सिंधुदुर्ग : हत्ती संकटामुळे मोर्लेत जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बागायतीत धुडगूस, नुकसान सत्र सुरूच

सिंधुदुर्ग : हत्ती संकटामुळे मोर्लेत जागर

साटेली भेडशी: केरकडे गेलेले हत्ती पुन्हा मोर्लेत परतल्याने गेल्या दोन रात्री शेतकऱ्यांचा जागर सुरू आहे. हत्तींचा कळप फणसांवर ताव मारण्यासाठी वस्तीकडे येत असल्याने सर्वांचीच झोप उडाली आहे.हत्तींच्या कळपाचे रात्रीच्या विहाराचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. कधी केर, कधी मोर्ले असा मुक्काम हत्ती करू लागल्याने गावकरी चिंताग्रस्त आहेत. तालुक्यात २००२ मध्ये हत्ती आले. त्यावेळी हत्तीबद्दल अप्रुपाची आणि देवत्वाची भावना होती. हत्तींनी मांगेलीत धुमाकूळ घातला. केळी, माडांच्या बागा उद्ध्वस्त केल्या.

बेरोजगार आणि मुंबई सोडून गावी शेती-बागायतीत लक्ष घातलेले गावकरी हत्तींच्या आक्रमणामुळे बेजार होते. अनेकांनी शेती सोडली. हत्तींचा उपद्रव आजही सुरू असला, तरी त्याची तीव्रता पूर्वीइतकी भयावह नाही. तेव्हा डोळ्यावर विजेरीचा प्रकाश पडला किंवा छायाचित्र टिपणारा माणूस दिसला, तरी हत्ती चाल करून यायचा. हत्तीचे छायाचित्र मिळविणे सुरुवातीच्या दिवसांत खूप जोखमीचे होते. जिल्ह्यातील आणि मुंबईतील कित्येक दूरचित्रवाणी (टीव्ही) आणि वृत्तपत्रांचे पत्रकार व कॅमेरामन गावात तळ ठोकून असायचे. वन कर्मचारी आणि गावकऱ्यांसोबत हत्तीला कैद करण्यासाठी रात्रंदिवस त्यांचा जागर सुरू असायचा; पण त्यांना अपयश आले होते.

तशा परिस्थितीत सर्वात पहिला हत्तींच्या कळपाचे छायाचित्र फोटो आणि व्हिडीओ दै. ‘सकाळ’च्या बातमीदारांनी काढला, प्रसिध्द केला आणि वन मंत्र्यांनाही पाठविला. तेव्हा हत्ती आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले. तोपर्यंत सरकार आणि तत्कालीन वन सचिवांना दोडामार्ग तालुक्यात हत्ती आहेत आणि त्यांच्याकडून नुकसान सुरू आहे, हे मानायलाच तयार नव्हते.

आता परिस्थिती बदलली आहे. हत्ती आणि माणूस एकमेकांना सरावले आहेत. हत्तींचे छायाचित्र किंवा व्हिडीओ कुणीही सहजपणे मोबाईलमध्ये कैद करत आहेत. तरीही त्याला शेती-बागायतीपासून, वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी माणसांचा आटापिटा सुरू आहे. त्यातून संघर्ष सुरू आहे. त्याने आजही गावागावांत जागर सुरूच आहे.

नव्या पाहुण्यासाठी तिलारी सुरक्षित

तिलारीचा समृद्ध जंगल परिसर नव्या पाहुण्याला जन्म देण्यासाठी हत्तींना सुरक्षित वाटत आहे. त्यामुळेच तिलारी खोऱ्यात मादी हत्ती प्रसूत झाल्याची उदाहरणे आहेत. आताच्या कळपात तीन पिल्ले आहेत. त्यातील सर्वात लहान पिल्लाचा जन्म तिलारी खोऱ्यातील एका गावातील बागेत झाला होता. पिल्लू जन्मतःच उभे राहून चालत असल्याने त्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नसले, तरी तिलारीचा परिसर देशात दिवसेंदिवस संख्येने कमी होत जाणाऱ्या हत्तींच्या संख्येला वाढविण्याचे काम करत असून, ही पर्यावरणप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.

‘त्यांना’ न्यायाची गरज

हत्ती आले आणि अनेकांच्या घरात लक्ष्मी आली. काहींनी वन कर्मचाऱ्यांना लाडीगोडी लावून, तर काहींनी दबाव टाकून प्रत्यक्षातील नुकसानीपेक्षा अधिक भरपाई मिळवली. काहींनी एकाच झाडाची, केळीच्या रोपाची पुन्हा पुन्हा भरपाई घेतली. त्यामुळे अनेकजण मालामाल झाले. त्यांच्यासाठी हत्ती संकट नाही, तर संधी होती; पण काहींना तुटपुंजी भरपाई मिळाली. काहीजण अद्यापही प्रतीक्षेत आहेत. शासनाने त्यांना न्याय देण्याची गरज आहे.

Web Title: Sindhudurg Elephant Crisis Awake Morlet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top