृतींचा एकत्रित संग्रह यात होता. त्या काळात स्वतंत्र अभ्यासक्रम नसायचा; पण पाठ्याभ्यासात नवनीताचा समावेश असायचा. एक-दोन प्रकरणे वर्ज्य करून त्यांनी पूर्ण नवनीताचा अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणून संत वाङ्मय आणि जुने कवी यांच्या काव्याबद्दल त्यांना गोडी लागली.
यानंतर त्यांनी ‘दासबोध’ वाचला. त्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह वाढू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांनी पूर्वीही वाचले होते; पण ‘दासबोध’ वाचल्यानंतर त्यांनी पुन्हा महाराजांचे चरित्र व रामदास स्वामींचे चरित्र वाचले व अभ्यासले. शिवाजी महाराजांवरील इंग्रजी साहित्य, संशोधनात्मक माहिती याचाही अभ्यास सुरू केला. तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्यावर विशेष प्रभाव टाकरणारे ठरले. त्यांचे अभंग आणि ‘गाथा’ यांचे वाचन केले. हा गाथाग्रंथ कायमच त्यांच्यासोबत असायचा. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग त्यांना तोंडपाठ झाले. सावंतवाडी संस्थानातील गोपाळबोध मळगावकर, संत सोहिरोबानाथ आंबीये, टेंब्ये स्वामी आदी साधूपुरुषांचे संत वाङ्मयही त्यांनी अभ्यासले.
कादंबरी विश्वामध्ये ह. ना. आपटे यांचे साहित्य त्यांनी वाचले. वा. म. जोशी यांच्या सर्वाधिक कादंबऱ्या त्यांनी वाचल्या होत्या. नाथ माधवांची ‘स्वराज्य’ कादंबरीमाला त्यांनी पूर्ण वाचली होती. याशिवाय श्री. कृ. कोल्हटकर यांची ‘दुटप्पी की दुहेरी’ ही राजकारणावरील कादंबरी त्यांनी अभ्यासली. ‘माजी जिमीन’ ही लघुकथा आपल्याला फार आवडल्याचे महाराजांनी नेरूरकर यांना सांगितले होते. नाट्यवाङ्मयात त्यांनी खाडिलकरांची काही नाट्ये वाचली. गडकरींच्या नाटकांचा अभ्यास केला होता. ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाचा त्यांनी अधिक खोलवर जाऊन अभ्यास केला. या नाटकाविषयी नेरूरकर यांच्याशी चर्चा करताना त्यांनी मराठी भाषेच्या दृष्टीने, तसेच नाट्यशास्त्र व नाट्यतंत्र या अंगाने सांगोपांग चर्चा केली.
यावेळी या नाट्यकृतीतील काही त्रुटी त्यांनी मांडल्या होत्या. यावरून त्यांनी साहित्याचा किती खोल अभ्यास केला, याची प्रचिती येते. नाटकांचा अभ्यास कित्येक महिने सुरू होता. भाषेच्या मोहक खुबी आणि गुंतागुंती उकलण्यात त्यांना मजा वाटू लागली. विद्याधर वामन भिडे यांचे ‘म्हणी व वाक्यप्रचार’ हे पुस्तकही त्यांनी जिज्ञासू विद्यार्थ्याप्रमाणे अभ्यासले. निबंध वाङ्मयाचाही त्यांनी अभ्यास केला. रानडे, भांडारकर, आगरकर, चिपळूणकर यांचे निबंधग्रंथ त्यांनी वाचले.
‘भक्तिविजय’ ग्रंथ व ‘देवी भागवत’ हेही त्यांनी वाचले होते. ‘भक्तिविजया’ची तर त्यांनी अनेक पारायणे केली. तुकाराम महाराजांचे अभंग अनेकदा त्यांच्या बोलण्यातून उमटायचे. रघुनाथ पंडित यांचे ‘नल-दमयंती स्वयंवराख्यान’ हे त्यांचे अत्यंत आवडीचे काव्य. यातील काही कविता ते स्वतः गुणगुणायचे.
एकूणच, मराठी शिकण्यापासून त्यातील साहित्याचा अभ्यास करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अद्भुत होता. काहीही असले तरी त्याचा खोलवर अभ्यास करण्याचा त्यांचा स्वभावच होता. साहित्याची ते सूक्ष्मपणे छाननी करायचे. वरवर वाचून सोडून देणे त्यांना जमत नसे.
बहुजनांचा राजा
बापूसाहेब महाराजांचा सर्व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समानतेचा होता. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आणि कित्येक धोरणात्मक निर्णय आहेत. यातीलच एक प्रसंग - एकदा मुंबईत स्थायिक संस्थानातील चाकरमानी महाराजांना भेटायला आले. यात बहुसंख्य मराठा समाजातील होते. महाराजांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही मराठा पंतप्रधान (दिवाण) झाला नाही. तरी महाराजांनी यापुढे मराठा पंतप्रधान नेमावा, अशी मागणी त्यांनी केली. महाराजांनी सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि हसले. त्यांनी त्यांना प्रश्न केला की, ‘‘पंतप्रधान माझ्यावर अधिकारी म्हणून येणार की हाताखाली? अर्थात हाताखाली.
मग मी कोण आहे? मराठाच ना? मग मराठा पंतप्रधान येऊन विशेष काय करणार? माझ्यावर तुमचा विश्वास नाही का?’’ त्यांच्या या प्रश्नाने आलेले सर्वजण निरुत्तर झाले. शेवटी महाराज म्हणाले, ‘‘जसजशी बहुजन समाजाची माणसे शिकून तयार होतील, तसतसे त्यांना सेवेत सामावून घेतले जाईल; परंतु बहुसंख्यांचा बहुत फायदा हा न्याय असणार नाही. प्रत्येकाच्या न्याय्य हक्कांचे रक्षण आणि जीविताची शाश्वती हा न्याय असणार आहे.’’
कोण होते नेरूरकर?
बापूसाहेब महाराजांच्या साहित्यप्रेमाबाबत संदर्भ लिहून ठेवणारे वि. कृ. ऊर्फ विठ्ठल कृष्ण नेरूरकर हे त्या काळातील ज्येष्ठ साहित्यिक होते. त्यांच्या मालवणी भाषेतील अनेक कविता अजरामर झाल्या. ‘ठेय झिला घरची आठव रे! पाच तरी रुपये पाठव रे!!’ ही कविता आजही हृदयाचा ठाव घेते. ते मूळचे म्हापणचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. १९२५ मध्ये ते सावंतवाडीमध्ये आले.
सावंतवाडीच्या राजघराण्याचे ‘ट्युटर’ म्हणून त्यांनी काम सुरू केले. तत्पूर्वी १९२० मध्ये मालवणच्या एका शाळेत ते मुख्याध्यापक होते. आयुष्यभर त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. बापूसाहेब महाराजांशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्यांनी कथा, बालवाङ्मय, निबंधवाङ्मय, शालेयवाङ्मय, टीकावाङ्मय, काव्य, नाट्य अशा सर्व क्षेत्रात लिखाण केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.