सिंधुदुर्ग : घाटरस्त्यांची वाट बिकटच

चारही घाटमार्गांना दरडीचा धोका या पावसाळ्यात देखील कायम असणार आहे.
घाटरस्त्यांची वाट बिकटच
घाटरस्त्यांची वाट बिकटचsakal

ठिसूळ संरक्षक कठडे, गटारांची दुरवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे जागोजागी पडलेली भगदाडे, दरडी कोसळण्याचा कायम असलेला धोका आणि बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून मलमपट्टीच्या उपाययोजना यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील चारही घाटरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोणत्याही क्षणी घाटरस्ते बंद पडतील, अशी स्थिती असून, या पावसाळ्यात देखील घाटमार्गांवरील वाहतूक वाहनचालकांसाठी धोकादायक ठरणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात घाटांची स्थिती काय आहे, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न.

दरडींचा धोका कायम

चारही घाटमार्गांना दरडीचा धोका या पावसाळ्यात देखील कायम असणार आहे. दरडी रोखण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी बोल्डर नेटचा वापर केला होता. त्याचे परिणाम देखील चांगले दिसून आले होते. ज्या ठिकाणी नेट बसविण्यात आली होती, त्याठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी झाले होते. याशिवाय लहान-मोठे दगड कोसळले तर ते जाळीत अडकून राहत होते. एखाद्या वाहनांवर थेट दगड पडण्याचा धोका नव्हता; परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांत अशा स्वरुपाच्या नेटचा वापर केला गेलेला नाही. दरडी कोसळल्यानंतर त्या हटवून मार्ग मोकळा करण्यातच धन्यता मानण्यात येते. रात्री-अपरात्री दरडी कोसळल्यास महामार्ग बंद ठेवावे लागले आहेत; परंतु त्यातून कोणताही धडा प्रशासनाने घेतलेला नाही. कोणत्याही क्षणी दरडी कोसळतील, अशी चारही घाटात मिळून ७० हुन अधिक ठिकाणे आहेत. दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आंबोली आणि भुईबावडा घाटांना आहे.

खचण्याची भीती वाढली

गेल्या काही वर्षांत रस्ता खचण्यासारखे गंभीर प्रकार घाटरस्त्यांमध्ये वाढले आहेत. बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढले आहेत. घाटरस्त्यांच्या डोंगराकडील बाजूने वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न केल्यामुळे हे प्रकार सऱ्हास घडतात, हे माहिती असूनही पाण्याच्या निचऱ्यावर लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गटारातील सर्व पाणी रस्त्यावरून

वाहते. त्यातूनच रस्ता खचण्याच्या प्रकियेला सुरुवात होते. आतापर्यंत करुळ, भुईबावडा, फोंडा या तीनही घाटांमध्ये रस्ते खचण्याचे प्रकार घडले आहेत. पावसाळ्यापूर्वी घाटरस्त्यांतील गटारींची साफसफाई करावी, असे संकेत असतात; परंतु त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याने हे प्रकार वाढीस लागले. त्यातच एखाद्या ठिकाणी रस्त्याला छोटे भगदाड पडलेले असताना त्याचे बांधकाम करण्याऐवजी ते मोठे होण्याची वाट पाहिली जाते. हे धोरण नेमके कुणासाठी राबविले जाते, हे आतापर्यंत न सुटलेले कोडे आहे.

गॅबियन पद्धतीचा विसर

खचलेल्या रस्त्यांचे कमी खर्चात गॅबियन पद्धतीने बांधकाम करता येते. पंधरा वर्षांपूर्वी या पद्धतीचा वापर करुळ घाटात केला होता. लोखंडी जाळीमध्ये दगड रचून बांधकाम केले जाते. पाण्याचा निचरा आणि दुसरीकडे रस्ता टिकवून ठेवण्याची क्षमता या बांधकाम पद्धतीत होती.

भविष्यात अशा पद्धतीने बांधकाम करण्याचे ‘बांधकाम’ने जाहीर देखील केले होते; परंतु त्या पद्धतीचा आता विसर पडला आहे. रस्त्याकडेला असलेली लहान-मोठी भगदाडे चांगल्या पद्धतीने बांधता येऊ शकतात; परंतु सध्या निव्वळ काँक्रिटच्या संरक्षक भिंतीवर लक्ष दिले जात आहे. या भिंती बांधताना देखील बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. कॉक्रिटमध्ये किती साईजचा दगड घालावा, याचे परिमाण आहे; परंतु ते कोणतेही नियम पाळले जात नाहीत. परिणाम बांधकाम केलेल्या भिंती कमी कालावधीत कोसळण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

पर्यायी घाटरस्त्यांकडे दुर्लक्ष

करुळ आणि भुईबावडा हे घाटरस्ते एकमेकाला चांगले पर्याय आहेत. करुळ घाटरस्त्याच्या डागडुजीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो; मात्र त्या तुलनेत भुईबावडा घाटरस्त्यावर खर्च होत नाही. परिणामी या घाटरस्त्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. गतवर्षी रस्त्याला १०० मीटरची भेग पडल्यामुळे हा घाटरस्ता सात-आठ महिने बंद होता. त्यानंतर त्या रस्त्याची पुनर्बांधणी न करता तात्पुरते काम करून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यामुळे पर्यायी घाटरस्त्याकडे देखील बांधकाम विभागाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटचे काय?

आंबेनळी दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील चारही घाटरस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार होते. या घाटरस्त्यांमध्ये धोकादायक ठिकाणे किती आहेत, पुनर्बांधणीसाठी काय करावे लागणार, याचा विचार सुरू होता; परंतु त्यानंतर त्याचे काय झाले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्था

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ज्या विभागाकडे घाटरस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी आहे, त्यांनी आपत्कालीन व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. दरड कोसळल्यानंतर जेसीबी शोधण्यास सुरुवात होते. घाटरस्त्यांवर मोठी वाहतूक असते. त्यामुळे कुणालाही माघारी फिरणे शक्य होत नाही. पाऊस सुरू असताना घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्यामुळे वाहने अधिक काळ उभी करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे दरड कोसळल्यानंतर ती तत्काळ हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे.

घाटमार्ग असे

पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे जिल्ह्यात करुळ, भुईबावडा, फोंडा अणि आंबोली असे प्रमुख चार घाटमार्ग आहेत. यातील तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाट हा देखभाल दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे आहे. उर्वरित तीन घाट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. सर्वाधिक वाहतूक करुळमार्गे प्रतिदिन ३५ हजार मेट्रिक टन होते. शिवाय फोंडा आणि आंबोली मार्गाने सरासरी ११ हजार टन वाहतूक होते. तर भुईबावडामारेग ६ हजार टन वाहतूक होते.

क्रॅश बॅरियर्सची गरज

घाटरस्त्यांमध्ये शेकडो ठिकाणी कधी काळी काळ्या दगडाने बांधलेले संरक्षक कठडे आता जीर्ण झाले आहेत. एखाद्या हलक्या वाहनाच्या धडकेने हे कठडे तुटल्याचे अनेक प्रकार घडले आहेत; परंतु या कठड्यांची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे; मात्र ती एकाच वेळी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी कठडे ठिसूळ झाले आहेत, त्या ठिकाणी क्रॅश बॅरियर्स बसविणे आवश्यक आहे. घाटात काही ठिकाणे बसविलेल्या क्रॅश बॅरियर्सच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com