सिंधुदुर्ग : आंबडोस गावच्या ‘मोडक्या नवऱ्याच्या लग्ना’ची धमाल

आंबडोसच्या होळीतील प्रथा; गावरान ठसका दाखवणारा उत्साह
 होळी उत्सव
होळी उत्सव sakal

ओरोस: ‘‘झिला...झिला...ए झिला’’, अशी समोरून वडिलांनी हाक देताच समोरून ‘काय रे बापाशी..ईलय..ईलय’, असा प्रतिसाद मुलगा देतो. तिथून सुरू होते आंबडोस गावच्या ‘मोडक्या नवऱ्याच्या लग्ना’ची धमाल. होवया, मंगलाष्टका गायल्या जातात. पूर्ण मालवणी भाषेत सादर केलेल्या या नाटकाला गावरान ठसका असल्याने अधिकच धमाल येते. अक्षरश: हसून हसून धमाल उडविणाऱ्या लग्न सोहळ्याला वराडी मंडळी म्हणजे प्रेक्षकसुद्धा मोठ्या संख्येने दाखल होते.

जिल्ह्यात होळी उत्सव सुरू झाला असून पाच, सात किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी हा सण साजरा केला जातो. यानिमित्त प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथा आहेत. करमणुकीचे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. आंबडोस गावात अशीच एक वेगळी प्रथा आहे. पहिल्या दिवशी होळी, दुसऱ्या दिवशी सर्व मंदिरात निशाणकाठी लावणे. तिसऱ्या दिवशी प्रमुख मानकरी यांच्या घराकडे देवाची निशाणकाठी जाते. चौथ्या आणि पाचव्या दिवशी पूर्ण गावात देवाचा हा झेंडा घरोघरी जातो. पाचव्या दिवशी धूळ मारून शिमगोत्सव संपतो.

त्यापूर्वी चौथ्या रात्री होळीच्या चव्हाट्याकडे जागर केला जातो. या रात्री दशावतारी नाटक सादर केले जाते. त्यापूर्वी गावातील व्यक्तींनी ‘मोडक्या नवऱ्याचे लग्न’ हे नाटक सादर करण्याची प्रथा आहे. हे नाटक म्हणजे एक आनंदाची पर्वणी असते. दरवर्षी नाटकाची कथा एकच असते; परंतु त्याची लोकप्रियता वर्षागणिक वाढताना दिसत आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे पूर्ण नाटक मालवणी भाषेत असते. नाटक पाठांतर नसते. केवळ एक थीम असते. त्यावर सहभागी प्रत्येक पात्र आपआपल्या परीने हे नाटक अधिक रंगतदार करीत असतो. या कथानकात गावरान ठसका असतो. जुन्या घडून गेलेल्या गोष्टींवर भाष्य केले जाते. आधुनिक घडामोडींवर सुद्धा भाष्य केले जाते. विशेष म्हणजे गावातील एखाद्या व्यक्तीला किंवा वाडीला टोमणा मारायचा असल्यास या नाटकाचा फायदा घेतला जातो.

होळीच्यासमोर तयार करण्यात आलेल्या रंगमंचावर एक बाप येतो. तेथे असलेल्या नागरिकांशी चर्चा करतो. आपल्या मुलाचे लग्न करायचे आहे, असे सांगून सोबत मुलगी सुद्धा आणली असल्याचे तो सांगतो. त्यानंतर माईकच्या सहाय्याने आपल्या मुलाला हाक देतो. ‘झिला झिला ए झिला’....समोरून मुलगा म्हणतो, ‘काय रे बापाशी...ईलय ईलय’. मग बेंजो वाजू लागतो आणि नवऱ्या मुलाची वरात निघते. रात्रीची वेळ असल्याने वाट दिसण्यासाठी चुडती पेटविली जाते. या चुडतीच्या प्रकाशात या वरातीची वाटचाल सुरू होते. नवरा मुलगा लग्नाच्या ड्रेस कोडमध्ये असतो. त्याच्या डोक्यावर उलटी छत्री धरलेली असते. सोबत दोन पुरुष साडी परिधान केलेल्या असतात. त्या होवळ्या असतात. यातील एक महिला गरोदर असते. सोबत बेंजोच्या तालावर युवाई थिरकत असते. अगदी खऱ्या खुऱ्या लग्नाप्रमाणे वरात नाचत-वाजत निघते.

अर्ध्या-पाऊण तासात बाप बसलेला असलेल्या रंगमंचावर पोहोचते. आता रंगमंच राहत नाही. तो लग्नमंडप होतो. या मंडपात आल्यावर मुलगा विचारतो ‘काय रे बापाशी..कशाक हाक मारल’. तेव्हा बाप सांगतो ‘अरे झिला, तुझा लगीन करूचा आसा ना? तुझ्यासाठी पोरगी आणलंय. चल लग्न उरकून घेऊया’. मुलगा सुद्धा तात्काळ लग्नाला होकार देतो. त्याचवेळी सोबत असलेल्या दोन-दोन महिलांकडे पाहून बाप विचारतो, ही कोण? त्यांच्या पोटाकडे

पाहून म्हणतो ‘ही काय भानगड.’ तेव्हा या दोघी बोलतात ‘ही काजीतली भानगड हा’. त्यानंतर होवया सुरू हातात. या होवया म्हणजे पाणचट असतात; मात्र रसिक असलेली वराडी मंडळी त्याला भरपूर प्रतिसाद देतात. ‘तुझा लोमता, माझा लोमता..लोका म्हणतीत काय गो लोंबता तर नाकातला मोती लोंबता’, अशा या होवया असतात. त्यानंतर मंगलाष्टके सुरू होतात.

नाटकातील इतर काही क्षण

थोड्या वेळाने साडी नेसलेला पुरुष नवरी म्हणून हार हातात घेऊन मंडपात येते. मंगलाष्टके पूर्ण होताच दोघे एकमेकांना हार घालतात. त्यानंतर नवरी-नवरा पाया पडण्यासाठी एकदम वाकतात. त्यावेळी नवरीचे पाऊल नवऱ्याच्या पावलांच्या पुढे पडते. यावेळी नवरा ‘‘बापाशी या माझ्या एक पाऊल पुढे हा’’, असे म्हणतो आणि नवरीला ढकलतो. येथेच मोडक्या नवऱ्याचे नाटक संपते. मात्र या धमाल विनोदी नायकाने चांगला विरंगुळा होतो. यासाठी अख्खा आंबडोस लोटला होता. याशिवाय शेजारील नांदरुख, माळगाव व चौके गावातील नागरिकही उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com