सिंधुदुर्ग स्वप्नपूर्तीच्या दिशेन; मेडिकल काॅलेजला मंजूरी, कोणी केली घोषणा...

medical
medical

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हा मुख्यालयातील जिल्हा रुग्णालयाच्या लगतची जागा आरोग्य शिक्षण विभागाकडे तातडीने वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. वर्षभरात प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न असतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात होणार असल्याचे स्पष्ट झाले. 

याबाबत  व्हिडिओ कॉन्फरसीव्दारे बैठक झाली. यात आरोग्य शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, आरोग्य खात्याचे उपसचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्र, रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते. 

श्री. सामंत म्हणाले, "जिल्ह्यात येत्या वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा रुग्णालयालगतची जागा आरोग्य शिक्षण विभागाकडे वर्ग केल्यानंतर तातडीने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. याविषयीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने करावी. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे अन्य मंजुऱ्या मिळण्यास अडचण नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रस्ताव आरोग्य व आरोग्य शिक्षण विभागास सादर करावेत. त्यास मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीमध्ये सादर करुन मंजुरी घेता येईल.'' 

डॉ. लहाने म्हणाले, "वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार आहे. तांत्रिक बाबी, यंत्रसामुग्री खरेदी, मनुष्यबळ निर्मिती, या सर्वांचे प्रस्ताव तयार आहेत. जागेचा प्रश्‍न मार्गी लागणे बाकी आहे. आरोग्य शिक्षण विभागास जागा वर्ग केल्यानंतर तातडीने काम सुरू करता येईल..'' 

पुढील वर्षीपर्यंत कॉलेज सुरू 
वैद्यकीय महाविद्यालयाची नियोजित जागा तातडीने वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले. पुढील वर्षी अभ्यासक्रमास प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल, या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आता जिल्ह्यात लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रत्नागिरी येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी चर्चा करण्यात आली. 


मार्ग मोकळा 
वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाचशे खाटांचे रुग्णालय लागते. ते तीन वर्ष चालवल्यानंतर तेथे मेडिकल कॉलेज सुरू करता येते. जिल्ह्यात मंजूर मेडिकल कॉलेज कुठे होणार याबाबत संभ्रम होता. हे कॉलेज जिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणी झाल्यास ते लवकर सुरू करणे सोपे होणार होते. केंद्रातल्या मागील सरकारने जिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत संकेत दिले होते. "सकाळ' नेही तशी भूमिका घेतली होती. आज हे महाविद्यालय जिल्हा मुख्यालयाच्या आवारातच होणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले. 

       दृष्टिक्षेपात 

  • जिल्ह्याच्या आरोग्य प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी मेडिकल कॉलेजची संकल्पना `सकाळ'ने मांडली 
  • `सकाळ'च्या भूमिकेनंतर कृती समितीची स्थापना 
  • कृती समितीच्या माध्यमातून जनरेट्यासाठी प्रयत्न 
  • अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे मागणीसाठी ठराव 
  • तत्कालीन मुुख्यमंत्र्यांना मागणीबाबत हजारो पत्र 
  • केंद्राकडून जिल्हा रूग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दर्जाबाबत हालचाली 
  • मुख्यमंत्र्यांच्या फेब्रुवारीतील दौऱ्यात चर्चा 
  • सिंधुदुर्ग कोरोना लॅब उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही 
  • मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर प्रशासकीय हालचालींना वेग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com