बापरे! सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय खबरदारी घेतलीय वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

एखादी व्यक्ती क्वारंटाईन केलेले असताना घराबाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक गेडाम यांनी दिल्या आहेत. 

ओरोस (सिंधुदुर्ग) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात 130 व्यक्तींना क्वारंटाईन केले. त्यांना कोरोनाविषयी कोणतीही लक्षणे नाहीत; पण खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन केले, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. 

या सर्व व्यक्तींनी क्वारंटाईन विषयी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, घरामध्येही कुटुंबियांपासून बाजूला रहावे. त्यांची सुश्रृषा करण्याचे काम घरातील एकाच व्यक्तीने करावे, थेट त्वचेस स्पर्श करू नये, मास्कचा वापर करावा, त्यांचे कपडे, पांघरून या गोष्टी रोजच्या रोज डिटर्जंटचा भरपूर वापर करून स्वच्छ धुवावीत. या सर्व गोष्टींविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सूचना दिल्या आहेत. त्यांचे पालन करावे. एखादी व्यक्ती क्वारंटाईन केलेले असताना घराबाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक गेडाम यांनी दिल्या आहेत. 

जिल्हा आरोग्य संस्थांमार्फत एकूण 739 व्यक्तींची तपासणी केली असून त्यामध्ये 250 परदशी प्रवाशांचा समावेश आहे. या तपासणीमध्ये एकही रुग्ण कोरोना सदृष्य आढळलेला नाही. जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथील विलगीकरण कक्षामध्ये 6 व्यक्ती दाखल असून त्यांची प्रकृती चांगली आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणहीती लक्षणे नसून किरकोळ खोकला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्‍यांवर व केंद्रावर 20 थर्मल स्कॅनर पुरविले असून रुग्णांच्या शरीराचे तापमान याद्वारे तपासण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींना 14 दिवस अलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात येत आहे. 

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी बडतर्फ 
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची नाकाबंदी करून तपासणी करण्यासाठी सातार्डा येथे तपासणी पथकाची नियुक्ती केली होती. या पथकामधे वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले होते; परंतु वैद्यकीय अधिकारी हे विनापरवानगी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. 

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई 
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनासह नागरिकांसाठीही सूचना वजा आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन करत नाही अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक गेडाम यांनी दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhudurg district alerted for coronavirus