सिंधुदुर्ग : कोणता झेंडा घेऊ हाती ; दीपक केसरकर | Deepak Kesarkar News | Sindhudurg News Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar News | Sindhudurg News Updates

सिंधुदुर्ग : कोणता झेंडा घेऊ हाती ; दीपक केसरकर

केसरकरांची कारकीर्द

सावंतवाडीतील गर्भश्रीमंत असलेल्या नगरशेठ वसंत केसरकर यांचे दीपक केसरकर हे पुत्र. त्यांचे वडील सक्रिय राजकारणात नसले, तरी सावंतवाडीच्या एकूणच समाजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची असायची. दीपक केसरकर हे मात्र अगदी तरुणपणापासून राजकारणात सक्रिय झाले. त्याची सुरुवात काँग्रेसमधून झाली. दीर्घकाळ ते काँग्रेसी विचारसरणीचा पुरस्कार करत राजकारणात एक एक पायरी चढत गेले. (Deepak Kesarkar News)

तत्कालीन राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचे ते विश्‍वासू सहकारी बनले. भोसलेंच्या जिल्ह्यातील राजकारणाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. हळूहळू केसरकरांचे राजकीय वजन वाढत गेले. ते कधी प्रतिस्पर्धी बनले, हे प्रवीण भोसलेंना समजलेच नाही. २००९ ची विधानसभा निवडणूक केसरकरांसाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरली. सावंतवाडी नगराध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचे मॉडेल त्यांनी मतदारांसमोर मांडले. प्रवीण भोसलेंना शह देत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविली. या निवडणुकीत भोसलेंनी बंडखोरी करूनही केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या लढतीत त्यांनी मतदारसंघाबाबत असलेले काही समज खोटे ठरविले. यात प्रामुख्याने येथे मराठा उमेदवारच चालतो, बंडखोरी झाली तर निवडून येणे कठीण बनते, अशा समजांचा समावेश होता. स्वतःचे समर्थक निर्माण केल्याने त्यांना ही किमया साधता आली. रिस्क घेण्याची क्षमता, राजकीय टायमिंगचे अचूक अनुमान आणि स्वतःची व्होट बँक ही त्यांच्या या यशाची गुरुकिल्ली होती.

‘रिस्क’वरील राजकारण

२००९ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. केसरकरांच्या विजयात तत्कालीन काँग्रेस नेते नारायण राणेंचा वाटा होता. अगदी उमेदवारी मिळवण्यासाठीही राणेंची मदत झाल्याची चर्चा त्या काळात होती. अर्थात राणेंची मदत मिळविण्यामागे केसरकरांचे राजकीय कौशल्यही तितकेच कारण म्हणावे लागेल. नंतर मात्र राणेंविषयी जिल्ह्यात नाराजीचे वातावरण वाढू लागले. केसरकरांनी ही स्थिती अचूक हेरली. हळूहळू राणे आणि केसरकर यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार नीलेश राणे आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या विरोधात लढत होती. राणेंसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती असूनही केसरकरांनी उघडपणे शिवसेनेला पाठिंबा दिला. या घडामोडीत त्यांनी राणेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पंगा घेतला. राजकीय कारकीर्दीत त्यांनी घेतलेली ही सगळ्यात मोठी रिस्क होती. या लढतीत शिवसेनेचे राऊत विजयी झाले; मात्र याच रिस्कमुळे केसरकर राऊतांपेक्षा जास्त ‘शाईन’ झाले. लगेचच लागलेल्या विधानसभेत त्यांनी भगवा हाती घेत दुसऱ्यांदा सावंतवाडीचे आमदार म्हणून मोठे बहुमत मिळवले.

रिस्क घेतल्याचे बक्षीस

२०१४ ला शिवसेना-भाजपचे सरकार आले. यात केसरकरांना राज्यमंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. वास्तविक कोकणात शिवसेनेचे आणखी ताकदवान आमदारही होते; मात्र संघटनेत नवख्या असलेल्या केसरकरांना संधी मिळाली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निर्माण केलेल्या जवळीकीमुळे ही किमया घडली; मात्र सरकारमध्ये असताना केसरकर शिवसेनेपेक्षा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळाच्याच जास्त जवळ असल्याचे जाणवले. यामुळेच २०१९ ला ते शिवसेना-भाजपचे सरकार यावे, यासाठी आग्रही होते. आजही ते हे मान्य करतात.

समर्थकांची गोची

याआधी केसरकरांनी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेपूर्वी त्यांच्या समर्थकांना त्याची कल्पना होती. शिवाय ते शिवसेनेच्या प्रवाहात सामील झाले होते. त्यामुळे समर्थकांनाही आपले राजकीय भविष्य दिसत होते. यावेळची स्थिती वेगळी आहे. गेल्या काही वर्षांत मंत्रिपद आणि कामाच्या व्यापामुळे केसरकर आणि समर्थक कार्यकर्ते यांच्यात असलेला कनेक्ट पूर्वीइतका राहिलेला नाही. यातच अचानक केसरकरांनी शिंदे गटात सामील व्हायचा निर्णय घेतला. राजकीय गणिते नेमकी कोणत्या दिशेने जाणार, याचा अंदाज समर्थकांना नाही.

बरेच समर्थक शिवसेनेत विविध पदे घेऊन स्थिरावले आहेत. त्यामुळे आताच्या घडीला ते संभ्रमात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, काही ग्रामपंचायती, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या पालिकांच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यात होऊ घातल्या आहेत. समर्थकांच्या दृष्टीने राजकीय प्रगतीसाठी या लढती महत्त्वाच्या मानल्या जातात. आता शिवसेनेच्या विरोधात जाऊन केसरकरांना उघड पाठिंबा दिल्यास या लढतीमध्ये पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाहीशी होणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेची सुप्त मते आहेत. पक्षचिन्हाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याची क्षमता असलेल्या समर्थकांची संख्या मर्यादित आहे. नव्या मंत्रिमंडळात केसरकरांना मंत्रिपद मिळाल्यास ही उणीव काही प्रमाणात भरून येऊ शकते; पण आजच्या घडीला चित्र स्पष्ट नाही. त्यातच शिवसेनेने केसरकरांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नेमका कोणाचा झेंडा हाती घ्यायचा, असा प्रश्‍न केसरकर समर्थकांसमोर आहे.

राजकारणात नेहमी ‘रिस्क’ घेऊन वाटचाल करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. यापूर्वीही २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ते बंड यशस्वी होऊन त्यांना राज्यात मंत्रिपद मिळाले होते. यावेळी मात्र त्यांच्या भूमिकेमुळे मतदारसंघातील त्यांचे समर्थक संभ्रमात आहेत. नेमका कोणता झेंडा हाती घ्यायचा, याची स्पष्टता न झाल्याने हा संभ्रम अधिकच तीव्र होत आहे. या घडामोडींमुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे राजकीय गणित मात्र पूर्ण बदलणार आहे.

मन मात्र भाजपसोबत

केसरकर हे मुळातच काँग्रेसच्या सोबत राजकारणात वाढलेले नेतृत्व. शिवसेनेच्या आक्रमक शैलीत ते कितपत जुळवून घेतील, हा प्रश्‍न होता; मात्र राणेंशी पंगा घेताना ते आक्रमक झाले. असे असले तरी अगदी २०१४ पासून ते शिवसेनेत असूनही मनाने तसे भाजप सोबतच होते. युतीच्या सरकारमध्ये भाजपच्या वर्तुळात त्यांच्या शब्दाला वजन होते. ‘चांदा ते बांदा’ योजना याचे उदाहरण देता येईल. ही योजना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या केसरकर यांच्याच जिल्ह्यापुरती मर्यादित होती. यात केसरकरांची भूमिका महत्त्वाची होती. फडणवीस यांच्याशी ते खूप जवळीक साधून होते. यामुळे त्यांना गृहराज्यमंत्रिपदी बढतीही मिळाली होती. भाजपशी असलेली ही जवळीक शिवसेनेच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांच्यासाठी अडचणीची होती; मात्र पक्षप्रमुख ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे त्यांनी ही कसरतही पार केली.

....आता अनेक आव्हाने

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीची गणिते या घडामोडींमुळे बदलली आहेत. पुढच्यावेळी शिवसेनेकडून केसरकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी झाली आहे. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप अशी स्पर्धा आहे. भाजपकडून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हे उमेदवारीचे संभाव्य दावेदार मानले जातात. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले यांच्याकडेही भविष्यातील भाजपच्या उमेदवारीचा चेहरा म्हणून पाहिले जाते. शिंदे गटात गेल्यामुळे पुढच्या निवडणुकीत भाजपचा पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो. तसे झाल्यास भाजपमध्ये आधीच इच्छुक असलेल्यांशी स्पर्धा करावी लागेल. भाजपच्या मतांबरोबरच त्यांना समर्थकांची मते टिकवावी लागतील. कारण या मतदारसंघात शिवसेनेची मोठी व्होटबँक आहे. शिवाय त्यांचे राजकीय स्पर्धक नारायण राणे सध्या वजनदार नेते आहेत. सावंतवाडीतील भाजप संघटनेवर त्यांचे नियंत्रण आहे. ही आव्हाने केसरकरांना पेलावी लागणार आहेत.

Web Title: Sindhudurg Deepak Kesarkar Shiv Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..