सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक लढतीसाठी हालचाली

Sindhudurg District Bank Election Preparation
Sindhudurg District Bank Election Preparation

कणकवली (सिंधुदुर्ग) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल पुढील वर्षी म्हणजेच येत्या जानेवारीत वाजणार आहे. त्या अनुषंगाने सहकार खात्याने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची पंचवार्षिक निवडणूकही जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा कात टाकणार आहे. 

साथरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकशाही पद्धतीने होणाऱ्या विविध क्षेत्राच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या मुदतीत संपल्या तेथे प्रशासक नेमण्यात आले होते; पण सहकार क्षेत्रातील विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. राज्य शासनाने याबाबत तसा आदेश काढला. मार्चपासून या कोरोना साथीने डोके वर काढले. त्यामुळे पहिली मुदतवाढ 30 जूनपर्यंत दिली होती. त्यानंतर ही मुदतवाढ 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली.

तरीही कोरोना प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने अखेर 31 डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिल्या होत्या; मात्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था यातून वगळण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात सुधारणा केल्याने निवडणुका होईपर्यंत सहकारी संस्थांचे विद्यमान मंडळ कार्यरत राहू शकणार आहे. जिल्ह्याचा विचार करता जवळपास 1380 विविध प्रकारच्या संस्था आहेत. यात 500 पेक्षा अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

जिल्ह्यात मध्यवर्ती बॅंक आणि ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था, दूध संघ, कृषी प्रक्रिया संस्था, पाणी पुरवठा सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, जिल्हा मजूर सहकारी संघ, मजूर सहकारी संस्था, तालुका खरेदी विक्री संघ, सहकारी संस्था, पगारदार, नोकरदार सहकारी पतसंस्था, सामुहिक शेती सहकारी संस्था अशा विविध संस्था असून गृहनिर्माण सहकारी संस्थाही आहेत. या सगळ्या सहकारी क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या निवडणुका पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2021 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जाणार आहेत. यात महत्वाची निवडणूक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे पहिले जात आहे. बॅंकेला आजवर चार वेळा मुदतवाढ मिळाली आहे. 

जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीही बदलली आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणूकीतील चित्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चित्र फार वेगळे आहे. या अनुषंगाने सहकार क्षेत्राकडे राजकीय मंडळीनी डोळे लावून ठेवलेले आहेत. त्यांची घालमेल सुरू होणार आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकांची तयारी अर्थात मतदार याद्या तयार करणे हा महत्त्वाचा विषय सहकार क्षेत्राकडे आहे. त्या अनुषंगाने आज तातडीने सहकार क्षेत्राने निवडणूक पूर्वतयारीची लगबग सुरू केली आहे. 

मतदानाचा अधिकार कुणाला? 
जिल्हा बॅंकेची निवडणूक यापूर्वी होणार होती. त्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले होते. सहकारी संस्थांकडून बॅंकेची सभासद असलेल्या संस्थांना मतदानाचा हक्क असलेल्या सभासदाचा ठराव करून पाठविण्याची निर्देश देण्यात आला होता. सभासदांच्या निम्म्यापेक्षा अधिक ठराव सहकार खात्याने दाखल करून घेतले आहेत. आता नव्या प्रक्रियेत यात कोणता बदल होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com