सिंधुदुर्गात आठवीपर्यंतच्या शाळा बंद | School Close | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 school

सिंधुदुर्गात आठवीपर्यंतच्या शाळा बंद

ओरोस : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने अद्याप लसीकरण (Vaccination) न झालेल्या जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा ६ जानेवारीपासून ऑफलाईन पद्धतीने (Offline) बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने आज घेतला आहे. याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी आज सायंकाळी काढले आहेत; मात्र ऑफलाईन शाळा बंद करण्यात आल्या असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने या मुलांचे अध्यापन सुरूच ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेल्या आदेशात दिले आहेत. (Sindhudurg District Corona Effect)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज सायंकाळी जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा उद्यापासून (ता.६) बंद करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांना दिले. त्यानुसार शेख यांनी याबाबत तात्काळ आदेश काढला. यामुळे जिल्ह्यातील आठवीपर्यंत वर्ग पुन्हा भरणार नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत या शाळा बंद राहणार आहेत.

हेही वाचा: मेळघाटची आरोग्यसेवा वाऱ्यावर; डॉक्टरांनी थाटले दवाखाने

कोरोनामुळे मार्च २०२० जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केवळ नववी ते बारावी वर्ग २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू करण्यात आले होते; परंतु पहिले ते आठवीचे वर्ग २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात भरलेच नव्हते. २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर सुद्धा कोरोना प्रभाव पाहून नववी ते बारावी वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती; परंतु ऑक्टोबर २०२१ पर्यंत आठवी पर्यंत शाळा सुरू झाल्या नव्हत्या.

४ ऑक्टोबरपासून पाचवी ते आठवी शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तर १ डिसेंबरपासून पहिली ते चौथी वर्ग सुरू करण्यात आले होते. पाचवी ते आठवी शाळा दोन महिने तर पहिली ते चौथी शाळा एक महिना सुरू राहिली असताना कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळू लागल्याने उद्यापासून या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: इंदापूर : पोटच्याच मुलाने केली मातेची निर्घृण हत्या

...म्हणून नववी ते बारावी वगळले

जिल्ह्यात सध्या १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. हे लसीकरण शाळा स्तरावर केले जात आहे. या गटात नववी ते बारावीपर्यंतची मुले येतात. हे वर्ग बंद केल्यास १५ ते १८ वयोगटातील लसीकरण रखडणार आहे. त्यामुळे नववी ते बारावी वर्गाच्या शाळा बंद करण्यात आलेल्या नाही.

शाळा बंद तरी शिक्षक शाळेत

पहिली ते आठवी शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुट्टी नाही. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरूच ठेवायचे आहे. मुलांच्या अध्यापणावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. मुलांच्या गृहभेटी घेऊन त्याची नोंद हालचाल रजिस्टरवर ठेवायची आहे. शिक्षक व पालक यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये विषयतज्ञ, साधनव्यक्ती यांचा नंबर समाविष्ट करून मुलांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करायचे आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KokanOffline schools
loading image
go to top