सिंधुदुर्ग : सागरी महामार्गाच्या आशा पल्लवित

जिल्हावासीयांचे स्वप्न; आराखड्याला मंजुरी मिळाल्याने मोठा आधार
Marine Highway
Marine HighwaySAKAL

देवगड : कोकण किनारपट्टीच्या विकासाला गती देण्याची क्षमता सागरी महामार्गात आहे. तो पूर्ण करण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे. सागरी महामार्गाच्या आराखड्याला आता मंजुरी मिळाल्याने स्थानिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या कामास गती प्राप्त होण्याची गरज आहे.

कोकण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते अतुट असल्याचे मानले जाते. मराठा आरमाराचे शक्तिकेंद्र म्हणून कोकणची ओळख मानता येईल. किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले विजयदुर्ग यासह कोकणातील अन्य किल्ले महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगत आजही अभेद्य आहेत. त्यावेळी जलमार्गाला अधिक महत्त्व होते. त्यानंतरच्या काळातही अगदी अलीकडेपर्यंत जलवाहतुकीवर अधिक भर होता. अगदी कमी खर्चाची वाहतूक म्हणून याकडे पाहिले जात होते. देवगड बंदरात त्यावेळी फार मोठा व्यापार चाले. प्रवाशी बोटीतून अनेकांना मुंबई दर्शन घेणे सोयीचे होत होते. बोटीतून प्रवास करणाऱ्यांसाठी ‘भाऊचा धक्का’ ही ओळख होती. कोकणातील आंब्याचा प्रवासही सुरुवातीला बोटीतूनच चालत असे. सिमेंटचा वापर करून स्लॅबच्या घराची निर्मिती होण्याआधी मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील घरांसाठी लागणारी मंगलोरी कौलांची वाहतुकही जलमार्गानेच होत होती. विविध जीवनावश्यक साहित्यापासून अनेक वस्तूंची वाहतूक त्याकाळी गलबताने चाले. तालुक्यात विविध मंडळींची गलबते बंदरात होती. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक जलमार्गाने अधिक चालत होती. बंदरात आलेला माल अंतर्गत भागात पोचविण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जात असे. ग्रामीण भागात मातीच्या भांड्यांचा व्यापारदेखील बैलगाडीच्या सहाय्यानेच सुरू असायचा. जळावू लाकडे असोत किंवा अगदी जडसामान असो, त्यासाठी बैलगाडीचा आधार असे.

बैलगाडीला वेगळा रस्ता करावा लागत नसल्याने कमी खर्चाची वाहतूक म्हणून याकडे पाहिले जात होते. शेतीला पूरक म्हणून बैलगाडीचा व्यवसाय चाले. त्याकाळी रस्त्यांचे फारमोठे जाळे नव्हते. मुंबईला जायचे झाल्यास घाटमाथ्यावर जावे लागत होते. हळूहळू रस्ते विकासावर भर दिला गेला आणि वाहतुकीचा वेग वाढला. सुरुवातीला मातीच्या रस्त्यांची जागा डांबरी रस्त्याने घेतली. ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते त्यावेळी धुळीने माखलेले असायचे. त्यातून एसटी धावल्यावर आसपासचा परिसरही लाल होई. खाडीकिनारी भागांना जोडणारे पूल नव्हते. त्यामुळे होडीतून प्रवासी वाहतूक चाले. खाडीच्या अलीकडे-पलीकडे तरीवर गेल्यावर पुढे वाहनांची सोय होत होती. त्यानंतर सुरुवातीला लाल भासणारे रस्ते डांबरी झाले खरे; मात्र त्यांची रुंदी जेमतेमच होती. त्यामुळे समोरच्या वाहनाला बाजू देताना अनेक कसरती कराव्या लागत होत्या. त्यावेळी वाहनांचे प्रकारही मर्यादितच होते. जलवाहतुकीबरोबर ग्रामीण भागात आपापल्या गावी पोचण्यासाठी अनेकांना एसटी हाच आधार होता. कमी खर्चातील हक्काचे वाहन म्हणून एसटीला प्राधान्य मिळाले. खासगी वाहनांचा सुळसुळाट नसल्याने एसटीशिवाय पर्याय नसे. अनेकांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. त्यामुळे एसटीमध्ये एकोप्याने सर्वांचा प्रवास सुरू राहायचा.

अरुंद रस्ते, वळण परिसराचा भाग, तत्कालीन वाहनांची वेगमर्यादा यामुळे रस्ते वाहतुकीमध्ये बराचवेळ जायचा. यांत्रिक शेतीमुळे बैलजोडी परवडेनाशी झाली आणि काळानुरूप बैलगाडी इतिहासजमा झाली. दरम्यानच्या काळात मुंबई-गोवा महामार्ग झाला आणि प्रवासाचा वेग वाढला. याच मार्गाला समांतर म्हणून १९७० च्या दशकात कोकणच्या सागरी किनारपट्टीवरून जाणाऱ्या सुमारे ५४० किलोमीटर लांबीच्या रेवस-रेडी सागरी महामार्गासाठी हालचाली सुरू झाल्या; मात्र आज इतकी वर्षे लोटली तरीही महामार्गाचे स्वप्न संपूर्णपणे पूर्णत्वास गेलेले नाही. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. रायगड जिल्ह्यातील मांडवा फोर्ट, रेवस, अलिबाग, मुरुड, दिघी फोर्ट, बाणकोट, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, जैतापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले किनारपट्टीवरून महामार्ग जात आहे; मात्र यामध्ये अजूनही अनंत अडचणी दिसत आहेत.

फेरआखणीची गरज

कोकणातील खाड्या जोडणारे बहुतांशी पूल झाले असले, तरीही बऱ्याच ठिकाणी महामार्ग अरुंद गावठाणातून जातो. त्यामुळे काही भाग अरुंद आणि प्रखर वळणाचा भासतो. पर्यायाने महामार्गाची फेरआखणी करण्याची आवश्यकता मानली जात आहे. रायगडमध्ये मुरुड, नांदगाव, आदआव, धारावी, रत्नागिरीत वेसवी, बाणकोट, वेळास, पालशेत, रिळ, शिरगाव, मालगुंड, कशेळी, आडीवरे आदी ठिकाणी गावाबाहेरून वळण देऊन पर्यायी रस्ता बांधणे आवश्यक ठरेल. अशीच स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्‍वर, कातवण, मिठबाव, केळुस, टाक, म्हापण आदी गावांमध्येही भेडसावणार आहे.

पूल झाले पण...

कोकणातील खाड्या जोडणारे बहुतांशी पूल झाले आणि होडी वाहतुकीवर गुजराण करणाऱ्या कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला. विकासामध्ये गतिमानता आली तरीही काहींना पारंपरिक व्यवसाय बदलावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com