सिंधुदु्र्गात निम्म्याहून अधिक बाधितांवर घरीच उपचार

विनोद दळवी
Friday, 25 September 2020

जिल्ह्यात एक हजार 106 रुग्ण सक्रिय आहेत. 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 98 व्यक्तींचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आणखी एकाचे निधन झाले, तर 149 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक हजार 106 रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात बुधवारी (ता. 23) तीन हजार 298 रुग्ण होते. त्यानंतर गुरूवार दुपारपर्यंत आणखी 424 अहवाल आले. यातील 326 अहवाल निगेटिव्ह होते. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन हजार 396 झाली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. 

कोरोना चाचणी केंद्राकडे नव्याने 133 नमुने आले. त्यामुळे नमुन्यांची संख्या 23 हजार 801 झाली. सर्वांचे अहवाल आले आहेत. आणखी एका मृत्यूने बळींची संख्या 69 झाली आहे. कोरोनामुक्तांची संख्या दोन हजार 221 झाली आहे. संस्थात्मक क्वारंटाईनमधील तब्बल तीन हजार 674 व्यक्ती कमी झाल्या. त्यामुळे येथील दाखल संख्या 17 हजार 789 आहेत. गाव पातळीवर तीन हजार 109 व्यक्ती कमी झाल्या. तेथील संख्या चार हजार 918 आहे. नागरी क्षेत्रात 43 व्यक्ती वाढल्याने तेथील संख्या 12 हजार 879 झाली. 

जीएसटी कार्यालयात चार रुग्ण 
कोरोनाने हळूहळू जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग पादाक्रांत करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत असलेल्या जीएसटी कार्यालयात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. चार कर्मचारी बाधित आले आहेत. कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कार्यालय बंद ठेवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. 

599 रुग्णांवर घरातच उपचार 
जिल्ह्यात बाधित रुग्ण रुग्णालयापेक्षा घरीच राहून उपचार घेण्यास पसंती देत आहेत. बाधित आहेत; परंतु लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना घरीच उपचार घेण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार 106 रुग्ण सक्रिय आहेत. यातील तब्बल 599 रुग्ण घरी उपचार घेत आहेत. म्हणजेच 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रुग्ण घरी उपचार घेत आहेत. 

चाचणी मशीन होते बंद 
शासनाचे कोरोना चाचणी केंद्रातील मशीन मध्येच बंद होते. त्यामुळे जिल्ह्यातील नमुने चाचणी रखडली होती. प्रलंबित अहवाल हजारच्या पुढे गेले होते; मात्र आम्ही तत्काळ मशीन दुरुस्त करून घेतले. त्यामुळे आता नियमित तपासण्या होत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Sindhudurg, more than half of the victims were treated at home