Sindhudurg : मोपा विमानतळ ‘उड्डाणा’साठी सज्ज

त्रुटींची पूर्तता; १३ डिसेंबरला लोकार्पणासाठी हालचाली
Sindhudurg : मोपा विमानतळ ‘उड्डाणा’साठी सज्ज

बांदा : गणेश चतुर्थीत विमान उतरवून चाचणी घेतल्यानंतर अनेक त्रुटींची पूर्तता करत सिंधुदुर्ग व गोवा राज्यांच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाला आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिनी १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती विमानतळ प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. सिंधुदुर्गाच्या शेजारी असलेल्या या विमानतळाचा विशेषतः बांदा परिसराला विकासात्मक फायदा होणार आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. गणेश चतुर्थी कालावधीत याठिकाणी विमान उतरवून चाचणी घेण्यात आली होती. केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावर अनेक त्रुटी असून त्या परिपूर्ण करण्याच्या सूचना केंद्राला दिलेल्या अहवालात केल्या होत्या. त्यानंतर तृटींची पूर्तता करण्यात आली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून उद्‍घाटन कार्यक्रमासाठी त्यांची वेळ मागितली आहे. पंतप्रधान कार्यालयातून होकार येताच उद्‍घाटनाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांकडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरक्षेचा परवाना २६ ऑक्टोबरला जारी झाल्यानंतर विमानतळ उद्‍घाटनाच्या हालचालींना वेग आला आहे.

इंटरनॅशनल सिव्हिल (आयसीएओ) या युनायटेड नेशनच्या कॅनडा येथील कार्यालयाकडून मान्यता न मिळाल्याने ‘मोपा’चे काम सुरू होऊ शकले नव्हते. जून २०१३ मध्ये टेक्नो इकॉनॉमिक फिझिबिलीटी रिपोर्ट सादर झाल्यानंतर ही मान्यता देण्यात आली. त्यानंतरच निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. विमानतळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे की नाही याची खात्री ही संघटना करणार आहे.

त्यानंतरच या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरवण्यास मान्यता मिळणार आहे. मोपा विमानतळ बांधून तयार असल्याचा अहवाल अजून या संघटनेला सादर झालेला नाही. त्यामुळे उद्‍घाटन झाले तरी आंतरराष्ट्रीय विमाने या विमानतळावर उतरू शकणार नाहीत. देशांतर्गत विमान सेवेला प्रारंभ होणार आहे. देशातील महत्वाची शहरे व पर्यटनस्थळे थेट हवाई वाहतुकीने जोडण्यात येणार आहेत.

सुशोभिकरण युद्धपातळीवर

विमानतळाच्या सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आता केवळ युनायटेड नेशनच्या इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनची (आयसीएओ, कॅनडा) अंतिम मान्यता बाकी आहे. मोपा विमानतळावर तयार केलेल्या दोन्ही धावपट्या पूर्णपणे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. अशा धावपट्ट्या भारतात इतर कुठल्याच विमानतळावर नाहीत. दाट धुक्यामुळे किंवा मुसळधार पावसामुळे धावपट्टी नजरेस पडत नाही.

त्यावेळी विमानाला आकाशात घिरट्या घालाव्या लागतात किंवा नजिकच्या विमानतळावर उतरावे लागते. तसा प्रकार ‘मोपा’वर होणार नाही. कारण कुठल्याही स्थितीत वैमानिकाला त्या दिसतील अशी यंत्रणा या ठिकाणी बसविली आहे. या धावपट्ट्या साधारण साडेतीन किलोमीटर लांबीच्या असून कुठल्याही प्रकारचे मोठे जंबो विमान यावर उतरू शकते. विमानाचा वेग कितीही असला तरी त्याचा परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कामे अपूर्णावस्थेत

मोपा विमानतळावर विमाने उतरण्याची सर्व तयारी झाली असली तरी विमानतळाबाहेर डागडुजीची बरीच कामे शिल्लक आहेत. विमानतळाला जोडणारे जोडरस्ते अद्याप अपूर्ण आहेत. वाहनतळाचे कामही मार्गी लागलेले नाही. उद्‍घाटनाची प्रतीक्षा असल्याने सध्या या विमानतळाचे काम रात्रं- दिवस चालू आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याठिकाणी कडक सुरक्षा आहे. विमानतळ सुरू होण्यापूर्वी येथील सुरक्षा व्यवस्था ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे दिली जाण्याची शक्यता आहे.

दाबोळी (वास्को) येथील विमानतळावरील सुरक्षा यंत्रणाही याच दलाकडे आहे. इंटरग्रेटेड पॅसेंजर टर्मिनल इमारत, एअर ट्रॅफिक कंट्रोल इमारत, मेट्रोलोजीकल विभाग, प्रक्रिया आणि गोदाम विभाग, एअर क्राफ्ट रेस्कू आपत्कालीन व अग्निशामक दल विभाग अशा पाच इमारती बांधून तयार झाल्या आहेत. ॲव्हिएशन फ्युएल पंप व्यवस्था प्रगतीपथावर आहे.

विमानतळ चार टप्प्यांत

‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’ या तत्त्वावर जीएमआर या आस्थापनाकडे मोपा विमानतळाचे काम सोपविले आहे. त्यांचा हा करार ४० वर्षांसाठी आहे. मोपा विमानतळाचे काम चार टप्प्यांत पूर्ण होणार आहे. त्यातील पहिला टप्पा जवळजवळ पूर्ण होत आला असून, विमानतळ आता उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

पेडणे तालुक्यातील मोपा, चांदेल, वारखंड, उगवे या चार गावांतील सुमारे ७८.४१ लाख चौ. मी. जमीन या विमानतळ प्रकल्पासाठी ताब्यात घेतली आहे. पहिल्या टप्प्यात ४८.७० लाख चौ. मी. जमीन वापरली आहे. विमानतळाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. उद्‍घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई मोहीम राबविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com