सिंधुदुर्गच्‍या पाऊलखुणा : चला, आता माळा घालायला नको!

पाणवठ्याकडे जातो. यानंतर काही काळ कुठेतरी आडोशाला पडून राहतो.
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गsakal

बापूसाहेब महाराज वाघासारख्या प्राण्याची शिकार उपद्रव असेल तरच करायचे. या शिकारीसाठी ते स्वतः जात असत; मात्र हातून अशी मुक्या प्राण्याची हत्या झाली की, एक दिवस ते गंभीर असायचे.

प्रसंग कोणताही असला तरी धाडसाने त्यावर मात करण्याची क्षमता बापूसाहेब महाराजांमध्ये होती. अनेक शिकार कथांमधून हे सिद्ध झाले आहे. माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथे वाघाच्या केलेल्या शिकारीवरून त्यांचा हा गुण अधोरेखित होतो. आंबेरी येथे पूर्वी दाट जंगल होते. त्याची व्याप्ती बरीच मोठी होती. त्याच्या आजूबाजूला वस्ती होती. एकदा एक वाघ पाळीव प्राण्यांच्या रक्ताला चटावला. तो गायींसह इतर प्राण्यांची वारंवार शिकार करू लागला. यामुळे शेतकरी हैराण झाले. याचा बंदोबस्त करण्याची मागणी महाराजांकडे केली. महाराजांचा अशा वाघाच्या वर्तणुकीबद्दल चांगला अभ्यास होता. असा रक्ताला चटावलेला वाघ तुलनेत सोपी शिकार असलेल्या पाळीव प्राण्यांच्या मागावर असतो. शिकार केल्यावर तो आधी त्याचे रक्त पितो. नंतर पाणी पिण्यासाठी

पाणवठ्याकडे जातो. यानंतर काही काळ कुठेतरी आडोशाला पडून राहतो. दुसऱ्यादिवशी साधारण त्याचवेळी शिकारीच्या ठिकाणी पुन्हा येऊन मांसावर ताव मारतो; मात्र वाघ खूप सतर्क प्राणी असतो. तो शिकारीकडे येण्याआधी दुरूनच टेहाळणी करत असतो. सुरक्षेची खात्री झाली की मग शिकारीकडे पोहोचतो.

महाराजांनी गावकऱ्यांना वाघाने शिकार केल्याची माहिती मिळताच कळवण्यास सांगितले. त्यानुसार एक दिवस दरबारात वाघाने शिकार केल्याची वर्दी आली. महाराज आधी शिकारीच्या ठिकाणी पाहणी करायला गेले. दुपारची वेळ होती. वाघ सायंकाळी भक्ष्याकडे येईल, असा अंदाज होता. त्यामुळे आधी शिकारीसाठी माळा घालण्याचे त्यांचे नियोजन होते. सावधगिरी म्हणून त्यांनी हातात बंदूक ठेवली. वाटाड्या त्यांच्यापुढे होता. त्याच्या हातात मात्र काहीच नव्हते. महाराजांचा वाघाबाबतचा अंदाज यावेळी चुकला. महाराज टेहाळणीसाठी येण्याआधीच वाघ त्या भागात आला होता. तो गुरगुरत महाराजांच्या समोरच आला. हातात बंदूक असल्याने वाघाचा रोख त्यांच्याकडेच होता. त्याने सरळ महाराजांच्या अंगावर चाल केली. लष्करी तालमीत वाढलेल्या महाराजांनी विजेची चपळाई दाखवत जवळच्या झाडाचा आधार घेतला आणि त्याच स्थितीत जमिनीवरून हवेत झेपावलेल्या वाघावर गोळी झाडली. त्यांची नेमबाजी अचूक असायची. गोळीने

वाघाच्या छातीचा वेध घेतला. वाघाने महाराजांवर झडप घातली होती खरी; मात्र ती उडी महाराजांनी चुकवली. वाघ पुढे जाऊन पडला, तो पुन्हा उठला नाही. सोबतच्या लोकांच्या हृदयाचे ठोके मात्र काही काळासाठी चुकले. महाराज मरून पडलेल्या वाघाकडे पाहत हसून म्हणाले, ‘चला, आता माळा घालण्याची गरज नाही.’ ते तेथून थेट सावंतवाडीत आले. अशी एखादी हत्या झाली की ते अंतर्मुख होत. ते एक दिवस गंभीर असायचे.

महाराजांच्या फसलेल्या शिकारीच्या कथाही प्रसिद्ध आहेत. सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावर उपद्रव करणाऱ्या एका वाघाच्या फसलेल्या शिकारीची ही कथा. हा वाघ नरेंद्राच्या पायथ्याशी येऊन लोकांना त्रास देऊ लागला.

शहरापासून हा भाग खूप जवळ होता. हा वाघही मोठा होता. त्यामुळे त्याची शिकार केल्याशिवाय पर्याय नव्हता. वाघासाठी भक्ष्य आमिष म्हणून बांधून त्याची शिकार करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. एका ठिकाणी शिकारीला बसण्यासाठी माळा घालण्यात आला. तेथे जवळ एक रेडा भक्ष्य म्हणून बांधून ठेवण्यात आला; मात्र रेड्याला मरू द्यायचे नाही, असा प्रयत्न महाराजांनी चालवला. रेड्याला एका लाकडाच्या ओंडक्याला बांधण्यात आले. वाघ आला की त्याची शिकार करायची, जेणेकरून त्याला रेड्याची शिकार करण्याची संधी मिळू नये, असा महाराजांचा विचार होता.

रात्र झाली होती. वाघ मात्र हुशार होता. त्याने दुरूनच सावज हेरले. त्याने थेट रेड्यावर हल्ला न करता त्याला बांधलेला ओंडका हळूहळू ओढायला सुरुवात केली. साधारण अर्धा फर्लांगपर्यंत वाघाने ही शिकार ओढत नेली. काळोख असल्यामुळे वाघाला लक्ष्य करण्याची संधी महाराजांना मिळाली नाही. ते थेट माळ्यावरून खाली उतरले; मात्र काळोखी रात्र आणि दाट जंगलामुळे त्यांना वाघावर गोळी झाडता येईना.

वाघाचा पाठलाग करणे धोकादायक होते. त्यामुळे सोबतचे लोक महाराजांना तसे करू देईनात. शेवटी महाराज रिकाम्या हातांनी परत आले. दुसऱ्या दिवशी वाघाने रेड्याला मारल्याचे स्पष्ट झाले. त्याच दिवशी पुन्हा माग काढून वाघाचीही शिकार करण्यात आली.

प्रजेशी आपुलकी

महाराजांची प्रजेविषयी असलेली आत्मीयता अनेक घटनांमधून स्पष्ट होते. मग प्रजेला त्रास देणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त असो किंवा एखाद्या अडलेल्याला मदत असो. कुडाळच्या महादेव रघुनाथ सडेकर यांनी असाच एक किस्सा लिहून ठेवला आहे. फेब्रुवारी १९३३ मध्ये महादेव यांचे बंधू भालचंद्र यांना आंबोली येथे विषारी सर्पाने दंश केला. बरेच उपचार करूनही त्यांना बरे वाटेना. या सापाच्या दंशावर दरबारात काम करणाऱ्या सगुण महार यांच्याकडे रामबाण उपाय असल्याचे महादेव यांना समजले.

यासाठी त्यांनी महाराजांना साकडे घालण्याचे ठरवले. नेमके या काळात महाराज संस्थानाबाहेर होते. त्यांनी दरबार अधिकारी श्री. ताटकर याला विनंती केली. त्यांनी सगुण महार यांच्याकडे औषधोपचार उपलब्ध करून दिले. ही गोष्ट महाराजांना अधिकाऱ्यांनी सांगितली. त्याचवर्षी महाराज एका दौऱ्यानिमित्त कुडाळात आले होते. त्यांनी महादेव यांना भेटीला बोलावून घेतले आणि त्यांच्या भावाच्या प्रकृतीविषयी आस्थेने चौकशी केली. त्यांना बरे वाटले हे ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले. एका सर्वसामान्य प्रजाजनाविषयी त्यांच्या हृदयात किती आपुलकी होती, हे सांगण्यासाठी ही घटना पुरेशी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com