सिंधुदुर्ग : सावंतवाडीच्या गादीला मिळाला वारस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापूसाहेब महाराज

सिंधुदुर्ग : सावंतवाडीच्या गादीला मिळाला वारस

बापूसाहेब महाराज राजा म्हणून स्वतःला सिद्ध करत होते. इकडे प्रजेला संस्थानच्या पुढच्या वारसाची उत्कंठा होती. राणीसाहेब पार्वतीदेवी याही सावंतवाडीच्या संस्कृतीशी, प्रजेशी एकरूप झाल्या होत्या. अशातच युवराजांचा जन्म झाला. शिवराम राजेंच्या रुपाने सावंतवाडीच्या गादीला नवा वारस मिळाला.

बापूसाहेब महाराजांचा राज्यकारभार म्हणजे सावंतवाडीकरांसाठी सुख, समृद्धीचा काळ होता. त्यांचा हा वारसा तितक्याच क्षमतेने पुढे जावा, अशी प्रजेची अपेक्षा असणे साहजिकच होते. यामुळे पुढचा वारस मिळण्याच्या क्षणाची प्रजाजन उत्कंठेने वाट पाहत होते. श्रीमंत राणीसाहेब पार्वतीदेवी या आपली जबाबदारी, कर्तव्य पूर्ण ओळखून होत्या. त्या महाराजांना शक्य ती सगळी मदत करत होत्या. राज्यकारभारात राणीसाहेबांचे कर्तव्यही मोठे असते. त्या ते पूर्ण ताकदीने पेलत होत्या. त्यामुळे प्रजेचे प्रेम त्यांना मिळत होते.

शिशु सप्ताह, मॅटर्निटी होम, महिला मंडळ आदीमध्ये राणीसाहेबांनी पुढाकार घेतला होता. राणीसाहेब शौर्याच्या क्षेत्रातही मागे नव्हत्या. त्या स्वतः वाघाची शिकार करायच्या. डझनाहून अधिक वाघ त्यांनी मारले होते. लोकांच्या सुख-दुःखाशी दोघेही एकरूप झाले होते. त्यामुळे प्रजेसाठी राजा आणि राणी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनले होते. त्यामुळे या राजदाम्पत्याला अपत्य व्हावे, अशी इच्छा प्रत्येक सावंतवाडीकरांची होती. या दाम्पत्याला पहिले अपत्य ७ मार्च १९२३ ला झाले.

आंबोली येथे महाराजांची पहिली कन्या तिलोत्तमाराजे यांचा जन्म झाला. नंतर त्यांचे नाव बदलून हेमलताराजे असे ठेवण्यात आले. त्याही घोड्यावर बसणे, शिकार करणे या क्षात्रविद्या, शिल्पकला, चित्रकला, संगीत यात तरबेज होत्या.

प्रजाजनांना राजघराण्याला पुढचा वारस कधी मिळणार याची उत्कंठा होती. हेमलताराजे यांच्या पाठीवर साडेचार वर्षांनी राजदाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली. सावंतवाडीला वारस मिळाला. युवराजांचा जन्म खडकी (पुणे) येथे १३ ऑगस्ट १९२७ ला झाला. योगायोग म्हणजे बापूसाहेब महाराजांच्या २० ऑगस्ट या जन्मदिवसा जवळपासच संस्थानला पुढचा वारस मिळाला. युवराजांच्या जन्माची बातमी सावंतवाडीत आनंदोत्सव आणणारी ठरली. गावागावांत उत्सव साजरा करण्यात आला. सावंतवाडीत गर्नाळांचे शहरभर आवाज काढण्यात आले. राजवाड्यात अखंड चौघडा वाजत होता. साखर, पेढे वाटले गेले. दरबारी अधिकारी, प्रमुख प्रतिष्ठित नागरिक यांनी महाराजांना पुण्यात अभिनंदनाची तार करण्यासाठी डाक कार्यालयात गर्दी केली. शहरातून मिरवणूक निघाली. जयजयकाराने राजधानी दुमदुमली. इतर मोठ्या गावातही असाच उत्सव साजरा झाला. दुसऱ्या दिवशी सरकारी कचेऱ्या, शाळा, कोर्ट यांना आनंदाप्रीत्यर्थ सुटी देण्यात आली.

तिकडे खडकीत योग्यवेळी युवराजांचे बारसे झाले. युवराजांच्या दर्शनासाठी सावंतवाडीकर व्याकूळ होते. अखेर तो दिवस आला. ३ ऑक्टोबर १९२७ ला महाराज, राणीसाहेब, हेमलताराजे आणि युवराज अशी स्वारी खडकीहून रेल्वेने बेळगावच्या दिशेने निघाले. दुसऱ्या दिवशी बेळगाव रेल्वेस्टेशनला येताच डॉ. रेगे व इतरांनी त्यांचे स्वागत करत जयजयकार पुकारला. मग मोटारीतून ही सर्व मंडळी सावंतवाडीकडे निघाली.

संस्थानच्या हद्दीत पोहोचताच लोकांच्या उत्साहाला उधाण आले. आंबोलीत दीड ते दोन हजार प्रजाजन स्वागतासाठी थांबले होते. त्यांचे स्वागत स्वीकारण्यासाठी राजकुटुंबाला थांबावे लागले. तेथे देवदर्शनही करायचे होते. राणीसाहेबांची आंबोलीकरांच्या वतीने ओटी भरल्यानंतर सगळ्यांना पेढे वाटण्यात आले. तेथून पुढे दाणोलीत दोन तास मुक्काम झाला. स्नान, भोजन आटोपून स्वारी सावंतवाडीच्या दिशेने निघाली. युवराजांना घेऊन राजकुटुंब सायंकाळी सहाच्या सुमारास सावंतवाडीत पोहोचले. मानकरी, अधिकारी, नागरिक आदींनी त्यांना अभिवादन केले. युवराजांचा जयजयकार करण्यात आला. तोफांची सलामी देण्यात आली. स्वागतासाठी खास मंडप उभारला होता. तेथे युवराजांना घेऊन महाराज व राणीसाहेब स्थानापन्न झाले. तेथे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यानंतर सर्व लवाजम्यासह मिरवणूक निघाली. वाटेत देवदर्शन आटपून ही स्वारी राजवाड्यात दाखल झाली. तेथे ब्राह्मणांकरवी युवराजांना आशीर्वाद देण्यात आले.

युवराजांचा नामकरणविधी २१ फेब्रुवारी १९२९ ला झाला. या समारंभाला महाराजांच्या चौघी बहिणी, त्यांची अपत्य यांच्यासह बडोद्याचे संपतराव गायकवाड, कागलचे यशवंतराव घाटगे, तोरखेडचे दादासाहेब बांडे, देऊळगावचे राजेसाहेब, धारचे सेतूरामजी पवार आदी उपस्थित होते. दरबार हॉल या समारंभासाठी सजवला होता. या सोहळ्याआधी महाराज कुटुंबासह हिंडलग्याला (बेळगाव) मुक्कामला होते. तेथून २० फेब्रुवारीला म्हणजे सोहळ्याच्या आदल्यादिवशी ते सावंतवाडीत पोहोचले. सोहळ्यादिवशी सकाळीच चौघडा वाजवण्यात आला. युवराजांना मंगलस्नान घालण्यात आले. श्री देव पाटेकरासमोर नामकरणाचा शास्त्रोक्त विधी पार पडला. यानंतर दरबार हॉलमध्ये युवराजांना पाळण्यात घालण्यात आले. याला शहरातील प्रमुख नागरिक, महिला, सरदार, दरकदार उपस्थित होते. महिलांची संख्या दीडशेच्या दरम्यान होती. ओट्या भरण्याचा कार्यक्रम झाल्यावर युवराजांचे ‘शिवराम राजे’ असे नाव ठेवण्यात आले.

यावेळी महाराजांना संस्थानिक, जहागिरदारांतर्फे मानाचा पोशाख अर्पण करण्यात आला. दुपारी सगळ्यांसाठी मेजवानीचाही बेत होता. याचवेळी शहरात दुपारी दोन नंतर अनेक छोटे-मोठे उपक्रम घेण्यात आले. शहरातील सर्व शाळांमध्ये यानिमित्त समारंभ झाले. यात पद्यगायन, अभीष्टचिंतन झाल्यानंतर दरबाराकडून आलेली मेवा मिठाई मुलांना वाटण्यात आली. सायंकाळी पाचला राजवाड्यातून मिरवणूक निघून मुख्य रस्त्याने माठेवाड्याकडे वळली. तेथे पुर्वजांचे दर्शन घेतल्यावर मिरवणूक विठ्ठल मंदिराच्या मार्गाने परत राजवाड्याकडे आली. यात कोतवाली घोडे, जरीपटका व निशाणे, त्यामागे बालवीरांचे पथक, लष्करी तुकडी त्याच्यामागे घोडागाडीत स्वतः महाराज, युवराज, न्यायदिवाण, सेनापती दळवी व त्याच्यामागे दरबारी पोशाखात सरदार, दरकदार, आणि त्याही मागे प्रजाजन असा मिरवणुकीचा थाट होता. पूर्ण मार्गात फुले उधळण्यात आली. मोती तलावाच्या काठावर मंडप उभारून त्यात गोरगरिबांना सुग्रास भोजन देण्यात आले. संस्थानात इतर भागातही हा उत्सव साजरा झाला.

Web Title: Sindhudurg Bapusaheb Maharaj Sawantwadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top