सिंधुदुर्ग : ‘बांधकाम’चे अधिकारी कुडाळात धारेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 मनसे कुडाळ शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सिंधुदुर्ग : ‘बांधकाम’चे अधिकारी कुडाळात धारेवर

कुडाळ: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत तालुक्यातील रस्त्यांच्या तसेच विविध प्रश्नांची सरबत्ती करत मनसे कुडाळ शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.कामे सदोष पद्धतीने केल्याने ती किती काळ टिकणार?, रस्त्यांच्या साईडपट्या कधी दुरुस्त करणार?, रस्त्यांची गटारे व ड्रेनेज यंत्रणा साफ सफाई कधी करणार?, सदोष पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

मोबाईल कंपन्यांनी केबल जोडणी करत असताना साईडपट्टी दुरुस्तीसाठी दिलेला निधी गिळंकृत केला आहे, असा आरोप मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. तेही पत्रक यावेळी सादर करण्यात आले.पत्रकात श्री. गावडे यांनी म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील कुडाळ-पाट, वेताळ बांबर्डे-गोठोस, घावनळे-आंबडपाल, कुडाळ-वेंगुर्ले या मार्गांची कामे पूर्णतः निकृष्ट दर्जाची असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ कारवाईची आश्वासने देत चालढकलपणा करीत आहे.

या विभागातील वरिष्ठ अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमताने आर्थिक घोळ केल्याचा खळबळजनक आरोप करत मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अपघात होऊन माणसे जखमी होत आहेत तरी अधिकारी सुस्त कसे? रस्त्याच्या साईडपट्टीची कामे पावसाळ्यापूर्वी झाली पाहिजेत ती कधी होणार ? निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का नाही ? आदी प्रश्नांचा भडीमार करीत मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी तालुकाध्यक्ष गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, रामा सावंत, कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक आदी पदाधिकारी तर उप अभियंता श्री. चव्हाण, शाखा अभियंता श्री. पाटील व बिऱ्हाडे उपस्थित होते.

अन्यथा मनसेशी गाठ

उपअभियंता श्री. चव्हाण यांनी २० मे पूर्वी बाजूपट्टी दुरुस्ती होतील, अर्थवट राहिलेली कामे पूर्ण केली जातील, २२ मे नंतर मनसे पदाधिकारी व बांधकाम अधिकारी रस्त्यांची संयुक्त पाहणी करतील, अशी ग्वाही दिली; मात्र यावेळी मनसेने बांधकाम विभागाला शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा देत रस्त्यांची अवस्था सुधारा अन्यथा मनसेची गाठ असल्याचे सांगितले.

Web Title: Sindhudurg Construction Officials Shovel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top